श्री सुहास सोहोनी
☆ अजून मला मागणी आहे… ☆ श्री सुहास सोहोनी ☆
अजून मला मागणी आहे – – –
तेव्हा वेळ पुरत नसे आता जाता जात नाही.. तेव्हा कामं संपत नव्हती.. आता हाती कामच नाही —
या खोलीतून त्या खोलीत बिनकामाच्या येरझार्या.. गादीवर झोपू का खुर्चीत बसू.. कां व्हरांड्यात मारू फेऱ्या….
खायला काळ झालोय् का.. भुईला भार होतोय् का.. जगायला कारण उरलं का नाही.. काय करावं ते कळतंच नाही —
😣
वर्हाडकल्डा मित्तर बोलला.. नाय् ता इच्च्यार नको रे बाप्पा.. नन्नाचा पाढा काहून गायला.. देव तुजेवर व्हईल नं खप्पा —
तुये अशे रे उफराट बोलने माया त बिल्कुल नायच पटले.. तुयासारक्या टग्या बाप्यांनी होयाचे नाय् कदी केराचे टोपले —
👍
मालवणी दोस्त ऐकुन धावला.. मिठी मारून प्रेमानं बोलला.. वसाड्या तुजा म्हनना तरी काय.. शाळ्याचो पानी पी, ग्वाड किती हाय… !
नारल सोलुक झापा इणुक येळ माका पुरूचा नाय.. घरात बसून आंबट तोंडान् डोक्याचा खोबरा करूचा नाय्…
👍
तेवढ्यात आमची ही कण्हत आली.. कमरेत तिच्या उसण भरली.. झंडू बाम देत म्हणाली.. ” थोडसं चोळून द्याल का ?” तेवढ्यात मुलगा घाईत आला.. हातात कागद ठेवित म्हणाला “दहा कॉपीज् प्रिंटर वरून पटकन् काढून द्याल कां?”
– – तेवढ्यात सुनबाई ओटीवर आली. पिठाचा डबा आदळत म्हणाली ” झांकण फिट्ट बसलंय् घट्ट
प्लीज् उघडून द्याल कां?”
– – तेवढ्यात नातू आला रडत, ” चित्र काढायला मला नाही जमत, सूर्य, डोंगर, नि उडते पक्षी, काढून द्या ना छोटिशी नक्षी. “
– – – आणि अचानक डोक्यात लखकन् वीज चमकली.. माझं मला उमगलं आहे.. लहान मोठ्या कामांसाठी अजून मला मागणी आहे !!
…. अजून मला मागणी आहे !!
सगळंच काही संपलं नाहीये कळून आता चुकलं आहे.. आपली कामं नसली तरीही दुसऱ्यांना मदत करायची आहे !
नकारी विचार करायचा नाय्.. सकारी विचार सोडायचा नाय.. केराचं टोपलं होयाचं नसतं.. शाळ्याचं पानी गोडंच असतं
आयुष्य शहाळ्यासारखं असतं.. त्याचं मळकं टोपलं करायचं नसतं.
आणि —
– – – आणि आपणच आपली किंमत राखली तर जग आपल्या मागे धावतं !!
🍁 🍁
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈