सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
देवळांच्या नावांची गंमत…
श्रीजोगेश्वरी आईच्या अगदी समोरून रस्ता जातो ना, तो दातार व दीक्षित वाड्यावरून फरासखान्यापर्यंत पोहोचतो. पुढे एक सुंदर हौद होता तिथे शंकराची मूर्ती व शिवलिंग होत. मध्यभागी असलेली ऐटदार बाहुली तिच्या डोक्यावरचा डेरेदार घडा त्यातून उसळणार, चमचमणारं कारंज आणि हौदातले सूळकन सटकणारे मासे हे आम्हा मुलांचं प्रचंड आकर्षण होत. तिथेच आता दगडूशेठ गणपती विराजमान झाले आहेत. तसेच दगडूशेठ यांच्या नावाचं दत्त मंदिर बाबुगेनू चौकाजवळ आपल्याला दिसतं. अप्रतिम तेजस्वी अतिशय देखणे दत्तगुरु पाहतांना भान हरपून जात. गणपती शेजारी मजूर अड्डा, फरासखाना आणि हुतात्मा भास्कर दा. कर्णिक यांचा स्मृती स्तंभ अजूनही जुन्या स्मृती जागवत ठामपणे उभा आहे. पुढच्या बेलबाग चौकात सिटी पोस्ट, नगर वाचन मंदिर, कोपऱ्यावरचं स्वस्त आणि मस्त बायकांचं आकर्षण ठरलेल साड्यांचे दुकान ‘मूळचंद क्लाथ ‘अजूनही आपलं नांव राखून आहे. या चौकात आल्यावर पुण्याबाहेरच्या लोकांचे पाय फडणीसांच्या बेलबागे कडे हमखास वळतात. अजूनही पूर्वजांचा अभिमान बाळगणारे फडणीसांचे वंशज तिथे राहतात. श्रीविष्णू दर्शनाबरोबर मोरांची भुरळ लोकांना पडते. बाहुलीच्या हौदा कडून डावीकडच्या रस्त्याने शनिवार वाड्याचे बुरुज, पेशवे कालीन श्री गणेश देऊळ, आणि प्रचंड दरवाजाचा शनिवार वाडा पर्यटकांना साद घालतो. तिथलं विस्तीर्ण मोकळं पटांगण म्हणजे आमची सायकल प्रॅक्टिसची हमखास जागा होती. जोगेश्वरी जवळच्या ‘कुलकर्णी अँड सन्स’ मधून एक आणा तासाने भाड्याची सायकल घेऊन आम्ही सीटवर न बसता नुसती सायकल चालवत शनिवारवाडा गाठत होतो. आप्पा बळवंत चौकात फारशी गर्दी नसायची. पण प्रचंड भीतीमुळे पायडल वरचा पाय जमिनीवरच पडायचा. एकदा वसंत टॉकीजला ‘मेरी झाशी नही दूँगी’ हा सिनेमा बघितला. झाशीची राणी डोक्यात शिरली. बाहू स्फुरायला लागले, मग ठरवलं जोगेश्वरी पासून एकदम सीटवर बसूनच सायकलवर स्वार व्हायचं. झाशीच्या राणीचा प्रभाव दुसरं काय! ☺️जिद्दीने चंद्रबळ आणून वळण पार करून प्रभात टॉकीज जवळ आलो. समोर हेsss भल मोठ्ठ नवीन सिनेमाचं पोस्टर लागल होत, त्यात सायकल वरून बागेत फिरणारा नट्यांचा घोळका होता. पोस्टरवर आम्हीच असल्याचा भास झाला, आणि काय सांगू!ते स्वप्न रंगवताना आम्ही एका सायकल स्वाराला धडक दीली. एक सणसणीत शिवी आणि” मरायचंय का?” हे शब्द कानावर पडता क्षणी स्वप्न तुटलं ” घूम जाव” म्हणत चपळाईने मागे वळलो आणि काय सांगायचं तुम्हाला? अहो!नंतर कितीतरी दिवस सायकलिंग बंद पडलं. सासरी केल्यावर मात्र धुळ खात पडलेली सायकल चकचकीत केली. रेल्वे क्वार्टर गावाबाहेर असल्यामुळे मुलांना डबल सीट शाळेत सोडणं, महिन्याचा किराणा भाजी आणण हा पराक्रम सायकलवर बसून करता आला. कारण शनिवार वाड्यासमोरच्या मोकळ्या पटांगणातल्या बटाट्या मारुतीला लहानपणी नवस केला होता ना!नवल वाटलं नां नांव वाचून? हो बटाट्या मारुतीच होता तो. लोखंडी लांबलचक सळ्यांच्या भिंतीच ते छोटसं टुमदार मारुती मंदिर होत. भांग्या मारुती झाला, गावकोस मारुती झाला, आणि हो भाऊ महाराज बोळाजवळचा जिलब्या मारुती पण कळला. परमराम भक्त मारुतीराया तुला आमचा शिरसाष्टांग नमस्कार.
– क्रमशः…
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈