श्री सुधीर करंदीकर

 

🔆 मनमंजुषेतून 🔆

☆ “टमाटे कसे आहेत?…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

भाजीच्या दुकानात आपण नेहमीच जात असतो. कधी एकटे जातो, कधी बरोबर बायको असते किंवा नवरा असतो. पण बऱ्याच वेळेला आपण आपल्याच तंद्री मध्ये असतो. त्यामुळे आसपास घडणाऱ्या मजेशीर घटनांना आपण मुकत असतो. आपण नेहमीच वर्तमान काळात राहू शकलो, आणि आसपास घडणाऱ्या घटनांशी समरस होऊ शकलो, तर भरपूर आनंद मिळू शकतो, हे नक्की. हा लेख आणि ही घटना यावरच आहे.

—–

आज सकाळी फिरून येतांना नेहेमीप्रमाणे साने डेअरी मध्ये दूध घेतले. मुलीकडे सकाळी जातांना भाजी न्यायाची होती, म्हणून बायको बाजूच्याच भाजीच्या दुकानात भाजी घ्यायला गेली. दुकानदार तरुण मुलगाच होता. मी तिथेच उभा होतो.. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या —

मॅडम : अरे, टमाटे कसे आहेत ? 

दुकानदार मुलगा : मॅडम, टमाटे एकदम मस्त आहेत. आज न्याल तर पुन्हा नक्की परत याल.

मॅडम : अरे कसे म्हणजे तसे कसे नाही. कसे आहेत ?

मुलगा : मॅडम लाल आहेत आणि हिरवे पण आहेत. घरी गेल्यावर लगीच सार किंवा कोशिंबीर करायची असेल, तर पूर्ण पिकलेले लाल घेऊन जा. भाजी करायची असेल तर हिरवे टमाटे न्या. थोडे कमी पिकलेले पण आहेत. एकदम लहान आहेत आणि मोठे पण आहेत. कुठले देऊ?

मॅडम : अरे कसे आहेत, म्हणजे कसे दिले ? 

मुलगा : मॅडम, अजून दिले कुठे ! आताच तर दुकान उघडले आहे. आताच एका मॅडम ना भेंडी दिली, एकांना पालक दिला. टमाटो ची बोहोनी तूम्हीच करा. किती देऊ?

मॅडम : अरे, पण देणार कसे, ते सांग ना.

मुलगा : मॅडम वजन करूनच देणार. तुमच्याकडे पिशवी असेल तर त्यात देईन. नाहीतर आमची कापडी पिशवी घेऊन जा आणि उद्या पुनः भाजी न्यायला याल, तेव्हा पिशवी घेऊन या. पिशवी ८ रु ची आहे, पण मी फक्त ५ रु डिपॉझिट घेतो. आता प्लॅस्टिक कॅरी बॅग ठेवत नाही, कारण त्यावर बंदी आहे. आम्हाला थोडा त्रास होतो, पण बंदी योग्यचं आहे. कुठल्याही धोरणाला विरोध करायचा, म्हणून विरोध करणे, हे काही बरोबर वाटत नाही. आपण सगळ्यांनी बंदी चे पालन केले, तर शेवटी फायदा आपलाच आहे. बोला किती देऊ टमाटे ?

मॅडम : अरे भाव सांगशील का नाही ! भाव केल्याशिवाय कसे घेणार !

मुलगा : मॅडम, इथे भाव होत नाही. एकदम फिक्स्ड रेट, असे म्हणून त्यांनी बाजूच्या मोठ्या बोर्ड कडे बोट दाखवले.

बोर्ड वर लिहिले होते “इथे भाव होणार नाही, वाजवी भावात उत्तम माल इथे मिळेल. आज भाजी न्याल, तर रोजचं भाजी न्यायला इथेच याल”. खाली भाज्यांची नावे व त्यांचा किलोचा भाव लिहिलेला होता.

मॅडम नी बोर्ड बघितला आणि म्हणाल्या १ किलो लाल टमाटे दे.

मॅडम : अरे आधीच बोर्ड दाखवायचा नाही का 

मुलगा : मॅडम, तुम्ही टमाटो चा रेट विचारलाच कुठे !

भाजी घेऊन मॅडम बाहेर पडल्या आणि बायको पण भाजी घेऊन बाहेर आली.

 मॅडम आणि दुकानदार मुलाचा संवाद, हे आपल्या सगळ्यांचेच विचारांची देवाण – घेवाण करण्याचे एक बोलके उदाहरण आहे. बऱ्याच वेळा आपले पण असेच होते. आपल्याला काय पाहिजे आहे किंवा आपल्याला काय सांगायचे आहे, हे समोरच्याला समजेल अशा भाषेत आपल्याला सांगता येत नाही. “नाही, मला असे म्हणायचे नव्हते”, “माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता”, अशी लांबण नंतर सुरु होते. त्यामुळे समज – गैरसमज, वाद – विवाद, भांडण – तंटे, यांचे पेव फुटते / ताण – तणाव वाढतात. अशा घटना घरी घडतात, बाहेर घडतात, ऑफिस मध्ये घडतात. आणि त्याचे परिणाम आपण बघतोच आणि अनुभवतो.

म्हणूनच गुरुजन सांगतात : Be specific, Be to the point, Be brief.

आता यापुढे भाजीवाल्याशी संवाद साधतांना, तिथला बोर्ड बघून मग ठरवायला पाहिजे कि आपण काय विचारायला पाहिजे हे लक्षात आले.

चार दिवसांनंतर (तेच ठिकाण, साधारण तीच वेळ) —-

सकाळी फिरायला गेलो, डेअरी मध्ये दूध घेतले. बाजूच्या भाजीच्या दुकानात बायको भाजी घ्यायला गेली. मी तिथेच उभा होतो. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या, ‘अरे टमाटे कसे आहेत’ ? बघितलं तर या मॅडम वेगळ्या होत्या. मला वाटलं, की मुलगा आता भाव लिहिलेल्या बोर्ड कडे बोट दाखवेल. पण दुकानदार मुलगा व मॅडम यांची पुढची डायलॉग बाजी साधारण परवा सारखीच झाली. मॅडम स्मित हास्य करत, टमाटे घेऊन बाहेर पडल्या.

बायकोची भाजी घेऊन झाली. पैसे देतांना मी मुलाला विचारले —

मी : दादा, एक विचारू का ?

मुलगा : काका जरूर विचारा 

मी : टमाटे कसे आहेत विचारल्यावर, तुम्ही रेट म्हणजे भाव सांगायला पाहिजे ना ! अशी लांबण का लावता. एखादा गिऱ्हाईक चिडेल ना !

मुलगा : काका, you are absolutely right

मुलगा : काका, आमचा धंदा एकदम रुक्ष आहे. भाव सांगायचा, भाजी द्यायची आणि पैसे घ्यायचे. थोडे गंमतीशीर बोलायला किंवा ऐकायला मिळाले, तर तेवढीच मजा येते. दिवस छान जातो. येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते. गिऱ्हाईकाच्या चेहेऱ्याकडे बघून मला समजते, की फिरकी घ्यावी का ! किंवा नाही काही गिऱ्हाईक पण माझी फिरकी घेतात. मजा येते. दुकानात उभी असलेली मंडळी पण काही वेळा चर्चेत भाग घेते. लोकांच्या आणि माझ्या चेहेऱ्यावर हास्य येते.

मी : (मुलाचं इंग्रजी वाक्य आणि विचार ऐकून मी अवाकच झालो) बरोबर आहे. मला ऐकतांना मजाच आली.

मुलगा : काका ‘joy and happiness is to be spread. Is it not !’ पण त्याकरता मजा happiness generate व्हायला पाहिजे ना ! तुम्हाला मजा आली. तुम्ही चार लोकांना सांगणार, एखादा लिहिणारा असेल तर तो whats app वर टाकणार आणि ते ५० जण वाचणार. This is the chain of joy.

मुलानी टोपलीतलं एक सुंदर मोठं सफरचंद माझ्या हातात दिलं आणि म्हणाला —

मुलगा : This is for you. This is for spreading the taste. तुम्ही दुकानात नेहेमी भाजी घेता, पण फळे कधी घेत नाही. आता पुढच्या वेळेला भाजी पण घ्याल आणि फळे पण. This is called spreading of business.

मी : वाह, क्या बात है ! दादा, चहा घेणार का ? 

मुलांनी होकार दिला आणि मी बाजूच्या दुकानदाराला खूण करून ३ कटिंग चहा मागवले.

चहाचे घोट घेतांना मुलाला म्हटलं : This is for spreading togetherness.

मुलाला थँक्स म्हणून आणि बाय करून आम्ही हसत हसत बाहेर पडलो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments