सुश्री सुनिता जोशी
मनमंजुषेतून
☆ तसंच ! – लेखिका : डॉ. अपर्णा बेडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆
तसंच !…
घरी आलेल्या कुणालाही ‘तसंच’ पाठवायचं नाही आणि आपण कुणाकडे जाताना ‘तसंच’ जायचं नाही हा आमच्या घरचा शिरस्ता!
या ‘तसंच’ मधे जगभरचा पाहुणचार सामावलेला होता.
माझे कुणी मित्रमैत्रीण ठरवून आले की बटाटेवडे कर, अचानक आले तर त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा नाहीतर सांजा कर.. अगदीच वेळ नसेल तरी धडपडत उठून किमान “सफरचंदाची एक फोड तरी खा” म्हणत ती हातावर दे..
आई-बाबांचे ऑफिसमधले कुणी पाहुणे आले तर किमान चहा तरी कर..
नातेवाईकांपैकी कुणी येणार असेल तर खास आवडी-निवडी जप हे सारं अध्याहृत होतं.
हे सगळं करताना आई-आजीच्या चेहऱ्यावर कधी आठी यायची नाही, श्रम दिसायचे नाहीत, त्यांचं स्मितहास्य लोपायचं नाही… इतकं ते सारं सहज होतं! सहज होतं म्हणून सुंदर होतं!
पाहुण्यांसाठी असलेल्या ह्या नियमाला एक पोटनियमही होता. आपल्याच घरातून निघतानाही ‘तसंच’ निघायचं नाही घरातल्या सर्व माणसांसाठी उपनियम!
सकाळचा चहा पिऊन झालेला असला तरी, “‘तशीच’ जाऊ नको कॉलेजला!” असं म्हणत आजी तूपसाखर लावलेली एक पोळी घेऊन माझ्या मागे उभी असायची.
मनसुखानी नावाचा प्रोफेसर त्यावेळी आम्हां मुलींमध्ये भारीच फेमस होता. आमच्या गप्पातून आजीला हे कळलं असावं. आणि मग..
“आजी, उशीर होतोय ग.. नकोय मला.. मी जाते तशीच” असं म्हणण्याचा अवकाश…
ती त्या मनसुखानीच्या नावाने बोटं मोडायची.
“त्या मनसुखानीला म्हणावं एवढी पोळी खाल्ल्याशिवाय माझी आजी काही मला ‘तशीच’ सोडत नसते. बाकी तू तुझं बघ” असा तिचा राग उफाळून यायचा पण घरातून निघताना ‘तसंच’ जायचं नाही हा तिचा नियम आम्हाला पाळायलाच लागायचा.
आपण कुणाकडे जातानाही ‘तसंच’ जायचं नाही हा या सगळ्याचा व्यत्यास.. तो ती तितकाच खरा होता. आत्याकडे जाताना खास ठेवणीतल्या लोणच्याची बाटली भरली जायची. मावशीला आवडतात म्हणून घारगे व्हायचे.. एक ना दोन! यातलं काहीच नाही जमलं आणि अचानक कुणाकडे जावं लागलं तर जाता जाता द्राक्ष घे.. चिकू घे, असलं काही न काही त्या करायच्या.
हे सगळे सोपस्कार आई-आजी पाळायच्या इथपर्यंत ठीक! पण मी माझ्या शाळा-कॉलेजच्या वयात काही कामासाठी कोणाकडे एकटीच जातेय तरी या ‘तशीच’ जाऊ नको गं म्हणायच्या आणि मग मात्र माझी चिडचिड व्हायची. मी कधी ऐकायचे पण अनेकदा त्या-त्या वयातल्या न ऐकण्याच्या नादात ‘तशीच’ निघून जायचे. लहान आहे.. मोठी होईल तेव्हा कळेल असं म्हणून सोडूनही द्यायच्या!
एकदाच आजीने या चिडचिडीवरचा उतारा केला.
मला म्हणाली, “कपभर चहाही न देता कुणाला ‘तसंच’ पाठवशील किंवा रिकाम्या हाताने कोणाकडे जाशील.. तर आपल्या घरातलं काही जाणार नाही.. पण ‘पत’ मात्र जाईल. ज्याला ऐपत आहे, त्याने पत सांभाळावी”
आजही माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक घरातून ‘तसंच’ कुणी जात नाही आणि आपणही ‘तसंच’ कुणाकडे जात नाही.
काय करणार.. ?
आजी नावाची मौल्यवान विद्यापीठं शब्द पेरून आसपासच वावरत असतात.
लेखिका : डॉ. अपर्णा बेडेकर.
प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈