सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

तिची परंपरा

धोबी गल्लीतलं अगदी मध्यावरचं चार नंबरचं एक माडीचं घर म्हणजे ढग्यांचं घर. खरं म्हणजे त्या काळातलं ते एक स्वतंत्र कुटुंब असं म्हणायला काही हरकत नाही. संयुक्त कुटुंबाच्या तुलनेत लहानच परिवार असलेलं. म्हणजे आई वडील, पाच मुली आणि आजी असं आठ माणसांचं पण स्वतंत्र कुटुंब. कारण आजीला एकच मुलगा आणि त्याचाच हा संसार. तसं मराठमोळं, साधं, फारशी कठीण, कडक व्रतंवैकल्य न करणारं असलं तरी सांस्कृतिक परंपरा बऱ्यापैकी सांभाळणारं असं हे सुशिक्षित, सुसंस्कृत सभ्य कुटुंब आणि या कुटुंबाच्या केंद्रस्थानी होती ती पिकल्या केसांची, सुरकुत्या कायेची, गालावर एक ओघळता काळा मस असलेली, सावळी, ठेंगणी पण ताठ आणि चमकदार डोळ्यांची आजी.

काळाने अनेक बऱ्या, वाईट, कडू गोड प्रसंगाने तिला अक्षरश: झोडपून काढले होते. पण त्या वादळातही टिकून राहिलेली ती एक ठिणगी होती. प्रस्थापित रूढी, रिती, परंपरा यांच्याशी सतत वाद घालत तिने आयुष्या विषयीची एक स्वतःचीच प्रणाली स्थित केली होती आणि तीच तेव्हां आणि नंतरही त्या कुटुंबाची परंपराच ठरली. जुन्यातलं सकारात्मक तेवढं तिने टिकवलं मात्र नकारात्मक ते सपशेल नाकारले. जे जाचक, प्रगतीला खिळ आणणारे, निरर्थक, केवळ गतानुगतीक असलेलं परंपरावादी तिनं स्व सामर्थ्याने लोटून दिलं आणि त्याचा एक वस्तूपाठवच तिने कुटुंबासाठी ठेवला. म्हणून ढग्यांचं कुटुंब हे वेगळं होतं.

आचार विचार सगळ्याच बाबतीत.

ढग्यांच्या आजीला पाच नातीं वरून खूप जण खिजवायचे. “म्हातारे, तुझा वंश बुडालाच म्हणायचं की!”

आजी इतकी खमकी होती, म्हाणायची,

“ मेल्या! तुझा मुलगा नाक्या नाक्यावर उनाडक्या करत फिरतो तो काय रे तुझ्या वंशाचे दिवे पेटवणार? माझ्या पाच नाती माझे पाच पांडव आहेत. बघशीलच तू. ” नंतर तो कुणी एक जण आजीच्या वाटेला कधीच गेला नाही.

गल्लीतल्या मीनाच लग्न जमत नव्हतं. कारण तिच्या पत्रिकेत कडक मंगळ होता. त्यामुळे पत्रिका जुळवण्याच्या पहिल्याच पायरीवर, आलेल्या स्थळाची पाठ फिरायची. मीना सुंदर होती. गोरीपान, सडपातळ, लांब काळेभोर केस. पलीकडच्या गल्लीतल्या एका मुलाचं मन तिने केव्हाच जिंकलं होतं. दोघेही एकमेकात अडकले होते पण तो खालच्या जातीतला, मीना कायस्थ. शिवाय पत्रिकेचा रेटा होताच. दोन प्रेमी विवाह बंधनात अडकण्याची शक्यताच नव्हती. आजीला जेव्हा हे कळलं तेव्हा दोघांच्याही घरातल्या बुजुर्गांना तिने चांगलंच सुनावलं. “कसली जात पात नि कसल्या पत्रिका पाहता? लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात. जन्मभर मुलांना काय त्या परंपरेच्या बंधनात जखडून ठेवणार आहात का? एक पाऊल पुढे तर टाकून बघा. ”

आजीच्या बोलण्याने दोन्ही परिवारात मत परिवर्तन झालं की नाही माहीत नाही पण त्या दोन प्रेमिकांना मात्र धैर्य प्राप्त झाले आणि त्यांनी लग्नही केलं. त्यांच्या वेलीवर जेव्हा पहिलं फूल उमललं तेव्हां दोघंही प्रथम आजीचा आशीर्वाद घ्यायला घरी आले.

आजी तशी नास्तिक नव्हती. देवावर तिची श्रद्धा होती. घरातल्या खिडकीजवळच्या भिंतीवर एक सुंदर निळकंठाचा फोटो होता. घरातल्या प्रत्येक बाहेर जाणाऱ्या व्यक्तीने त्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही हा तिचा शिरस्ता होता. मात्र कोणी कधी विसरले तर त्याच्या माघारी ती स्वतःच त्या फोटोला दहादा नमस्कार त्याच्या वतीने करायची. आणि पुटपुटायची,

“ देवा याला क्षमा कर, याचं रक्षण कर. ”

तसे तिचे आणखी काही संकेत होते. शनिवारी नवे कपडे घालायचे नाही. उंबरठ्यावर किंवा जेवताना शिंक आली तर डोक्यावर पाणी शिंपडायचं. ” “वदनी कवळ घेता” म्हटल्याशिवाय जेवायचं नाही, नेहमी हसत खेळत जेवायचं, ताटातलं संपवायचं, मनातला राग जेवणावर काढायचा नाही. वगैरे अनेक.

ढग्यांच्या घरात गौरी, गणपती, ईद, नाताळ सगळ्यांचं स्वागत असे. खंडोबाची तळी भरली जायची. गुढी उभारली जायची, राम जन्म, कृष्णाष्टमी सगळं साजरं केलं जायचं. तेव्हा ती म्हणायची, “ जास्त खोलात जाऊ नये. आनंद मिळेल इतपत कराव सगळं. ”

नैवेद्य दाखवला नाही म्हणून घरातल्या लहान मुलांना तिने कधीही उपाशी राहू दिलं नाही. घरात हळदी कुंकवाचा समारंभ असेल तर ओळखी मधल्या विधवा स्त्रियांना ती सुनेला आवर्जून बोलवायला सांगायची.

शरीपा नावाची एक मुस्लिम स्त्री त्यांच्यासमोर राहायची. तिलाही आमंत्रण असायचं. हा हिंदू हा मुस्लिम, हा जातीचा हा परजातीचा, असा भेदभाव तिने कधीच पाळला नाही. मानवतेची नाती जपली.

फक्त पितृपक्षापुरताच नव्हे तर ती रोजच जेवायच्या आधी कावळ्याचा घास कौलावर जाऊन ठेवायची. कुणी विचारलं तर म्हणायची, ” आपल्या घासात या पशु पक्षांचाही वाटा असतोच ना?”

गाईला घास भरवताना, “ती गोमाता, देवता समान” इतकीच भावना राखली नाही तर मूक, अश्राप प्राण्याची भूक भागवण्याचा तिने प्रयत्न केला. “तहानलेल्या जीवाला पाणी द्यावं भुकेल्याला अन्न द्यावं” मग त्यावेळी तिने स्पृश्य अस्पृश्य काहीही मानलं नाही. परंपरा जपलीही, परंपरा मोडलीही.

सलाग्र्यांच्या घरी सवती सुभा फार होता. एक दिवस सलाग्रे ताईवर तिचा सावत्र मुलगा मुसळ घेऊन तिच्यावर धावून गेला तेव्हा आजीने वरच्यावर त्याचा बलदंड हात पकडला आणि त्याला चांगलेच सुनावले,

“काय रे गधड्या दर शनिवारी मारुतीच्या डोक्यावर तेल घालायला हनुमान मंदिरात जातोस ते या कर्मासाठी का? सावत्र आई असली तरी आईच आहे ना? तिनेच वाढवलं ना तुम्हाला आणि एका स्त्रीवर हात उगारतोस? तेही तोळाभर सोन्यासाठी? उद्यापासून मंदिराची पायरी चढलास तर खबरदार. ढोंगी कुठला!”

अशी नित्य नियमित पूजाअर्चा, व्रतं वैकल्यं, कडक उपास तपास करणाऱ्या लोकांवर तिची बारीक नजर असे. खरोखरच्या देवभोळ्यांना ती म्हणायची, ” एक दिवस तुझा देव तुला पावेल बरं”

नाहीतर बाहेर एक आत एक अशा लोकांना ती थेट सांगायची, ” कशाला कष्टवतोस स्वतःला? तुझा देवही दगड आणि तू ही दगड. ” 

आजी कुणालाच घाबरायची नाही आणि ‘सत्याचा वाली परमेश्वर’ ही तिची श्रद्धा मात्र तिने कधीही सोडली नाही. ज्या हातात तिने बडगा घेतला त्याच हाताने तिने रंजल्या गांजल्यांना भरवले. प्रेमामृताचे घोट पाजले. सकारात्मक जपले आणि नकारात्मकतेला तिने पाठ फिरवली आणि आयुष्यभर तिने तिची ही वैचारिक परंपरा जपली. काळ मागे पडत असताना आणि काळ पुढे जात असतानाही..

आज ती नाही, तिचा लेक नाही, सून नाही. पण तिच्या नाती, पणत्या, पणतु, खापर पणत्या, खापर पणतु सारे आहेत आणि त्या सर्वांच्या जीवनात आजीच्या परंपरेचे अनेक थेंब तळी करून आहेत.

कुणी हे का? हे कसं? हे वेगळं आहे, असं म्हटलं तर त्यावर एकच उत्तर असतं, “हीच आमच्या आजीची परंपरा!”

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments