श्री संदीप काळे
मनमंजुषेतून
☆ प्रेमासाठी सारे काही… ☆ श्री संदीप काळे ☆
संत श्री. एम. मुळे वृंदावनचा फार जवळून संबंध आला. अनेक वेळा, अनेक दिवस वृंदावनला राहता आले. श्री. एम. मुळेच खूप सारे मित्र मिळाले. त्या मित्रांमध्ये वृंदावनमध्ये राहणारे राजेश तिवारी यांची खूप छान मैत्री झाली. अनेक वेळा त्यांच्यासोबत राहून तिवारी यांच्या नजरेने वृंदावन पाहिले. कृष्णभक्ती, अद्वितीय प्रेम आणि वृंदावन हा माणसाने एकदा तरी अनुभवावा असा अनोखा संगम आहे. त्या दिवशी राजेश यांचा फोन आला आणि मला म्हणाला, ‘संदीप, माझे लग्न ठरले आहे. तुला यायचे आहे’. मला राजेशच्या लग्नाला जाणे गरजेचे होते. कारण राजेशचे लग्न आमच्या सर्वांची मैत्रीण यूएसची श्रीकृष्णभक्त रुसीसोबत होणार होते. रुसीने पाच वर्षांपासून वृंदावनात श्रीकृष्ण भक्तीमध्ये स्वतःला समर्पित केले आहे.
रुसी आणि राजेशच्या लग्नाला वृंदावनात गेलो. दोन दिवस वृंदावनला मुक्काम होता. वृंदावनात फिरणे, तिथल्या माणसांशी बोलणे, यात जो आनंद मिळतो, तो अन्य कशातच नाही. लग्न लागल्यावर वृंदावनला फिरण्यासाठी बाहेर पडलो. वृंदावनात प्रत्येक वेळी नवीन काहीतरी अनुभव मिळतो. वृंदावनमधील मंदिर परिक्रमा हा माझा आवडता विषय.
मजल दरमजल माझा प्रवास सुरू होता. प्रेम- मंदिरापासून थोडे दूर गेल्यावर जप करत बसलेले एक जोडपे दिसले. दोघांचे लांब केस, दोघांमध्ये एक आसन, एकच पाण्याची बाटली, एकच बॅग, सारे काही दोघांत एकच होते. ते मी पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की हे एक जोडपे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून मला वाटले, आपण यांच्याशी बोलले पाहिजे. मी त्यांच्या अवतीभोवती घुटमळत होतो. आत्ता जागे होतील, नंतर जागे होतील, याची मी वाट पाहत होतो. खूप वेळ झाला, पण ते काही त्यांच्या साधनेतून बाहेर यायला तयार नव्हते. मी तिथून निघणार, इतक्यात ते दोघेही जागे झाले.
मी त्यांना नमस्कार केला. त्यांना मी म्हणालो, ‘तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून ब-याच वेळापासून थांबलो आहे’.
त्या दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. त्यातली महिला मला म्हणाली, ‘सांगा ना काय बोलायचं आहे तुम्हाला?
‘तुम्ही जी साधना करताय, तुम्ही जी ध्यानधारणा करताय, त्यातून तुम्हाला खरंच ईश्वराची भेट होते का? या साधनेने तुम्हाला समाधान मिळते का? का तुम्ही अन्य कुठल्या कारणास्तव ध्यानधारणा करताय?’ त्या दोघांनीही एकमेकांकडे पाहत आणि स्मितहास्य करत मला उत्तर दिलं. त्या जोडीमधला तो पुरुष मला म्हणाला, ‘अहो, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहेच. तुम्ही ध्यानधारणा करा, तपस्या करा अथवा करू नका. त्याची आणि तुमची भेट होतच असते. मन एकाग्र ठेवून श्रीकृष्णाला भेटण्याची आस ठेवली, तर तो भेटतोच भेटतो’.
मग काय मी प्रश्न विचारत गेलो आणि ते उत्तर देत गेले. ते कुठे राहतात, ते काय करतात, ते कधीपासून साधू बनलेत, इथपासून ते त्यांचं पूर्वायुष्य मी त्यांच्याकडून जाणून घेत होतो. आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आल्यावर त्या दोघांनी साधूच्या वेशात राहणं पसंत केले. ते दोघेही आयटी इंजिनियर साधू का बनले? त्या दोघांची खूप करुण कहाणी मी ऐकली आणि माझं मन एकदम सुन्न झालं.
प्रेमिला शर्मा आणि सिद्धार्थ अवस्थी हे दोघेही अगदी जवळचे नातलग. लहानाचे मोठे ते उत्तर प्रदेशात झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेले. तिथून दोघेही आयटी इंजिनियर झाले. दोघेही मुंबईत काम करू लागले. एकमेकांची ओळख होती. त्या ओळखीतून दोघांचे प्रेम झाले आणि ते प्रेम लग्नाजवळ येऊन थांबले.
प्रेमिलाला वडील नाहीत. प्रेमिलाची आई तिच्या एका बहिणीला घेऊन उत्तर प्रदेशात राहते. प्रेमिलाने जेव्हा सिद्धार्थचा विषय तिच्या आईला सांगितला, तेव्हा प्रेमिलाच्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. प्रेमिलाचा लग्नाविषयीचा निर्णय आईला अजिबात मान्य नव्हता. ज्या दिवशी प्रेमिलाने आईला लग्नाचा विषय सांगितला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आईने उत्तर प्रदेशातून निघून थेट मुंबई गाठली. प्रेमिलाला पकडून तिने गावाकडे आणले. तिच्या लग्नाची इतर ठिकाणी बोलणी सुरू झाली. प्रेमिलाला तर सिद्धार्थबरोबरच लग्न करायचे होते. आईच्या ठाम नकारामुळे ते लग्न होणार नाही, हे निश्चित होते. प्रेमिलाने घरातल्या घरात दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, तरीही तिची आई तिचे ऐकायला तयार नव्हती.
एकदा भांडणांत बोलता बोलता आई प्रेमिलाला म्हणाली, ‘तू कुठेतरी एखाद्या मंदिरावर साध्वी म्हणून जा, पण मी त्या मुलासोबत तुझे लग्न करू शकत नाही. तो माझ्या अशा नात्यातला आहे की, त्या नात्यांत तुमच्या दोघांचं नातं नवरा-बायकोचं होऊच शकत नाही. बहीण-भावाचे होते. तुम्ही लग्न केलं, तर मी लोकांना काय तोंड दाखवू? समाजात माझी इज्जत राहणार नाही. तुझ्या लग्नाला कोणी येणार नाही. तुझ्या बहिणीचं लग्न होणार नाही. त्यावर प्रेमिला म्हणाली, ‘ठीक आहे. मी मंदिरात साध्वी म्हणून राहते’. प्रेमिलाच्या आईला वाटले, प्रेमात पडलेली ही तरुण मुलगी थोडीच मंदिरात साध्वी म्हणून राहणार आहे? एकीकडे प्रेमिलाची आई तिचं लग्न कुठं जमेल का, या विवंचनेत होती, तर दुसरीकडे प्रेमिला साध्वी बनण्यासाठी दीक्षा कुठे घ्यायची? त्याची काय काय नियमावली असते? कोणाकडे जावे लागते? याची सगळी माहिती काढून ठेवत होती.
एके दिवशी प्रेमिलाने तिच्या आईला सांगितले की, मी आता साध्वी म्हणून मंदिरामध्ये बसणार आहे. प्रेमिलाच्या आईला प्रेमिलाचा निर्णय ऐकून एकदम धक्काच बसला, पण प्रेमिला तिच्या निर्णयावर ठाम होती. आत्महत्या, सामाजिक प्रतिष्ठा, आईचे मत, नातेवाईकांचे मत, सिद्धार्थला धोका या सगळ्या शक्यतांवर मात करायची असेल तर, आईने रागात का होईना मला सुचवलेला साध्वी बनण्याचा पर्याय जिवंत राहण्यासाठी योग्य मार्ग ठरू शकतो. त्यातून मला आवडणाऱ्या श्रीकृष्णाची भक्ती करता येईल. सिद्धार्थच्या प्रेमाचे पावित्र्यही मला जपता येईल, या भावनेतून प्रेमिलाने साध्वी बनण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतरही प्रेमिलाची आई ‘मी सिद्धार्थशी लग्न लावणार नाही’, या मतावर ठाम होती.
प्रेमिलाला मुंबईवरून गावी नेताना प्रेमिलाची आई तिला सोबत घेऊनच सिद्धार्थला भेटली. तिने सिद्धार्थला तंबी देत मारहाण केली आणि बजावून सांगितलं की, माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन, पण तुझ्यासोबत तिचं लग्न करणार नाही. तुझ्या आईवडलांनी गावाकडे काय प्रताप केलेत, हे माहिती आहे ना? तुझे आणि हिचे नाते काय आहे हे माहिती आहे ना? यानंतर प्रेमिलाशी बोलायचा किंवा भेटायचा प्रयत्न केलास, तर मी तिचा मुडदा पाडेन. मीही आत्महत्या करीन आणि त्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर असेल’.
सिद्धार्थला वाटलं, काहीही झालं, तरी प्रेमिलावरचं आपलं प्रेम कमी होणार नाही. तिच्याशिवाय आपण इतर कोणावर प्रेम करू शकत नाही. तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. ती जिथे कुठे असेल तिथे सुखी राहावी, या भावनेतून मोठ्या जड अंत:करणाने सिद्धार्थने प्रेमिलाला समंजसपणे निरोप दिला.
तिकडे वृंदावनमध्ये जाऊन प्रेमिला साध्वी बनली. सिद्धार्थच्या प्रेमाचं पावित्र्य राखण्यासाठी तिनं हा निर्णय घेतला होता. ही गोष्ट प्रेमिलाच्या मैत्रिणीकडून बऱ्याच दिवसांनी सिद्धार्थला कळली. सिद्धार्थने खूप शोध घेतल्यावर त्याला प्रेमिला भेटली, ती साध्वीच्या वेशात. घडलेला सगळा प्रकार तिने सांगितला. ‘तू तुझे आयुष्य आनंदाने जग. आता मी हा निर्णय कायम ठेवून आयुष्यभर श्रीकृष्णाचं ध्यान करत या वृंदावनमध्येच राहणार आहे’, असं प्रेमिलानं सिद्धार्थला सांगितलं.
सिद्धार्थ प्रेमिलाला म्हणाला, ‘माझ्या आयुष्याला तुझ्याशिवाय काहीच अर्थ नाही. आपलं प्रेम काही विसरून जाण्यासाठी नव्हतं किंवा काहीतरी मिळवण्यासाठीही नव्हतं. आपलं प्रेम हे जन्मोजन्मीच्या गाठी आयुष्यभर कायम राहाव्यात यासाठी झालं होतं. तू जो साध्वी बनण्याचा निर्णय घेतलेला आहेस, तसाच मीही साधू बनण्याचा निर्णय घेतो. साधू आणि साध्वी बनून आपण श्रीकृष्णाची भक्ती करत राहू. नवरा-बायको होऊ शकलो नाही तर काय झाले? श्रीकृष्णाचे भक्त म्हणून सोबत राहू.
दोन-चार दिवस प्रेमिलाने सिद्धार्थची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धार्थ काही ऐकायला तयार नव्हता.
शेवटी सिद्धार्थने साधू बनण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या चार वर्षांपासून हे दोघे जण साधू-साध्वी बनून वृंदावनमध्ये तपस्या करत असतात. चार ठिकाणी भिक्षा मागतात. पोटापुरतं जेवढं मिळेल तेवढं खातात. रात्री वृंदावनच्या श्रीकृष्ण आश्रमात मुक्काम करतात. साधू आणि साध्वीचे पावित्र्य त्या दोघांनीही जपले आहे.
प्रेमिला म्हणाली, ‘मी लहानपणापासून कृष्णभक्त आहे. श्रीकृष्णच आपल्यासाठी सर्व काही आहे, या भावनेने मी आयुष्याची बावीस वर्षे काढली. अपघाताने का होईना मी पूर्णवेळ कृष्णभक्त होईन, असं कधी वाटलं नव्हतं. मी सिद्धार्थमध्येसुद्धा श्रीकृष्ण पाहायचे. सिद्धार्थच्या मला जपण्याच्या पद्धतीत मला श्रीकृष्ण दिसायचे. दुर्दैवाने सिद्धार्थ माझा होऊ शकला नाही, पण माझी श्रीकृष्णभक्ती सिद्धार्थच्या सहवासाने आणि माझ्या समर्पणाने कायम राहिली.
सिद्धार्थ म्हणाला, ‘अहो, जगण्यासाठी लागते तरी काय? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही सुखी आहात का? हे खूप महत्त्वाचे आहे. मी आयटी इंजिनियर होतो. ती आयटी इंजिनिअर होती. आमच्या आयुष्याचे अंतिम ध्येय काय होतं? ते एकमेकांसोबत खूश राहायचं. मुंबईत राहिलो असतो, तर मोठ्या इमारतीमध्ये राहिलो असतो. आलिशान गाडीत फिरलो असतो. त्या सर्वांतसुद्धा सुख शोधणे हेच महत्त्वाचे ध्येय राहिले असते. इथे श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये सुख शोधायची गरजच भासत नाही. सुख हे आपोआपच मिळत जाते. माझे आणि प्रेमिलाचे प्रेम हे तेव्हाही होते, आताही आहे. तेव्हा त्या प्रेमात चांगुलपणाच्या आणाभाका घेत आकाशाला गवसणी घालणारे भौतिक सुखाचे स्वप्न पाहिले होते. आता त्या आणाभाका कायम आहेत. फरक इतकाच की, आता श्रीकृष्णाच्या भक्तीत विलीन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या मार्गाने वाटचाल सुरू आहे’.
ते दोघेजण माझ्याशी बोलत असताना मी विचारले, ‘तुमच्या नातेवाईकांचे काय झाले? सिद्धार्थच्या घरच्यांनी विरोध केला नाही का?’ प्रेमिला म्हणाली, ‘जसं माझ्याकडे झालं, तसं त्याच्याकडेही झालं’. डोळ्यात अश्रू आणत, प्रेमीला म्हणाली, ‘एका वर्षानंतर माझी आई वारली. बहिणीची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आईकडे फार काही नव्हतं. जे काही होतं, ते मी विकलं आणि आनंदात बहिणीचं लग्न केलं. सिद्धार्थला आई-वडील नव्हते. त्यानं त्याच्या मोठ्या भावाच्या नावावर त्याची सगळी मालमत्ता करून दिली आणि अगदी सहजतेनं, आनंदात माझ्यासोबत येऊन भगवे वस्त्र परिधान केले’.
मी त्या दोघांनाही अजून एक प्रश्न विचारला, ‘तुम्ही हे सगळं आपल्या प्रेमासाठी केलं का श्रीकृष्णासाठी?’ त्या दोघांचेही उत्तर अतिशय समर्पक होते. ते म्हणाले, ‘आम्ही जगत होतो श्रीकृष्णासाठी. आमचं प्रेमही श्रीकृष्णासारखं होतं आणि आम्ही आताही जे काही करतो ते श्रीकृष्णासारखं आणि श्रीकृष्णासाठीच करतो’.
सिद्धार्थ आणि प्रेमिला या दोघांचाही खूप छळ झाला होता. नियतीने आणि नातेवाईकांनी त्यांच्या अनेक प्रकारे परीक्षा पाहिल्या होत्या. त्या सगळ्या परीक्षांमध्ये सफल होता होता त्या दोघांनी प्रेमासाठी जे काही केलं ते अतुलनीय असंच होतं.
मी त्या दोघांचा निरोप घेऊन निघालो. निघताना माझ्या मनात एकच प्रश्न होता की, अजूनही किती सामाजिक प्रतिष्ठेच्या रेखा प्रेमाच्या आड येतील? त्यातून जे घडते, त्याचा आपण विचारही करू शकत नाही. तुमच्या अवतीभोवती असेच प्रेम करणारी अनेक जोडपी असतील. त्यांचे प्रेम अगदी राधा-मीरा श्रीकृष्णासारखं असेल. अशा जोडप्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आपण निश्चितपणे मदत करणार ना?
© श्री संदीप काळे
चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.
मो. 9890098868
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈