श्री मयुरेश उमाकांत डंके
मनमंजुषेतून
☆ “पिढी अशीच घडवावी लागते” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
४) मनमंजुषा —
“ पिढी अशीच घडवावी लागते…. “ लेखक : मयुरेश डंके
” पिढी अशीच घडवावी लागते “
” तुमचा सगळा प्रोग्रॅम आधी पाठवा. ते वाचून मग ठरवतो. ” असा एक उद्धट फोन महिन्याभरापूर्वी आला. सहसा असले फोन आले की, मी किंवा पूर्वा उत्तरं देण्याच्या भानगडीत पडत नाही. ओळख पाळख नसणारा माणूस ‘मीच भारी’ अशा स्वरात अन् तोऱ्यात बोलायला लागला की, आम्ही पुढं काही बोलत नाही. त्यामुळं, आम्ही प्रतिसाद दिला नाही.
दोन दिवसांनी पुन्हा तोच फोन..
” तुम्ही पाठवला नाहीत प्रोग्रॅम.. मी पाठवा असं म्हटलं होतं तुम्हाला. ” समोरुन अरेरावी..
” पण मी ‘पाठवतो’ असं म्हटलं नव्हतं तुम्हाला. ” मी शांतपणे म्हटलं.
” तुम्ही पाठवा. ”
” आम्ही प्रोग्रॅम जाहीर करत नाही. तो आदल्या दिवशीच सांगितला जातो आणि केवळ नोंदणी केलेल्यांनाच. ”
” असं का बरं? ”
” गेली एकोणीस वर्षं आमची हीच पद्धत आहे. आम्ही प्रवासाचे डिटेल्स जाहीर करत नाही.”
” असं असेल तर मला माझ्या मुलाला पाठवण्यात इंटरेस्ट नाही. ” समोरुन जोरात आवाज.
” ठीक” मी म्हटलं अन् फोन ठेवून दिला.
तीन चार दिवस उलटून गेले. पुन्हा एकदा तोच फोन..
” मला माहिती पाठवा.. “
मी फोन ठेवून दिला. पुढचे काही दिवस वेगवेगळ्या फोन नंबर्स वरुन तो माणूस फोन करत राहिला. मी आमच्या नियमानुसार अनुभूती चा प्रोग्रॅम दिला नाही.
एके दिवशी माझ्या एका मित्राचा मला फोन आला.
” अनुभूतीच्या जागा भरल्या का रे? ”
” नाही अजून. का रे? ”
” अरे, एकजण तुला फोन करतायत. तू त्यांना कुठले कुठले गड किल्ले आहेत, याची माहिती दिली नाहीस, अशी त्यांची तक्रार आहे. तू त्यांना माहिती दे ना. ”
” अनुभूतीचे काही नियम आहेत रे. आम्ही प्रोग्रॅम आदल्या दिवशीच सांगतो. आणि तोही पूर्ण सांगत नाही. उद्या कुठं जायचं आहे तेवढंच सांगतो. संपूर्ण प्रोग्रॅम जाहीर केला जात नाही. ” मी सांगितलं.
” पण असं का? ”
” अनुभूती चा अर्थ काय? अनुभूती म्हणजे आपलं आयुष्य अधिक समृद्ध करणारा विलक्षण अनुभव. तोच तर या कार्यक्रमाचा प्राण आहे. आपण सगळी ठिकाणं सांगून टाकली की, लोक गूगल सर्च करतात, युट्यूब वर शोधून पाहतात. सगळी उत्सुकता, अप्रूप, आनंद घालवून टाकतात. मग त्या कार्यक्रमाचा उद्देशच साध्य होत नाही. “
” अरे, पण त्यातले अनेक किल्ले त्यांनी आधीच पाहिले असतील तर? मग त्यांना तेच तेच पाहावं लागणार नाही का? ”
” हे बघ. मी आठ वर्षांचा असताना पहिल्यांदा रायगडावर गेलो. आज ३२ वर्षं झाली, मी जवळपास चारशे हून जास्त वेळा तिथं जातोय. पण अजूनही असं वाटतं की, प्रत्येक वेळी तो गड मला वेगवेगळा दिसतो. ”
” पण तुला आवड आहे म्हणून तू सारखा सारखा तिथं जातोस. लोकांना तशी आवड नसेल आणि फक्त दहा दिवस काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणून पाठवायची इच्छा असेल तर? ”
“अनुभूती त्यांच्यासाठी नाहीच मुळी. कारण हा इतिहास, समाज, संस्कृती, परंपरा, ज्ञान, आपला वारसा यांच्याशी मुलांना नातं जोडायला शिकवणारा कार्यक्रम आहे. तो टाईमपास प्रोग्रॅम नाही. म्हणूनच असा विद्यार्थी आणि असे पालक आम्ही आमच्या गटात घेतच नाही. माझ्याहीपेक्षा जास्त पॉश कॅम्प्स आयोजित करणारे कितीतरी तज्ञ लोक आहेत. त्यांनी अगदी अवश्य तिकडं नाव नोंदवावं. पण माजुरडे पालक आणि विद्यार्थी आम्हाला नकोत. ”
” पण त्यांना त्यांच्या मुलाला तुझ्याच प्रोग्रॅमला पाठवायचं आहे. तुझा प्रोग्रॅम वेगळा असतो अन् मुलांना खूप शिकायला मिळतं, असं त्यांना अनेकांनी सांगितलं म्हणूनच त्यांना इंटरेस्ट आहे. ”
” मग त्यांनी आमचे नियम पाळायला हवेत. तेही कोणतीही तक्रार न करता. तू त्यांना हे स्पष्ट सांग आणि या विषयात अजिबात मध्यस्थी करु नकोस. ” असं सांगून मी विषय थांबवला.
काही वर्षांपूर्वी अनुभूती च्या प्रवासातच एका पालकांचा मला फोन आला होता. त्यांची मुलगी आमच्या सोबत होती. आणि “दहा दिवसांत एकदाही फोन करायचा नाही” अशीच अट सगळ्या पालकांना घातली होती. आम्ही कोल्हापुरात होतो. मला फोन आला.
” सर, तुम्ही कोल्हापुरात आहात ना… तिथल्या *** नावाच्या हॉटेलात बेस्ट नॉनव्हेज मिळतं. ”
“पण आपण अनुभूती मध्ये जेवण पूर्णतः शाकाहारीच असतं. हे आधीच स्पष्ट सांगितलेलं आहे. “
” सर, माझा एक जवळचा मित्र कोल्हापुरातच राहतो. तो तिला घ्यायला येईल आणि नॉनव्हेज जेवण करवून पुन्हा आणून सोडेल. तुम्ही सगळे तुमचं तुमचं व्हेज जेवण करा. ” मुलीचे वडील म्हणाले.
” तसं जमणार नाही. ” मी.
” आता कोल्हापूर मध्ये जाऊन नॉनव्हेज खायचं नाही, असं कसं चालेल? ”
” तुम्ही नॉनव्हेज खाऊ घालण्यासाठी तिला खास कोल्हापूर ला घेऊन जा. आत्ता मी इथून तिला कुणाहीसोबत सोडणार नाही आणि पुन्हा अशा गोष्टींसाठी मला फोन करु नका. ” ठणकावून सांगितल्यावर पुन्हा असा फोन आला नाही.
असाच आणखी एक प्रसंग. आम्ही सिंहगड – तोरणा असा ट्रेक करुन खाली उतरलो आणि विश्रांतीसाठी थांबलो. भल्या पहाटे माझा एक मित्र तिथं कार मधून पोर्टेबल शेगडी आणि आप्प्यांचं पीठ घेऊन आला. तीन शेगड्या होत्या. आणि आम्ही सगळे जण सेल्फ कुकिंग पद्धतीनं आपापले आप्पे करुन घेऊन मनसोक्त ताव मारत होतो. पण आमच्यात एक मुलगी होती.
“मला आप्पे नकोत. आमच्याकडे सारखेच केले जातात. तुम्ही खा, मी खात नाही. ” आम्ही सगळ्यांनी दोन तीन वेळा आग्रह करुन पाहिला, नंतर विषय सोडून दिला.
नाश्ता करुन आम्ही राजगड कडे रवाना झालो आणि माझ्या विशेष आवडीची गुंजवणे मावळाची वाट धरली. ती वाट खरोखरच घाम फोडणारी आहे. शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारी आहे. शेवटचा टप्पा आणखीनच आव्हानात्मक आहे. कारण तो दरवाजाच तशा कठीण ठिकाणी आहे. झालं.. हट्टानं
रिकाम्या पोटी बसलेल्या बाईसाहेब गुंजवण्याच्या जंगलातच फतकल मारुन खाली बसल्या. अंगातलं बळ संपलं होतं. पोटात भूक उसळ्या मारत होती. डोकं लागलं दुखायला. निम्मे जण वाट काढत वरती वरती सरकत होते. ते सगळे होते तिथं थांबले. ग्लुकोन डी आणि लिंबाचं सरबत पाजत पाजत तिला हळूहळू वरती आणलं. गुंजवणे दरवाज्याच्या उंबऱ्याशी बसूनच ती जेवली अन् मग अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर तिच्या अंगात त्राण आलं.
पण ह्या अर्धवट ज्ञानी हट्टी उद्योगामुळे अडीच तीन तासांचं खोबरं झालं. संजीवनी माची सोडून द्यावी लागली..! स्वतःचंच म्हणणं खरं करण्याची सवय अनेक मुलामुलींना असते आणि आयुष्यात अनेक ठिकाणी महागात पडते ती अशी…
फुटाणे, शेंगदाणे खाण्याची सवय आता “जुनाट” ह्या प्रकारात समाविष्ट झाली आहे. पेरीपेरी, फ्रेंच फ्राईज हे प्रकार आता रुढ झाले आहेत. मुलं पेरुची जेली खातील, पण पेरु खाणार नाहीत. जामुन शॉट घेतील, पण जांभळं खाणार नाहीत. मसाला पापड खातील, पण भाताचे सांडगे किंवा कोंड्याच्या पापड्या खाणार नाहीत. त्यांना लाह्यांचा काला माहितीच नसतो.
भल्या पहाटे गडावर चढून जावं. सकाळच्या उन्हात गड फिरावा. न्याहारी करण्यासाठी लाह्या, राजगिरा किंवा पोहे सोबत घ्यावेत. तिखट मिठाच्या डब्या असाव्यात. एका डबीत शेंगदाण्याचा कूट घ्यावा. बचकभर हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे असावेत. गड फिरुन झाल्यावर एखाद्या देवडीशी किंवा गडावरच्या देवळात बसावं. धोपटी उघडून सगळं साहित्य बाहेर काढावं. आजूबाजूला फिरुन दोन दगड शोधावेत. टाक्याच्या पाण्यानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. दगडावर दोन तीन मिरच्या अन् बोटभर आलं चांगलं ठेचून घ्यावं. लाह्यांवर पाण्याचा सपका मारावा. मग त्यात कूट, मिरच्या, आलं, तिखट, मीठ घालून एकत्र करुन घ्यावं. गडावरच्या गडकरणी भगिनींकडून सुगडातलं घट्ट कवडीचं दही घ्यावं. अन् दह्यात सगळं कालवून ताक घालून झकास काला तयार करावा. पोटभर खावा. वरुन पुन्हा दही, ताक रिचवून तृप्त मनानं ढेकर द्यावी. तिथंच पथारी पसरून दोन तास ताणून द्यावी. ह्यातलं सुख आपल्या मुलांना ठाऊकच नाही.
गडावर जाऊन तिथं फ्रूटीसारखी बाटलीबंद कोल्ड्रिंक्स पिऊन लोकांना नेमकं काय मिळतं हे मला आजतागायत समजलेलं नाही. लोक तिथंही पिझ्झा बर्गर मिळेल का हे शोधतात. आईस्क्रीम शोधतात. पण लिंबाचं सरबत त्यांना महाग वाटतं. वास्तविक पाहता, गडभ्रमंती करणाऱ्याच्या सोबत दोन चार लिंबं, दोन चार कांदे बटाटे असायलाच हवेत. थंडगार शिळ्या भाताचा डबा सोबत असला तरीही उत्तम. म्हणजे गडावरुन दही ताक मिळवून दहीभात ताकभात करुन खाता येतो. हे सगळं आपल्या मुलांनी आवर्जून अनुभवायला हवं. मनगटी घड्याळाशी असलेला संबंध जरा कमी करुन सूर्याच्या घड्याळानुसार जगायला हवं. म्हणजे मग नव्या जगाची ओळख व्हायला लागते. आणि हेच जग अत्यंत श्रीमंत, समृद्ध, निकोप आणि सर्वतोपरी उत्कृष्ट असल्याची अनुभूती येते.
आपल्या पूर्वजांची ज्ञानसमृद्धता किती उच्च दर्जाची होती, याचा परिचय आताच्या पिढीला होणं आवश्यक आहे. पुरातन लेण्या, मंदिरांवरची शिल्पकला, कोरीवकाम, योग्य दगडाची निवड, बांधकामाचा भक्कमपणा, पुष्करण्या, बारवा, पाण्याची टाकी, जिवंत झऱ्यांचा शोध ही केवळ भटकंती नव्हे. ही आपल्या पूर्वजांच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि कर्तृत्वाची जिवंत साक्ष आहे. ते वैभवच आपलं भूषण आहे. दऱ्याडोंगरांत, निबीड अरण्यात वसलेली देवस्थानं पाहणं, त्यांचा अभ्यास करणं आणि तिथली शांत प्रसन्नता अनुभवणं ह्यात जो आनंद आहे तो “मॉलोमॉल” भटकण्यात अन् प्ले स्टेशन खेळण्यात नाही, हे आपल्या मुलांना योग्य वयातच शिकवायला हवं. त्यांच्या करिअरमधला राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा स्कोअर जितका महत्वाचा आहे, तितकाच त्यांचा व्यक्तिमत्व विकाससुद्धा महत्वाचा आहे. त्यांची नाळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी घट्ट जोडली जाणं हे फार फार गरजेचं आहे. तरच हा वारसा जपणारे हात अन् त्याविषयीच्या संवेदना जागृत ठेवणारी मनं तयार होतील.
बलोपासना, मनोपासना, ज्ञानोपासना आणि राष्ट्रोपासना या चारही उपासना आपल्या मुलांनी नित्यनेमाने केल्या तर त्यासारखा व्यक्तिमत्व विकासाचा दुसरा उत्तम मार्ग नाही. ही उपासनेची चतु:सुत्री जितकी घट्ट रुजेल तितके आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचे वटवृक्ष तयार होतील आणि गगनाला भिडतील. उत्तमतेचं अन् चारित्र्याचं अधिष्ठान ज्याच्या आयुष्यात असतं, त्याचं भवितव्य उज्ज्वलच असतं.
ह्याच विचारानं “अनुभूती” ची सुरुवात आम्ही १९ वर्षांपूर्वी केली. यंदा सुद्धा दहा दिवसांची ही विलक्षण प्रेरणा देणारी आणि नवं आयुष्य जगायला शिकवणारी “अनुभूती” ८ मे ते १९ मे, २०२५ या कालावधीत आहे. दहा किल्ले आहेत, तीन जंगल ट्रेक आहेत, विविध पुरातन मंदिरं आहेत, समुद्रावर मनसोक्त खेळणं आहे, ऐन रत्नागिरीत आमराईतला अस्सल हापूस आंब्याचा आस्वाद घेण्याचा अनुभव आहे आणि अर्थातच रात्रीच्या अंधारात गड चढून जाण्याचा थरारक अनुभव तर आहेच…!
आपल्या मुलांना घडवण्यासाठी हे करायलाच हवं ना…
© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ
संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈