सौ. उज्ज्वला केळकर
☆ पक्षी जाय दिगंतरा… कवयित्री : कै. डॉ. मीना प्रभू…संग्राहक : डॉ. शेखर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
काय मरण मरण – मला नाही त्याची भीती
होते सामोरी घेऊन – पंचप्राणाची आरती
माझं मरण मरण – त्याने यावं अवचित
त्याच्या शुभ्र पंखावरी – झेपावीन अंतरात
दवओल्या पहाटेस – त्याचे पाऊल वाजावे
उषा लाजता हासता – प्राण विश्वरूप व्हावे.
माध्यान्हाच्या नीलनभा – जाई गरुड वेधून
त्याच्यापरी प्राण जावे – सूर्यमंडळा भेदून
किंवा गोरज क्षण यावा – क्षण यावा आर्त आर्त
जीवितास काचणारी – हुरहुर व्हावी शांत
शांत रजनी काळोखी – घन तिमिर निवांत
शंकाकुल द्विधा मन – विरघळो सर्व त्यात
वैशाखीच्या वणव्यात – एक जीव अग्नीकण
शांतवेल होरपळ – जेव्हा वरील मरण
जलधारांचा कोसळ – होता सृष्टीचे वसन
जीव शिवाला भेटावा – बिंदू सिंधूचा होऊन
गारठली पानं सारी – हिमवार्याशी झोंबत
देठी सहज तुटता – न्यावे मलाही सोबत
नको चुडा मळवट – नको हिरे, मणी, मोती
नका सजवू देहाला – नाही आसुसली माती
नको दहन दफन – नको पेटी वा पालखी
मंत्र, दिवा, वृंदावन – मला सगळी पारखी
नको रक्षा हिमालयी – गंगा अस्थी विसर्जन
धुक्यात जावी काया – आसमंती झिरपून
पंच भूतांनी बांधला – देह होता एक दिनी
पंचतत्वी तो विरावा – नकळत जनांतूनी
खरे सांगू माझे निधन – झाले कार्तिक संपता
आज त्याची जनापुढे – घडे निव्वळ सांगता
जाता जाता एक ठेवा – उरी पोटी जो जपावा
माझ्या कार्तिकची बट – फक्त हृदयाशी ठेवा.
त्याच क्षणी समस्तांची – स्मृती जावी निपटून
मागे ऊरू नये माझी – भली बुरी आठवण
स्मृतींची त्या ढिगातून – आठवांचे ढग येती
डोळा इवला प्रकाश – वेडी आसवे गळती
नको सोस आता त्यांचा – जीव सत्यरूप झाला
कशासाठी कष्टी व्हावे – ओघ पुढती चालला.
दुवा मागल्या पिढीचा – पुढचीशी जुळवून
माझे बळदले काम – सार्थ आता निखळून
असे अब्ज अब्ज दुवे – आजवर निखळले
विस्मृतीच्या पंखाखाली – दुवे त्यांचेच जुळले
दुवे त्यांचेच जुळले…
या कवितेच्या शेवटी कवयित्रीने लिहिलंय –
‘सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार आणि माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मन:पूर्वक क्षमायाचना आता तुमची नसलेली, मीना.’
प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू
प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचे १ मार्च २०२५ रोजी दु:खद निधन झाले. पेशाने भूलतज्ञ असलेल्या प्रभू यांनी आपल्या लेखनाने प्रवासवर्णनाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले होते. मराठीत प्रवासवर्णनपर लेखन सातत्याने करणाऱ्या डॉ. मीना प्रभू यांची प्रवास वर्णनाबरोबर कादंबरी आणि कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. पण त्यांची मराठी साहित्यात ओळख होती ती प्रवासवर्णनकार म्हणूनच. त्यांनी याद्वारे मराठी साहित्यात एक नवा प्रवाह रूढ केला. मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच त्यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी पुण्यात २०१७ मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.
कै. मीना प्रभू यांनी काही वर्षांपूर्वी त्यांचे मनोगत वरील कवितेतून व्यक्त करून ठेवले होते ही गोष्ट अचंबित करणारी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
संग्राहक – डॉ. शेखर कुलकर्णी
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈