सौ. अस्मिता इनामदार
परिचय
जन्मतारीख – १३/१२/१९४५
शिक्षण – बी.ए. डी.सी.ओ.एस्
साहित्यिक कारकीर्द
दोन काव्यसंग्रह – कविता अंतरीच्या काव्यसंग्रह, शब्दुली चारोळीसंग्रह
दैनिके व मासिकांमधून कवितांना प्रसिद्धी, नवतरंग प्रातिनिधिक काव्यसंग्रहात कवितेचा समावेश
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग. ( सातारा , सांगली , पुणे , कराड , इंदौर , डोंबिवली )
अखिल भारतीय महिला कवयित्री परिषद , दिल्ली ह्या संस्थेचे सन्माननीय सभासदत्त्व, संस्कारभारती , सांगली साहित्यविभाग प्रमुख, स्पर्धा परीक्षक म्हणून नेमणूक, कवि विचारमंच, शेगाव कडून साहित्यातील योग
सांगली / कोल्हापूर आकाशवाणीवर काव्यवाचन
आरोग्य संवेदना , सांगली कार्यकारिणीत कार्यरत, महात्मा गांधी ग्रंथालय कार्यवाह
सम्मान / पुरस्कार – शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्कार, इतिहास संशोधन मंडळ , संगमनेर उल्लेखनीय काव्य पुरस्कार, प्रतिष्ठा प्रतिष्ठान , सांगली साहित्य पुरस्कार, सरोजिनी नायडू पुरस्कार दिल्ली येथे कविता अंतरीच्या पुस्तकाला, कै.सुरेश कुलकर्णी पुरस्कार – सुधांशू , औदुंबर, अनेक काव्यस्पर्धेत पुरस्कार, कल्पना फिल्म असो. कला मंच , मिरज – सन्मानपत्र, श्री समर्थ साहित्य , कला , क्रिडा व सांस्कृतिक युवा मंडळ , पलूस कडून कविता अंतरीच्या पुस्तकास पुरस्कार, बिझनेस एक्सप्रेस, सांगली काव्यस्पर्धेत उत्तेजनार्थ, रंगत संगत प्रतिष्ठान , पुणे – सन्मानपत्र, साहित्य प्रेमी मंडळ सोमेश्वरनगर , बारामती विशेष पुरस्कार, जिल्हा ग्रंथालय आयोजित ग्रंथोत्सवात उत्कृष्ट वाचक प्रमाणपत्र, आदर्श कार्यकर्ती संस्कारभारतीचा पुरस्कार,दानाबद्दल शब्दभारती पुरस्कार, ऑनलाईन स्पर्धांमधून ९४ प्रमाणपत्रे
☆ मनमंजुषेतून: सुवर्णक्षण- मोदी भेटीचा ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆
‘अजी सोनियाचा दिनु। वरुषे अमृताचा घनु।‘ म्हणावं, असा आनंदयोग एक दिवस माझ्याही आयुष्यात आला. त्या दिवशी पाडगावकरांच्या सुप्रसिद्ध गीतात एक-दोन शब्दांचा बादल करत मला म्हणावसं वाटलं, ‘तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे. तुझे गुण गाण्यासाठी शब्द लाभू दे.’ ‘तुझे’ म्हणजे, कै. लक्ष्मणराव इनामदार यांचे आणि तो सोनियाचा दिनु होता, 21 सप्टेंबर 2017. तो दिवस होता, कै. लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीचा. हा सोहळा साजरा झाला, तो दिलीतील विज्ञानभवन येथे आणि निमंत्रक होते. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी.
कै. लक्ष्मणराव इनामदार हे माझे चुलत सासरे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ते गुरू. ते वकील होते. ते मुळचे महाराष्ट्रातले असले, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी, संघप्रचारक म्हणून गुजराथमध्ये गेले आणि तिथेच स्थायिक झाले. ते ब्रम्हचारी होते. गुजराथमधील भ्रमंतीतच त्यांची आणि मोदीजींची भेट झाली. त्यांच्या कार्याचा प्रभाव मा. मोदीजींवर पडून ते संघाकडे ओढले गेले. लक्ष्मणरावांना त्यांनी आपले गुरू मानले. ‘आयुष्यात मी जो काही घडलो, ते केवळ वकीलसाहेबांमुळेच (लक्ष्मणरावांमुळेच),‘ असे उद्गार त्या समारंभात मोदीजींनी काढले आणि आम्हाला धन्य धन्य वाटले. समाजातील आर्थिक दुर्बलता दूर करण्यासाठी लक्ष्मणरावांनी ’सहकार भारती’ या चळवळीचा पाया घातला. ‘विना संस्कार नही सहकार’ हे त्या चळवळीचे बोधवाक्य होते. हा मंत्र मोदीजी आजही आचरणात आणतात.
21 सप्टेंबर 1917 हा लक्ष्मणरावांचा जन्म दिवस. 2017 ला या दिवशी त्यांचा जन्मशताब्दीचा सोहळा साजरा करावा, असे मोदीजींच्या मनात आले. त्याची रूपरेखा आखताना, लक्ष्मणरावांच्या परिवारातील मंडळींनाही त्यात सामील करून घ्यायला हवे, असे मोदीजींना वाटले. त्या दृष्टीने त्यांनी आखणी करायला सुरुवात केली. लक्ष्मणरावांच्या परिवारातील व्यक्तींचा शोध घेतला गेला. प्रत्येकाला स्वतंत्रपणे आमंत्रणे पाठवली. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आग्रहपूर्वक निमंत्रणे दिली गेली. त्याप्रमाणे आम्ही 20-22 जण 21 सप्टेंबर २०17 रोजी बरोबर दहा वाजता दिल्लीयेथील विज्ञानभवनावर हजार झालो. दारावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. सभागृहातील २-३ रांगा खास आमच्यासाठी राखीव ठेवलेल्या होत्या. आमचे स्वागत करून मोठ्या सन्मानाने आम्हाला आमच्या जागी बसवले गेले. खुर्च्यांवर आमच्या नावाच्या पट्ट्या लावलेल्या होत्या. बरोबर ११ वाजता पंतप्रधान सभास्थानी आले. सुरूवातीला लक्ष्मणरावांच्या तैलचित्राचे अनावरण झाले. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या गेल्या. मा. मोदीजींनी आपल्या भाषणात त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. दोन वाजता उपस्थितांचे भोजन झाल्यावर समारंभाची सांगता झाली.
आम्हा इनामदार परिवारातील सर्वांना मोदीजींनी संध्याकाळी चार ते पाच यावेळात भेटायला बोलावले. आम्ही सर्वजण बरोबर चार वाजता जनपथावरेल त्यांच्या निवासस्थानी पोचलो. एका हॉलमध्ये आमच्या भेटीची व्यवस्था केली होती. तिथे त्यांनी आम्हा प्रत्येकाची स्वतंत्रपणे ओळख करून घेतली. कोण कोण कुठे असतं, काय काय करतं, प्रत्येकाचे लक्ष्मणरावांशी काय नाते आहे, याची चौकशी केली. या प्रसंगी त्यांनी लक्ष्मणरावांच्या अनेक आठवणी सांगितल्या. आम्ही दिलेल्या भेटी त्यांनी स्वीकारल्या. यावेळे मला त्यांना अगदी जवळून पाहता आलं. पाच मिनिटे त्यांच्याशी बोलता आलं. त्यांना हार घालून त्यांच्याबद्दलची भावना विकत करता आली. त्यांचं ऋजु व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी समरसून बोलणं, त्यांचा शालीन, हवाहवासा वाटणारा सर्वत्र सहज वावर यामुळे मी अगदी भारावून गेले. माझ्यासाठी त्यावेळी जसा ‘अमृताचा घनु बरसला’ आणि तो ‘सोनियाचा दिनु झाला.
त्यावेळी आमच्या इनामदार परिवारासोबत त्यांचा फोटो काढला. आजही तो फोटो पाहताना ते आंनंदक्षण माझ्यापुढे साजिवंत होतात.
© सौ अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
भाग्यवान आहात.
आपल्या साहित्य चे स्वागत आहे .