मनमंजुषेतून
☆ बाई रामचंद्र सिंदकर ☆ डॉ दिपाली घाडगे ☆
व्यक्तिचित्रण – बाई रामचंद्र सिंदकर
जन्म-१९३२.
वय वर्ष -८७
बाई म्हणजे माझ्या सासूबाई, दहाबारा दिवसांपूर्वी त्यांचे देहावसन झाले.मला अखंड कुतूहल वाटायचे त्यांच्या नावाबद्दल, व्यक्तिमत्वा बद्दल आणि एवढ्या दीर्घायुष्याबद्दल.
इथे माझ्या सासऱ्यांचा उल्लेख केलाच पाहिजे ‘ कै नारायण घाडगे ‘ सहा फुटांपेक्षा जास्त उंची, गौर वर्ण आणि चेहऱ्यावर कायम एक प्रसन्न,समंजस हास्य,कुठल्याही मदतीला सदैव तत्पर व्यक्तिमत्व. मी सुरुवातीला त्यांना पाहिलं ते लाल रंगाचा स्वेटर घालून घराजवळच्या बागेत बंबासाठी लाकडे फोडताना. त्या
पोशाखात त्यांचे व्यक्तिमत्व अगदी एखाद्या इंग्रजी पिक्चर मधील कलाकारासारखे दिसत होते.
याच्या अगदी विरुध्द बाईंचे व्यक्तित्व. ठेंगणाठुसका बांधा, सावळा नाहीच काळ्याकडे झुकणारा वर्ण आणि नाकीडोळी मात्र ठसठशीतपणा,कपाळावर मोठे कुंकु आणि चेहऱ्यावर आत्म प्रौढी मिरवणारे दिमाखदार हास्य.त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा स्वभाव प्रतीत व्हायचा.अखंड स्वत:च्या तालात असणारे व्यक्तित्व.जणू तो अहंकार त्यांच्या
शरीरालाच चिकटलेला होता आणि तो शेवटपर्यंत तसाच राहिला.
त्याच्याकडे प्रचंड बुध्दीमत्ता होती, नेतृत्वगुण होते शिवाय ज्ञानप्राप्तीची आवड होती,त्यामुळे सतत सल्ला विचारण्यासाठी माणसे येत असत.कधीही फक्त स्वतः च्या कुटुंबाचा विचार करायचा नाही, आपल्या मुलांबरीबरचं त्यांच्या मित्रांनाही खाऊपिऊ घालायाचे.त्या काळी एस टी मध्ये काम करणाऱ्या माणसाचे उत्पन्न ते किती असायचे,पण त्यातूनही सतत परोपकार करत राहायचे.आपली पाच मुलं जशी तशी ती सुध्दा आपलीच मुलं मानायच्या आणि त्यांना शिकण्या साठी सक्रिय प्रोत्साहन द्यायच्या.
त्याची पाचही मुले उच्च शिक्षित आणि आपापल्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणारी.त्या स्वतः साठ वर्षांपूर्वीच्या म्याट्रिक आणि माझे सासरे संस्कृत मध्ये एम ए होते.(कै नारायण घाडगे विट्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेतील सुरुवातीच्या शिक्षकांपैकी एक होते) त्यामुळे दोघांनाही शिक्षणाविषयी आस्था होती.त्याची मुले माझे मोठे दिर श्री अविनाश घाडगे मुख्याध्यापक म्हणुन निवृत्त झाले, श्री दिनेश घाडगे विट्यातील शिवसेनेचे संस्थापक, श्री सुरेश घाडगे सोलापूर ट्रेनिंग सेंटर येथे DYSP म्हणुन कार्यरत, कै अधिवक्ता सतीश घाडगे प्रथितयश वकील, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे तालुक प्रमुख होते आणि कै राजेश घाडगे यशस्वी वेट लिफ्टर होते.
या सर्वांबरोबर श्री लालासाहेब पवार आणि श्री अरुण फडतरे हे त्यांचे मानसपुत्र देखिल उच्चशिक्षित झाले. पवार सरांनी शेवटपर्यंत त्यांची सेवा केली, त्यांचा कोणताही शब्द डावलला नाही.
बाईंचे माहेर वाई. अागदी नदीकाठालगत ब्राम्हणपुरी मध्ये. त्यामुळे शुद्ध सडेतोड भाषा, ओचा पदर खोचलेली नऊवार साडी आणि आंबाड्यावर खोचलेले एखादे फूल नेहमीच त्यांना शोभून दिसत असे. त्यांचे माहेर देखिल सुशिक्षितच. वडिल शिक्षक होते आणि भाऊ मामलेदार, आई मात्र लहानपणीच वारलेली मग कर्तेपणाने लहान बहिणींची लग्ने बाई भावजींनीच करुन दिली. त्यामुळे सारेच सासऱ्यांना भावोजी म्हणू लागले.
बाई आपल्या वडिलांकडून काही औषध देण्यास शिकल्या होत्या. त्यामुळे काविळीचे औषध घेण्यासाठी त्यांच्याकडे बरेच लोक येत. त्या देखिल सकाळी सकाळी ओचा पदर खोचून, आजूबाजूला फिरून काही वनस्पती गोळा करत आणि त्या वाटून रस काढून पिण्यास देत, वरुन काही पथ्य सांगत.त्यामुळे मी डॉक्टर असले तरी सुरुवातीला आमच्याकडे येणारे रुग्ण बाईंकडून औषध घेण्यासाठी येत.
अशी ही कृष्णा काठची लेक घाडगेवाडी सारख्या दुष्काळी गावात आली आणि त्या गावची होतकरू व्यक्ती झाली.
तिथली खडकाळ शेती विट्यातील मैत्रिणींना बरोबर घेऊन केली.
या कृष्णा काठच्यां लेकीचे सासरीही तसेच लाड झाले, शिकलेली ज्ञानी म्हणुन. अगदी तिच्या थोरल्या जावेणे, म्हाताऱ्याआईने, इंदुला सिनेमा बघायला आवडते म्हणुन
आपल्या दिराला बैलगाडी जुंपायला सांगावे आणि ती परत येईपर्यंत भाकरी कालवण करुन ठेवावे.
पोथ्या, पुराणे, पचांग जाणत असल्या तरी बाई विचाराने पुरोगामी होत्या. रोजचे वर्तमान पत्र वाचणे आणि टीव्ही वरच्या बातम्या पाहणे हे त्यांचे शेवटच्या पाचसहा वर्षां पूर्वीपर्यंत चे छंद होते. आपल्या मुला, नातवंडांनी आपल्या मर्जीने केलेली लग्न त्यांनी स्वीकारली होती.
आम्हा सुनांच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्वभावानुसार फार लावून घेतले नाही, पण आमच्या शिक्षणाला व्यक्तिमत्व विकासाला कधी बाधा आणली नाही. माझ्या मोठ्या जाऊबाईंच BA Bed, नंतरच्या BSc,नंतर MSc Bed आणि माझे BAMS या साऱ्या पदव्या लग्नानंतर घेतल्या गेल्या आहेत आणि आम्ही साऱ्याजणी स्वतः चा पायावर उभ्या आहोत, यातच सारे काही आले.
बाईंच्या नातसूनांनीही ही परंपरा पुढे चालवली. सौ कविता MA Bed, सौ अमृता Phd,. सौ अनुजा ME, त्याचबरोबर त्यांची सारी नातवंडेही उच्च शिक्षित असून विविध ठिकाणी कार्यरत आहेत.
त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नातावंडाला दिलेले वेगवेगळे नाव बाळक्या,गुंड्या,पप्या ही त्यापैकी काही. सगळ्यात लहान नात म्हणजे माझी मुलगी.तिला त्या नेहमी आवडे या नावानेच हाक मारत. असा बाईंच्या वारसांचा वटवृक्ष विस्तारला आहे. एक सुफळ संपुर्ण आयुष्य त्यांना लाभले.
सारं आयुष्य भरल्या घरात, खूप माणसं अवतीभोवती असं गेलं त्यामुळे थोडथोडक काही करायचं माहीतच नाही, जे केलं जायचं ते अगदी डबे भरभरून असायचं.भाकरी चपाती बरोबर पुरणाची पोळीही पोळपाट भरुन लाटली जायची, त्यामुळे आयुष्याच्या शेवटी जेव्हा नवरा, आणि दोन तरुण मुलं यांचं जाणं बघावं लागलं, घरातली माणसं कमी झाली तसा स्वभाव अधिक दुराग्रही झाला. तरी त्यांची जीवनेच्छा जबरदस्त होती आणि त्यांच्याजवळ वर्तमान काळात जगण्याची हातोटी होती.
बरीच वर्षे मला कोडे पडले होते त्यांना बाई का म्हणत असावेत आणि विशेष म्हणजे त्यांना बाई म्हटलेले आवडायचे, आपल्या परतवंडांना ही त्या स्वतः ला बाई म्हणायला शिकवत, तसे त्यांचे नाव इंदिरा ठेवले होते.
नंतर मी कोठेतरी वाचले की महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वी घरातली मोठ्या मुलीला बाई म्हणायची पद्धत होती, जसं ताई, अक्का तसं बाई. म्हणजे बाई हे त्यांचे माहेरचे नाव होते आणि म्हणुनच त्यांना बाई म्हटलेले आवडायचे.
© डॉ दिपाली घाडगे
विटा
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈