श्री मंगेश मधुकर
☆ “चूक की बरोबर?” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
नेहमीच्या वेळेत ऑफिसला निघालो. पिकअवर असल्यानं रस्त्यावर तोबा ट्राफिक. गाडी इंच इंच पुढे जात होती. ही रोजचीच परिस्थिती त्यामुळे आताशा राग, संताप, चिडचिड यापैकी काहीही होत नाही. डोकं शांत असतं. काही वेळानं पुढे सरकत चौकात पोचलो तर रेड सिग्नल लागला. सिग्नलच्या आकड्यांकडे पाहताना “वॉव, वॉव” असा सायरनचा आवाज यायला लागला लगेचच सगळ्या नजरा आवाजाच्या दिशेनं वळल्या. शांत जलाशयावर दगड मारल्यावर जसे तरंग निर्माण होतात अगदी तसं सायरन ऐकून गाडीवाल्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली.
“घ्या पुढे.. ”
“रस्ता मोकळा करा”
“लाल गाडी हो की पुढे.. ”
“ए बुलेट, फोनवर नंतर बोल आधी गाडी बाजूला घे” एकेक गाडीवाले बोलायला लागले सोबत हॉर्नचा किलकिलाट होताच. अंब्युलन्सला वाट देण्यासाठी जो तो प्रयत्न करू लागला. सिग्नलजवळ सर्वात पुढे असलेल्या पाच-दहा जणांना मागचे गाडीवाले पुढे जाण्यासाठी आग्रह करायला लागले.
“ओ, गाडी घ्या पुढे! ! ”एकजण माझ्याकडे बघत ओरडला.
“सिग्नल! ! ”
“घ्या पुढे काही होत नाही. मामांनी पकडलं तर अंब्युलन्सचं कारण सांगायचं. ते पण काही करत नाही. ”सिग्नल तोडण्यासाठी दबाव वाढत होता. आम्ही मात्र कफ्यूज काय करावं ते समजेना. शेवटी माणुसकी जिंकली. तीस सेकंद बाकी असताना आम्ही गाडी पुढे दामटली आणि काही वेळातच अंब्युलन्स मार्गस्थ झाली परंतु मी मात्र पोलिसांच्या तावडीत सापडलो. पन्नाशीचा पोलिस जाम खतरुड दिसत होता. माझ्याआधी पकडलेल्या लोकांशी उर्मटपणे बोलत होता. माझं लायसेन्स, पीयूसी, गाडीची कागदपत्रे तपासल्यावर साहेब तुसडेपणाने म्हणाले “सभ्य दिसताय आणि सिग्नल मोडता. ”
“सभ्य म्हणालात त्याबद्दल धन्यवाद! ! सिग्नल मुद्दाम मोडला नाही. महत्वाचं कारण होतं.”
“काहीही असो”
“अहो, अंब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला”
“दंड भरावा लागेल”
“साहेब, मी नियम पाळणारा माणूस आहे”
“असं तुम्ही म्हणताय पण आत्ताच सिग्नल तोडला हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालंय. ”
“सिग्नल मी एकट्यानेच तोडला नाही अजून चारपाच जण होते. ”
“पण सापडलेले तुम्ही एकटेच. बाकीच्यांना नोटिस जातीलच. ”
“चांगुलपणा दाखवला ही चूक झाली का? ”
“ते मला माहिती नाही”
“अहो, जरा समजून घ्या. सीरियस पेशंट असलेल्या अंब्युलन्ससाठी सिग्नल तोडला”
“तुम्हांला काय माहिती की ऍम्ब्युलन्समध्ये सीरियस पेशंट होता. ”
“अंदाज…. साधी गोष्ट आहे. थोडी माणुसकी दाखवली”
“त्यासाठी ट्राफिकचे नियम तोडायची गरज नव्हती. गाडी कडेला घ्यायची”
“एवढं मलाही कळतं पण जागा नव्हती म्हणून.. ”
“तुमच्यासारखे जंटलमन लोक असे वागतात आणि मग ट्राफिकच्या नावानं.. ”
“ओ, बास!! जास्त बोलू नका. इतका वेळ समजावतोय पण ऐकतच नाही. जनरली अशावेळी पोलिस मदत करतात पण तुम्ही..”
“नियम म्हणजे नियम”
“पण काही परिस्थिती अपवाद असतात ना. उगीच दुसऱ्या कोणाचा राग माझ्यावर काढताय. जाऊ द्या. ”
“मी कुठं थांबवलयं. तुम्हीच वाद घालताय. दंड भरा आणि जा”
आमची वादावादी सुरू असताना बघ्यांची गर्दी जमली. आधीच खूप उशीर झालेला त्यामुळे मी माघार घेत दंड भरून पावती घेतली आणि गाडी घेऊन निघालो तेव्हा संतापाने डोकं भणभणत होतं. काहीही चूक नसताना खिशाला भुर्दंड पडला तोही एक चांगलं काम केलं म्हणून… डोक्यात विचारांचं वादळ, मी वागलो ते चूक की बरोबर????
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈