सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ प्रिय माऊली मराठीस… लेखिका : सुश्री वैशाली ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

प्रिय माऊली मराठीस

माझा मनोमन दंडवत!

आज मराठी भाषा दिन आहे. खरं म्हणजे तू श्वासातच इतकी भिनलेली आहेस की तुला वेगळं काढून एखादा दिवस तुझी गाणी गावीत असं शक्यच नाही. पण असो. श्वास आजन्म घेतला तरी प्राणायामातून घेतलेल्या श्वासानं जसं निर्मळ वाटतं, श्वासाचं खरं मूल्य समजतं तसंच तुझ्याबाबतीत आहे.

आज असंच तुझ्याशी शिळोप्याचं काही बोलावंसं वाटलं. बघितलंस? शिळोप्याच्या गप्पा… किती दिवसांनी वापरला हा शब्द! अगं तो वापरावा इतका वेळच नसतो आणि आता ज्येष्ठ वयात शिळोप्याचं बोलावं तर आहेच कोण रिकामं? मग वाटलं तू आहेस की. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून थोडंसं स्मरणरंजन करावं.

आई, आज ना मला जुन्या स्वयंपाकघरात जाऊन तुला शोधावंसं वाटतंय. आमच्या नव्या किचनमध्ये तू आगदीच मला गरीब वाटायला लागलीयस.

बघ ना, चूलपोतेरे, सांडशी, ओगराळं, उभे लावून रांधप करणं. (अगं, माझ्या नातवंडांनी उभे लावून म्हटल्यावर आ केला. तेव्हा समजावून सांगावं लागलं, बाबांनो, उभेलावणं हा सोवळ्यातल्या स्वयंपाकाचा गणवेश होता. आडजुनं (म्हणजे अगदी पार फाटलेलंही नाही आणि सरसकट नेसायच्याही अवस्थेतलं नाही असं लुगडं अंघोळीनंतर घट्टमुट्ट कासोटा घालून, दोन्ही खांद्यांवरचा पदर पोटाशी खोचून गृहीणी रांधप करायच्या. नंतर सावकाशीनं नेहमीचं लुगडं चोळी परिधान करायची,) बघ शब्द शोधताना त्याच्या संदर्भसंदुकीही उघडाव्या लागतात.

तर, आता कुटणे, वाटणे, निपटून घेणे, चिरणे, परतणे, फोडणीस टाकणे, आधण, वैरणे, लाटणे, थापणे, वळणे या सगळ्यासाठी एकच… ‘बनवणे. ‘ चहासुद्धा बनवतात. जेवण बनवतात.

शिजवलेल्या अन्नाला स्वयंपाक म्हणतात, ताटात वाढलेल्या अन्नाला जेवण म्हणतात. हे विसरलोय आम्ही.

शकुंतला भांडं, पेढेघाटी डबा, फिरकीचा तांब्या, ताकाचा कावळा (चोच असलेलं झाकणाचं भांडं) गडवा (म्हणजे छोटा उभट तांब्या) वेळणी (म्हणजे पसरट थाळी.. पातेल्यातला भात थेट पानात वाढण्याची पद्धत नव्हती. तो वेळणीत घेऊन उलथन्याच्या टोकाने अगदी शिस्तशीर पंगतीत वाढायचा. ) कर्म माझं… पंगत पण शोधावी लागेल.

मिसळणाचा डबा, मिठाची दगडी, थारोळ्यावर ठेवलेलं दूध, शिंकाळं, पळीवाढं, अंगासरशी रस्सा…

तुपाची खरवड, शि-याची, पिठल्याची किंवा भाताची खरपूस खरपुडी काय काय आठवू?

न्याहारी, माध्यान्ह भोजन, वैश्वदेव, आपोष्णी, आंचवणे यांनाही हल्ली गाठोड्यातच बांधलंय.

पदार्थात मीठ तिखट मिसळत होतो. आता अॕड करतो. भाज्या चिरत नाही. कट् करतो.

तुझ्यात घुसखोरी करणारे हे शब्द आमच्या पिढीला खटकतात गं. पण तू बाई, उदार आहेस हो. सामावून घेतेस सगळ्यांना.

समजावतात काहीजण की, मनातल्या भावना पोचवू शकते ती भाषा. भाषिक आग्रह सोडला तर तळागाळातून संवेदनशील माणसं मोकळेपणे व्यक्त होऊ शकतात. त्यांना काय सांगायचंय ते कळलां म्हणजे पुरे.

काळानुसार झालंय खरं तसं.

पण सांगू का?

तू मुळातच डौलदार, सौष्ठवपूर्ण आणि श्रीमंत आहेस. काही दागिने आता कालमानानुसार कालबाह्य झालेले असले तरी आपल्या संतांनी आपल्या अभंगात, साहित्यिकांनी त्यांच्या प्रातिभ आविष्कारात, आपल्या वेल्हाळ मालणींनी त्यांच्या लोकगीतांत तुला सजवून ठेवलेलं आहे. तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आमचीच आहे. हेच तर आजच्या दिवशी स्वतःला बजावायचं आहे.

मन ओतलं तुझ्याजवळ. खूप हलकं वाटलं बघ.

येत राहीन अशीच तुझ्या उबदार कुशीत.

सारस्वत माये, तुझी कन्या..

वैशाली.

लेखिका : सुश्री वैशाली 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

छान! नवीन पिढीला शब्दांची ओळख करून देणारा लेख