सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)
मनमंजुषेतून
तक्रार… लेखिका – सुश्री तेजस्विनी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆
☆
का कळेना दाटते डोळ्यात पाणी..
मी खरे म्हणजे तशी दुःखात नाही..
तेवढा ओल्या सरींनी घात केला…
नाहीतर तशी माझी तक्रार नाही…
— स्पृहाच्या ह्या ओळी वाचताना मनात आलं… खरंच तक्रार करण्यासारखं असतं का खरच काही??आपलं आपल्यालाही जाणवत राहतं… की ही तक्रार नक्की कशासाठी?
अगदी पेपर वेळेवर आला नाही, आजूबाजूचे नीट काम करत नाहीत, कुणी माझ्याकडे लक्षच देत नाही.. अगदी साध्या साध्या विषयात आपण तक्रारीचा सूर लावतो… कुणी ऐकलं आणि नाही ऐकलं तरीही….
अगदी घरापासून, सोसायटीपर्यंत… समाजापासून देशापर्यंत… कितीतरी बाबतीत प्रत्यक्ष कृती, प्रयत्न न करता… फक्त नाराजी व्यक्त करत राहतो… कुणीतरी हे पटकन सगळ बदलावं… ही अपेक्षा…
दूध नाही आलं.. लेमन टी चा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे?
कचरा उचलला नाही तर एक दिवस आपणच वन टू करत टाकून यावा… कामात बदल हे कितीतरी तक्रारींवरचं औषध आहे… हो ना?
प्रत्येक गोष्ट कुणीतरी कुठेतरी आपल्यासाठी करावी… ती ही आपल्या मर्जी प्रमाणे… तक्रारीचा जन्म बहुतेक तिथेच होत असावा…
तक्रार.. लाडिकही असू शकते… त्याची वाट पाहून, त्याच्या भेटीसाठी तरसणारी ती… तक्रार करते… किती वाट पहायची?
त्याचीही तक्रार.. रुसवा तो कधीतरी डोकावतोच… किती केलं तरी तुझं आपलं तेच… म्हणून अबोल झालेला तो…
तक्रार… एका पिढीने दुसऱ्या पिढीबद्दल केलेली… जराही चील मारत नाहीत हे मोठे लोक…
आमच्यावेळी असं नव्हतं म्हणत… तरुण पिढीची तक्रार… करून करून गुळगुळीत झालेली….
तक्रार… सौम्य कधी कधी टोकाची… टोचणारी… वादात, भांडणात रुपांतर होणारी…
तक्रार का होते आहे, खरं मुळ शोधून त्यावर नेमका उपाय करणं केव्हाही श्रेयस्कर!!!
खरं सांगू… तक्रार असावी, थोडासा रुसवा.. क्वचित.. लोणच्याच्या खारासारखा.. नात्याला चव यावी इतकाच…
तक्रार करण्याची आणि ऐकण्याची दोन्ही सवयी… घातकच!!!!
सर्वांगानं फुलून यावं वाटत असेल… माणूस आणि नातंही… तर… मनापासून स्वीकार… आणि नो तक्रार…
गुलाब, चाफा, मोगरा
जुई जाई शप्पथ…
तुझ्यासारखे कुणीच नाही…
आईशप्पथ…
लेखिका : सुश्री तेजस्विनी
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈