सौ.अंजली दिलीप गोखले
🪷 मनमंजुषेतून 🪷
☆ एक गमतीदार प्रवास ☆ सौ.अंजली दिलीप गोखले ☆
☆
काही दिवसापूर्वी आम्ही दोघी मैत्रिणी कामासाठी बेळगावला सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलो. जाताना लवकरच निघालो. स्टेशनवर जाऊन तिकीटे काढली समोरच जोधपूर बेंगलोर एक्सप्रेस लागलेली दिसली.
२-३ बोगीमध्ये चढून पाहिले भरपूर गर्दी. कोठेच बसायला जागा सापडेना. पुनः खाली उतरून दुसऱ्या बोगीत शोध! आमची धावपळ बघून इडल्या विकणाऱ्या भैयाने सांगितले, “बहेनजी, जल्दी बैठो कही भी गाडी छुटने वाली है। भीड तो है ही।” पटदिशी आम्ही चढलो. आत गच्च गर्दी. गर्दीतच सरको सरको म्हणत कशातरी टेकलो तोच गाडी सुटली.
हुश्य करून नजर फिरवली तर बापरे. सगळीकडे बिहारी बसलेले. त्यांचे ते अवतार, नजरा बघून सकाळच्या थंडीत घाम फुटला. महिलांसाठी सेपरेट जागा असते तशी ही बोगी पुरुषासाठी राखीव का आहे असेच वाटले. त्यांचे खोकणे शिंकणे पाहून आम्ही पर्स मधून मास्क काढून आमची सुरक्षा वाढवली.
लोकांची सारखी ये जा सुरु होती. कडेला बसल्यामुळे धक्के खावेच लागत होते तेवढ्यात ढोल घुंगरू वादन सुरुझाले. बरोबरची डोक्यावरून पदर लपेटलेल्या बाईने रामाचा धावा भसाड्या आवाजात सुरु केला. एक हात पुढे पसरून पैसे मागणे सुरु. नेमके आमच्याकडे सुटे पैसे सापडेना. दहाची नोट दिल्या शिवाय गत्यंतर नव्हते.
आम्ही दोघी शेजारी खेटून बसूनही बोलायला काही मिळेना. चहा वाले, इडली वडा यांची ये जा तर अखंड!
बाहेर हिरवीगार शेती डोळ्याला दिलासा देत होती. निसर्ग मुक्तपणे आपले सौंदर्य उधळत होता. ते पाहून मात्र मन प्रसन्न झाले. शेतात ऊस डोलत होता. हिरवीगार पालेभाजी मनाला तजेला मिळवून देत होती.
स्टेशनवर आणखीन प्रवासी चढतच होते उतरायचे मात्र कोणीच मनावर घेत नव्हते. कसे तरी अडीच तास गेले आणि बेळगावच्या खुणा दिसायला लागल्या. मनोमन हुश्य झाले पण हाय! मध्येच रेल्वे थांबली ते थांबलीच. का तेही समजेना. बिहारी चे आवाज वाढले. गप्पा वाढल्या. खाण्याचे डबे उघडून खाणे सुरु झाले आम्हाला तर हालताही येत नव्हते. कुणीकडून आज चाललोय प्रवासाला असेच वारंवार मनात येत होते.
अर्ध्या तासाने एकदाचा प्रवास पुनः सुरु झाला. गाडीच्या दोन्ही बाजूंना आता घरे सुरु झाली. इतकी जवळ घरे की आतले सगळे दिसत होते. लहान मुले हात वर करून खदा खदा हसत होती. बायका बाहेरच भांडी घासत होत्या. दोन्ही कडच्या घरांमधून गाडी सुसाट धावत होती.
अखेर एकदा बेळगाव स्टेशन आले. हुश्य करून खाली उतरलो. बेळगाव स्टेशन छान स्वच्छ आहे.
काम झाले की आम्हाला लगेचच परतायचे होते. पुढचा परतीच्या प्रवासाचीच धास्ती होती. आमचे तिथले काम अपेक्षेपेक्षा खूपच पटकन झाले. रेल्वे पकडायची म्हंटले तर ३-४ तास उगीचच थांबायला लागणार होते म्हणून एस. टी. चा प्रयत्न करायचे ठरवले.
कर्नाटक मध्ये आलोय म्हणजे डोसा तर खायलाच पाहिजे. म्हणून त्यावर ताव मारला आणि बेळगाव एस टी स्टँडवर आलो. अपेक्षेपेक्षा जास्त स्वच्छ आहे फार गर्दीपण नव्हती.
आता मात्र आमचे लक जबरदस्त होते. मिरजला जाणारी बस स्टँडवर तयारच होती. आम्ही पटकन चढलो. बसमध्ये बसायला छान जागा मिळाली.
पाच मिनीटांत बस सुटली. आम्ही महाराष्ट्री असल्यामुळे आम्हाला पूर्ण तिकीट काढावे लागले आणि पुढे खरी गम्मत सुरु झाली बस हायवे वरून जाणार नव्हती. छोट्या छोट्या गावांचे स्टॉप घेणार होती.
पहिला स्टॉप आल्या बरोबर कर्नाटकी महिलांची झुंड दारापाशी धावत आली आणि बसमध्ये मोर्चा आल्या सारख्या महिला अक्षरशः घुसल्या. टिपिकल साड्या, डोक्यात गजरा, नाकात चमकी. गळाभरून मोत्याच्या माळा, घसघशीत मंगळसूत्र आणि कन्नड बोलणे. बघता बघता बस खचाखच भरली. ड्रायव्हर कंडक्टर आणि जेमतेम सहा सात पुरुष प्रवासी. बाकी सगळ्या महिला. सगळ्याजणी कुठल्याशा यात्रेला चालल्या होत्या.
येताना रेल्वे मध्ये आम्ही दोनच महिला आणि आता कसे बसे बिचारे ७-८ पुरुष. तिकडे महिलांना बसप्रवास पूर्ण मोफत त्यामुळे ता आनंदात सगळ्या यात्रेला चालल्या होत्या. कंडक्टरचे काम पैसे घेऊन तिकीटं काढणे नाही तर त्यांचे आधारकार्ड तपासणे. तो आपले प्रत्येकीचे कार्ड नुसते बघूनच परत करत होता. बिचारा गर्दीमध्ये घामेघूम झाला होता.
पुढचे स्टॉप आले की बायका अजूनच येत होत्या. एक सिट कशीबशी रिकामी झाल्यावर दुसऱ्या बाईने पटकन बसकण मारली आणि झाले, खिडकी शेजारची बाई डोळे वटारून तिच्या दंडाला ढकलायला लागली. तोंडाने डब्यात दगड खडबडल्या सारखी बडबड सुरु होती. बसलेली बाई पण कमी नव्हती. तिचाही जोरजोराने बड बड करत हातवारे करून ड्रामा सुरु झाला. दोघीही थांबायला तयार नव्हत्या. दोघीचे आवाज टिपेला पोहोचले. ढकलाढकली सुरु झाली. कंडक्टरने बेल वाजवून बस थांबवली.
आता इतर बायकांचा गलका वाढला. कंडक्टर जोरात ओरडला. त्यातला पोलीस शब्द तेव्हढा कळाला. बापरे ! पुढे काय होणार म्हणून आमच्याच पोटात गोळा आला.
पण त्या वाक्याचा अर्थ कळाल्यामुळे बसमध्ये एकदम सन्नाटा पसरला आणि कंडक्टरने डबल बेल मारली. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
छोटी छोटी गावं येत होती. चार महिला उतरल्या की दहा घुसत होत्या. गावाची नावपण आम्हाला समजत नहती कारण सगळी कन्नड मध्ये. थोड्या वेळाने एक मोठे गाव आले एका दुकानाच्या बोर्डवर इंग्रजी नाव दिसले : हुकेरी !
इथेही स्टॅडवर गर्दी ! दोन जाडजुड राजस्थानी लमाण्या वाटाव्या अशा महिला सगळ्याना ढकलत आत चढण्यात यशस्वी झाल्या. यानी आमच्या सारखेच फुल तिकीट काढले. त्या दोघीमुळे कंडक्टरलाच जागा राहिली नाही. बस इतकी गच्च भरली होती पण ड्रायव्हर सराईतासारखा जोरात गाडी हाणत होता.
कर्नाटकात बस फुकट शिवाय प्रत्येकीला २००० रु दर महिना मिळतात म्हणे त्यामुळे शेतात काम करायला कोणी तयार नाही. पुरुषांना घरी बसवून बायका सतत फिरत रहातात असे ऐकले.
पूर्वीचे घर, चूल आणि मूल हे या महिलांनी कधीच झिडकारलय. आता पुरुष बिच्चारे झालेत कारण त्यांना काम ही करावे लागते, पैसाही मिळवावा लागतो आणि अशा वांड बायकाना सांभाळत संसार करावा लागतो.
भावाना बहिणींचा फारच पुळका आलाय खरं पण पुढे काय वाढून ठेवलय परमेश्वर जाणे !
आमचा स्टॅण्ड आल्यावर हुश्य करून उतरलो आणि बेळगावच्या बसला टाटा करून घरची वाट धरली.
☆
© सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈