श्री अमोल अनंत केळकर
☆ या ‘ डे ‘ ची खरंच गरज आहे??… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
प्रेमासारख्या नाजुक विषयाचा बाजार मांडायला हया फिरंग्यांना सांगायला नको. ह्यांच्या व्हँलेंटाईन डे वरून मला गझलनवाज भाऊसाहेब पाटणकर यांचा एक शेरवजा किस्सा आठवला.
एकदा एक मूर्ख शायर सूर्यास म्हणतो की
“भास्करा, कीव मजला येऊ लागते कधी मधी,
रात्र प्रणयाची तू रे पाहिली आहे कधी?”
तेव्हा सूर्य उत्तर देतो,
“आम्हासही या शायराची कीव येऊ लागते,
याच्या म्हणे प्रणयास रात्र यावी लागते”.
प्रेम हे काय दिवस ठरवून व्यक्त करायची चीज आहे?
आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात. प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची परिणती आहे.
गदिमा म्हणूनच गेलेयत
“प्रथम तुज पाहता,
जीव वेडावला… “
यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे DIRECT न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की
“जिथे सागरा धरणी मिळते
तेथे तुझी मी वाट पहाते”
मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत!
ही कोंडी शेवटी तो फोडतो, (सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.)
“लाजून हांसणे अन्
हांसून ते पहाणे,
मी ओळखून आहे,
सारे तुझे बहाणे! “
भेट झाल्यावर मात्र हृदयात एक अनाहूत हुरहुर सुरू होते. मग परत गदिमा मदतीला येतात,
“हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता”
तोही आपल्या विश्वात नसतोच!
“होशवालों को खबर,
बेखुदी क्या चीज है,
इश्क किजे, फिर समझिये,
बंदगी क्या चीज है! “
प्रेमात ती ठार वेडी झालीय,
म्हणतेय काय
“मी मनांत हंसता प्रीत हंसे,
हे गुपीत कुणाला सांगू कसे?”
त्याचे “बहाणे” ती सुद्धा “ओळखून” आहे. तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू) आहेत, ती म्हणते,
“नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,
परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी! “
ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे नाहीत. मग तीच म्हणते,
“ये मुलाकात इक बहाना है,
प्यार का सिलसिला पुराना है! ”
शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर
“घडी घडी मेरा दिल धडके,
हाय धडके, क्यू धडके”
ह्याची खात्री पटलीय पण खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय.
“कहना है, कहना है,
आज तुमसे ये पहली बार,
तुम ही तो लायी, हो जीवन में मेरे
प्यार, प्यार, प्यार… “
ती त्याच्या “हरकतीने” मोहरून गेलीय.
तृप्त झालीय.
“धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,
शब्दरूप आले, मुक्या भावनांना “
आणि मग “झाडांची पाने हलतांत”. तो खूष.
“जेव्हां तिची नी माझी, चोरून भेट झाली,
झाली फुले कळ्यांची, झाडे भरांत आली” आणि तिनं चक्क “होय” म्हटलं!
हा गडाबडा लोळायचा बाकी!
“तुम क्या जानो, मुहब्बत क्या है… “
” कोकिळ कुहूकुहू बोले,
तू माझा तुझी मी झाले.. “
दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते
” तुज्ये पायान् रूपता काटां,
माज्ये काळजान् लागतां घांव “
आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं.
“दो लब्जों की है बस ये कहानी”
या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही.
” आज तू डोळ्यांत माझ्या,
मिसळूनी डोळे पहा,
तू असा जवळी रहा,
तू अशी जवळी रहा “
प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणा-या या कविता ज्या साहित्यात आहेत त्या मराठी भाषेला व्हॅलेन्टाईन डे च्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?
लेखक : अज्ञात
संग्राहक :श्री. अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈