सुश्री नीता कुलकर्णी
☆ “गौरीताई…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
माझी नातं पहिलीत असतानाची गोष्ट. शाळा सुटल्यावर संध्याकाळी रोज मी तिला बाल रंजन केंद्रावर घेऊन जातं असे.
तिथे मुलांचे छोटे छोटे वयानुसार गट केले जातं असतं. अठरा एकोणीस वर्षाच्या मुली… म्हणजे
“ताई” या मुलांना खेळ शिकवतं असतं. प्रार्थना, श्लोक, गाणी, गोष्टी, व्यायाम, ग्राउंड ला चक्कर असे तिथे चालतं असे.
त्या दिवशी गेले तर तिथल्या प्रमुख बाईंनी आमच्या ग्रुपला सांगितले की..
“नेहमीची ताई एक महिना रजेवर आहे. तर ही नवीन गौरीताई मुलांना महिनाभर शिकवणार आहे. “.
पाच फुटाची, सावळी, एकदम हडकुळी पण तरतरीत अशी मुलगी समोर आली. तिने आम्हा सर्वांना नमस्कार केला. मुलांना म्हणाली,
“बच्चे कंपनी चलो”
मुलं तिच्यामागे गेली. आम्ही पालक नेहमीप्रमाणे कट्यावर जाऊन बसलो.
एक आजोबा म्हणाले,
“ही एवढीशी तर पोरगी आहे… ही काय शिकवणार मुलांना? “
“हो न… हिला पाहिल्यावर माझ्याही हेच मनात आलं” दुसरे एकजण म्हणाले.
झालं… लगेचच तिच्या दिसण्यावरून अजून एक दोघांनीही कुठल्या कुठल्या कॉमेंट्स केल्या….
एक जण तर स्पष्ट म्हणाली,
” आपण मॅडमना सांगु ही मुलगी आमच्या ग्रुपला ताई म्हणून नको “…
“लगेच आजचं सांगायच”
” कोणीतरी म्हटलं चार दिवस जाऊ दे मग बघू…. नंतर सांगू”
तिला बघितल्याबरोबर अशी सगळी चर्चा झाली.
जरा वेळाने बघितलं तर आज राऊंड घेताना मुलं वेगळीच पळत होती. हसण्याचा आवाज ऐकू येत होता.
मुलं आज नेहमीपेक्षा जास्त आनंदात होती.
गौरीताई काहीतरी सांगत होती मुलं शांतपणे ऐकत होती. मधेच मुलांचा एकदमच ओरडण्याचा आवाज ऐकू आला…. नंतर मात्र मुलं फार हसत होती. आम्ही लांब बसलो होतो त्यामुळे काय चाललं आहे हे समजत नव्हते.
घरी निघताना मुलं गौरी ताईला अच्छा, टाटा, बाय-बाय करत होती. माझी नातं तर फार खुश होती. घरी जाताना रस्ताभर गौरीताईच कौतुक सुरू होत..
” गौरीताईंनी आज आम्हाला तुरुतुरु चालायला शिकवलं. इतकी मज्जा आली…. “
” तुरुतुरु ” हा शब्द तर तिला फारच आवडला होता.
” आजी गौरीताईंनी वाघाची गोष्ट सांगितली तिने वाघाचा आवाज काढला. आम्हाला तर भीतीच वाटली होती”
” म्हणून तुम्ही मगाशी ओरडत होता का”
” अग हो… ती म्हणाली मागे बघा खरंच वाघोबा आलेला आहे. आम्ही सगळ्यांनी मागे बघितलं तेव्हा ताई हसत होती. “
दुसरे दिवशी ग्राउंड वर जाताना नातं भलतीच उत्साहात होती. दरवाजातच माझा हात सोडून ती गौरीताई कडे पळाली.
गौरी मजा… मजा करत मुलांना शिकवत होती. आज दोन्ही हातांच्या मुठी हनुवटी खाली धरून तिने मुलांना पळायला सांगितले. मुले मस्त हसत होती…. गंमत करत होती… त्यांना हे वेगळं खेळणं आवडलं होतं. एकदा तिने मुलांना लुटुलुटू चालायला सांगितलं. खरंतर चालणं नेहमीच होतं पण लुटुलुटु शब्दाची मुलांना फार गंमत वाटत होती.
सगळ्यांना गोल उभ करून तिने हात पकडायला लावले. एक-दोन-तीन म्हटलं की सगळ्यांनी मध्यभागी जवळ यायचं चार-पाच सहा म्हटलं की लांब जायचं अशी खेळण्यात तिनी गंमत आणली होती.
गौरीला रोज नवीन काहीतरी सुचायचे. गोष्ट अगदी छोटीशीच असायची… पण त्यातल्या वेगळे पणाने मुलं त्यात रंगून जायची.. गुंगून जायची…
काही दिवसातच गौरीताई सगळ्यांची लाडकी झाली होती. बघता बघता महिना संपला. आज तिचा शेवटचा दिवस होता.
मुलांना वाईट वाटत होतं. ताई आता येणार नाही, परत भेटणार नाही म्हणून मुलांना खरोखरं रडू येत होतं.
तिचेही डोळे भरून आले होते. ती छोटीशी हडकुळी सावळी गौरी समोर होती…..
मुलं म्हणत होती,
” गौरीताई तुच आम्हाला शिकव ना “
“ताई किती छान आहे”
” ताई तु मला फार आवडतेस”
“ताई तु जाऊ नको ना”
ताई तुच आम्हाला हवी आहेस”
” ताई किती छान शिकवते”
मुलं अक्षरशः तिच्या ड्रेसला पकडून गोल उभी होती….
ती दोन्ही हातांनी मुलांना जवळ घेत होती. त्यांच्या पाठीवरून डोक्यावरून, गालावरून… हात फिरवत होती…
सगळ्या मुलांचा निरोप घेऊन ती निघाली…
तिचेही डोळे वहात होते…
ती लांबवर जाईपर्यंत मुलं हात हलवत उभी होती…
मी बघत होते…
माझ्या मनात विचार आला..
या मुलीकडे बघून आम्ही कधी असं म्हणू का? तिला पहिल्यांदा बघितल्यानंतर केलेल्या कॉमेंट्स मला आठवल्या.
या छोट्या मुलांना तिच्या रंग, रूपाचं, ऊंचीच काहीही देणघेणं नव्हतं…
ते तिच्या गुणाच्या प्रेमात पडले होते. तिच गुणगान करत होते… निखळं आणि निर्मळं मनाने… तिच्याकडे पाहत होते.
मुलं खरचं निरागस होती.. मनानी स्वच्छ होती..
त्या सात आठ वर्षाच्या मुलांकडे जे सात्विक निर्मळ मन होतं ते आमचा होतं का? तर खरचं नव्हते…
त्यांच वागणं बघुन मला आम्ही काय करायला हवे आहे हे समजले. त्यांच्याकडून काय शिकायला हवे हे पण समजले…
आम्ही अगदी वरवरचं बाह्यरूप बघतो आणि लगेच कोणालाही सहज प्रतिक्रिया देतो… ती ताना त्याला काय वाटेल किंवा तिला काय वाटेल याचा आम्ही कधी विचारही करत नाही.
” किती बारीक झाली आहे “
नाहीतर… ” किती जाड झाली आहे”
” केस किती गेले टक्कल पडायला लागले. “
“केस पांढरे झाले आहेत.. “
“डाय तरी करायचा “
“ही नीटच राहत नाही “
“कसले कपडे घातले आहेत”
” ईतक्यातच चष्मा लागला का? “
” पोट किती सुटलय… “
वगैरे वगैरे…..
तशी यादी खूपच मोठी आहे…
किती आणि काय लिहु… आणि तुम्हाला ती माहित आहे….
हे आठवले म्हणूनच आज आठवणींच्या पेटीतून गौरीताईला बाहेर काढलं…. त्या एक महिन्यात मी तिच्याकडूनही काही गोष्टी शिकले. म्हणूनच मी पण तिला गौरीताईच म्हणणार…
तिची गोष्ट तुम्हाला पण सांगावी म्हणून सांगितली…
नुसती गोष्टच तुम्हाला सांगायची होती का? ….
मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला आता कळलेलेच आहे…
तसे… तुम्ही सुज्ञ आहातच…. करा विचार…
सांगायला नकोच….
थांबते इथे….
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
पुणे
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈