प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
मनमंजुषेतून
☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ४ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
दुष्काळ पडायच्या आधीची दोन वर्षे मजेत गेली. त्यावेळी फारतर आम्ही पाचवी सहावी इयत्तेत होतो.वरील कालावधीत आमच्या गावात सिद्ध पुरुष आणि त्यांची टीम दाखल झालेली होती. आम्ही त्यावेळी खूप लहान विद्यार्थी. आमचं कुतूहल कायम जागृत आमच्या गल्लीतील आम्ही बारा तेरा जण त्या सिद्ध पुरुषाच्या मागे. त्यांना काही मदत लागल्यास हजर. त्यांची राहण्याची सोय शिव मंदिरात. तस गाव दहा हजार लोकवस्ती असलेल्.
पटवर्धन संस्थांनाचं गाव कागवाड. गावात पोलीस पाटील, कुलकर्णी, खोत आणि इतर बारा बलुतेदार शेतकरी, कष्टकरी समाज. ते दिवस खूपच सुखाचे. वेळेवर चार महिने पाऊस आणि पावसावर कसलेली शेती अमाप धनधान्य समृद्धी देणारी. काहीजणाच्या शेतात विहिरी व मोट ह्यांची व्यवस्था पण असल्यामुळे तुरळक बागायतदार होतेच.
आमची शाळा सकाळी आठ ते अकरा दुपारी दोन ते पाच. बऱ्याच वेळा जाग न आल्याने दुपारची शाळा तुडुंब भरत होती. कारण रोज दुपारी चार वाजता मधु गद्रे येऊन कांद्याचे उप्पीट करत असे. संध्याकाळी पाच नन्तर शाळेतचं वर्तमान पत्राच्या कागदावर उप्पीट वाढलं जात असे. शाळेच्या तुकडया बऱ्याच ठिकाणी विखूरलेल्या. कारण शाळेला स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे खोताच्या वाड्यात, काटेच्या वाड्यात. तर काही मारुतीचे देऊळ, आणि तालमीत सुद्धा आमच्या तुकडया होत्या. दुपारी चार नन्तर उप्पीटचा वास चहूकडे पसरत असे. त्यामुळे आमचं मन तिकडेच. गुरुजी सुद्धा हे ओळखून होतेच.म्हणून ते पांढ्यांची उजळणी, कविता म्हणणे असा बदल तिथे करीत असत. शाळेपेक्षा आमचा कल उडाणटप्पूपणा करण्यात गुंग. त्यात सिद्ध पुरुष आल्याने व त्यांची योग्य व्यवस्था व्हावी म्हणून आमची नियुक्ती! हे पथ्यावर पडलेलं.
हे सिद्ध पुरुष म्हणजेच गदग मठाचे “श्री स्वामी मल्लिकार्जुन ” त्यावेळचा काळ धनधान्य समृद्ध असलातरी पैसे कोणाकडे नव्हतेच.
बाजारात किराणा सामान आणायला ज्वारी, किंवा कापूस,गहू घेऊन जायचे त्याबद्दल्यात वाण सामान भरायचे. भाजी बाजारात गेले तरी ज्वारी कापूस धान्य देऊन खरेदी करायची. असे ते दिवस. घरी भिक्षा मागायला आला तरी त्यांना सुपातून धान्य दिले जायचे. त्यासाठी घरातील पडवीत एक पोत ज्वारी ठेवली जायची. भिक्षा मागणारे पण ज्यास्त परगावचे असायचे. वेळप्रसंगी भाजी भाकरी दिली जायची. गावात एक मात्र चिंता होती ती म्हणजेच प्यायचं पाणी आणि खर्चाचे पाणी दिवस रात्र भरावे लागे.
अश्या परिस्थितीत श्री मल्लिकार्जुन स्वामी गावात आले आणि त्यांनी ठाण मांडले. रोज रात्री आठ ते दहा प्रवचन सोबत तबला आणि झान्ज वाजवणारे शिष्य. सकाळी त्यांचे आन्हीक कर्म आटोपून झाल्यावर त्यांची रोज प्रत्येकाच्या घरी पाद्य पूजा व भोजन होतं असे. सोबत त्यांचे शिष्यगणं पण असायचेच.
एके दिवशी काय झाले त्यांनी मठाच्या नावावर जमीन मागितली. व लगेच गावच्या लोकांनी माळरानावर दोन एकर जमीन दिली. तेथून खरा खेळ चालू झाला. रोज पाद्य पूजा झाल्यावर हातात झोळी घेण्यासाठी आम्हा मुलांना बोलवले जायचे . व हातात भगव्या धोत्राचे टोक चार मुले धरून घरोघरी भिक्षा मागायला सांगितले जायचे . आमच्या पुढे टाळ आणि पखवाज वाजवणारा वाद्यवृंद पण होताच. जेणेकरून लोकांना कळावे की भिक्षा यात्रा चालू आहे. हे कार्य रोज वर्षभर तरी चालू झालेल होतं . झोळीत दोन, तीन, पाच पैसे, चार अणे आठ अणे क्वचित रुपया पडत असे. तो आम्ही स्वामीजींच्या कडे सुपूर्द करून दुपारी शाळेत हजेरी लावत होतो. शाळा पण बुडत नव्हती व संध्याकाळी उप्पीट पण चुकत नव्हतं.
रोज स्वामीजी प्रवचनात दान करण्यासाठी उद्युक्त करत होतेच. पैसे,धान्य इतर सामग्री पण गोळा होतं होती. गावातील रस्त्यावर पडलेले दगड, गटारातील दगड गोळा करण्याचे काम चालू झाले. व ते बैल गाडीतून माळावर पोहचवण्यात येतअसे बैलगाडी स्वखुशीने शेतकरी देत असतं . बऱ्याच दानशूर लोकांनी वाळू,दगड,किंवा रोख पैसे देत असतं.
आणि एक दिवशी शिवानंद महाविद्यालयाचे बांधकाम चालू झाले. चुना खडी वाळू रगडली जाऊ लागली. बांधकाम मजुरांनी पण आठवड्यातील एक दिवस स्वामी चरणी अर्पण करून पुण्य कामावले. इमारत वर वर येऊ लागली तसे पैसे कमी पडू लागले. त्यातून पण स्वामींनी शक्कल लढवत लॉटरीची योजना राबवली. लॉटरीत प्रपंचांची भांडी कुंडी, सायकल रोज उपयोगी येणाऱ्या वस्तू ठेवल्या. व त्याचे प्रदर्शन पण मांडण्यात आले. लॉटरी तिकिटाची किम्मत होती एक रुपया. त्यावेळी एक रुपया म्हणजे भली मोठी रक्कमचं!
स्वामीचे रोज प्रवचन चावडीत होतं असे. चावडी गावच्या वेशीत. हा हा म्हणता पंचक्रोशीतील भक्तगण मिळेल त्या वाहनातून येत . त्यावेळी बैलगाडी हेच मोठे वाहन होते. बरेच जण घोड्यावर किंवा सायकल वरुन पण येऊ लागले. श्रावणात तर जर सोमवारी भंडारा पण होऊ लागला. लॉटरीची तिकीट परत छापवी लागली. आणि बघता बघता आमच्या डोळ्यासमोर शिवांनंद महाविद्यालय उभे राहिले.
आम्ही तर रोज झोळी धरून फिरत होतोच. रोज संध्याकाळी परत इमारत कुठवर उंच झाली आहे,हे बघण्यासाठी आतुर असायचो. दिवस सरले .. कॉलेज प्रांगणातचं लॉटरीची सोडत पण झाली. त्यावेळी शिवानंद कला महाविद्यालय पूर्ण बांधून झाले होते.
त्या सिद्ध पुरुषाचे व महाविद्यालयाचे आम्ही पूर्ण साक्षीदार होतो, हे आमचे भाग्यच.
ह्याच सिद्ध पुरुषांचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी विजापूर मठाचे प्रमुख पट्ट शिष्य होते. हे दोन्ही गुरु आमचे मार्गदर्शक ठरले, यात तिळमात्र शंका नाही. दिवस कसे सरत होते ते कळत नव्हतं. फक्त आम्ही दिलखुलास जीवन जगत होतो. बालपण म्हणजे काय हे देखील आम्हाला त्यावेळी माहित नव्हते. श्रावण महिना तर आमच्या साठी पर्वणी. सणांची रेलचेल. नागपंचमी ला तर घरोघरी झोपळा टांगलेला असायचा. त्यात एकेक पोत ज्वारीच्या लाह्या घरी तयार केलेलं असतं. फोडणीच्या लाह्या, लाह्याचे पीठ दूध गूळ, हे आमचे त्यावेळेस स्नॅक्स! शाळेत जाताना चड्डीच्या दोन्हीही खिश्यात लाह्या कोंबलेल्या असतं. त्यात शेंगदाणे पण मिसळलेलं. लाह्याचा सुशला. बघता बघता पंधरा ऑगस्ट पण जोडून येई. गावभर भारत माता की जय म्हणत, मिरवणूक होई. शेवटी ती गावाबाहेरच्या हायस्कुल मैदानात विसर्जित होई. तिथे भाषण विविध गुण दर्शन असा कार्यक्रम होऊन त्याची सांगता होई.
झोपाळा पुढे महिना भर लटकत असे. गोकुळ अष्टमी आली की त्याची तयारी वेगळीच. विठ्ठल मंदिरात एका टेबलवर कृष्णाची मूर्ती सजवून ठेवलेली. प्रतिपदे पासून त्या मूर्ती समोर निरंतर पहारा चालू होई. पहारा म्हणजे प्रत्येकी एका जोडीने एक तास उभारून पारा करायचा. एकाच्या हातात वीणा तर दुसऱ्याच्या हातात टाळ. मुखाने नामस्मरण. जय जय राम कृष्ण हरी. प्रत्येकाला घड्याळ लावून दिवसा व रात्री पहारा करायला उभे केले जायचे. त्यात आमच्या गल्लीतील टीमचे सगळेच भिडू सामील. कारण शाळेला दांडी मारली तरी चालत असे.
माझ्या समोर पक्या असायचा त्याला झान्ज द्यायचो व वीणा मी घ्यायचो. कारण पक्या थोड्या वेळात पेंगत असे. एक दिवशी तो असच पेंगत होता. मुखाने जप चालू होता. मी मुद्दाम ग्यानबा तुकाराम तुमचं आमचं काय काम असं त्याला भारकटवल. तो तसाच म्हणायला नेमक त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आले. मी साळसूद होऊन जप केला. पक्याचे तुमचं आमचं काय काम चालू होतं. अध्यक्ष आले आणि त्याला खडकन थोबाडीत मारली. तस ते भेळकंडत खाली पडला. त्याला जाग आल्यावर घाबरलं. रडायला लागलं. लगेच माझा भिडू बदलला गेला.
रोज दुपारी महाप्रसाद चालू होताच. रोज नवीन नैवेद्य असायचा. रोज बरेच लोक हजर असतं. शेवटच्या दिवशी आम्ही भलं मोठं मातीच गाडगे घेउन दोन तीन गल्ल्या फिरून दूध दही लोणी लाह्या लोणचं असे सगळे प्रसाद गोळा करून शेवटी ते गाडगे श्रीकृष्णाजवळच ठेवत, पहाऱ्याची सांगता होई. श्रावण कृष्ण नवमीला ते गाडगे उंच झाडावर टांगले जाई. संध्याकाळी आमचा गट बालचमू येऊन एकमेकांना खांद्यावर धरून तो बुरुज तयार करून ते गाडगे फोडलं जाई. त्यासाठी रोज आम्ही सराव पण करीत असू.
कोणत्याही खेळाची साधने उपलब्ध नसताना, बरेच गावठी खेळ खेळण्यात मजा येत होती व रंगत पण वाढत होतीच. मध्येच केव्हातरी आलावा उर्फ मोहरम सण येत असे. चार पाच ठिकाणी पीर बसवत असतं. आम्ही मुस्लिम मित्रांना घेउन तिथे पण धुमाकूळ घालण्यात मजा येई. आमच्या चावडी जवळच असलेल्या मसूदीत लहान आकाराचे अकरा पीर बसत. सगळेच पीर संध्याकाळी बाहेर पडत. आम्ही त्यांना घेण्यासाठी चढओढ पण लागतं असे. मुल्ला लोक ओळखीचे लगेच लहान पीर आमच्या खांद्यावर देत असतं.ते घेउन आम्ही पटांगणात नाचत असू. आमच्या अंगावर खोबरे खारीक अभिर पडत असे. अभिर कधी कधी डोळ्यात पण जाई त्यावेळी पिरांची खांदे पलटी होई.
खाणे पिणे शाळेत जाणे, दंगा मस्ती करणे. परीक्षा पास होणे. असे करता करता सातवी पास कधी झालो ते कळलंच नाही. अधून मधून घरी पाहुणे येत, त्यांची बाड दस्त ठेवणे. त्यांना स्टॅण्डवर पोहचवणे. बस येईपर्यंत तेथेच राहणे, त्यांनी देऊ केलेले पैसे नको नको म्हणत, ते घेणे. घरातून जाताना त्यांचा आशीर्वाद घेणे. वाढ वडिलांची आज्ञा पाळत बालपण पुढे सरकत होते. बऱ्याच गोष्टी मिळत नव्हत्या. आहे त्यात समाधान असणे ही त्यावेळची संकल्पना होती.
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈