सुश्री नीता कुलकर्णी
☆ “दर्शन रामरायाचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
मैत्रिणीचा फोन..
” कशी आहेस नीता? खूप दिवसांनी फोन करते आहे.”
” अगं ठीक आहे. रामरायाचं दर्शन करून आले.”
यावर अगदी आश्चर्याने ती म्हणाली
” काय सांगतेस काय? कमाल आहे तुझी. मला बोलली पण नाहीस..”
त्यात काय सांगायचं मला काही समजलचं नाही…
” कधी ठरवलंस? मला विचारायचं तरी …मी पण आले असते “
ती रागवलीच ….
“अग रामनवमीला फार गर्दी असणार म्हणून सकाळी मनात आलं आणि जाऊन आले .”
“म्हणजे इथेच होय.. मग ठीक आहे. मला वाटलं अयोध्येला गेलीस का काय?”
सध्या सगळ्यांना राम म्हटलं की अयोध्याच का आठवत आहे कळतं नाही..
तीला म्हटल
” कधीतरी इथल्याही रामाला जायचं. देवळात रामनवमीची तयारी चाललेली आहे . कार्यक्रम पण सुरू आहेत.”
यावर ती म्हणाली
” एक सांगु मी किती दिवसात रामाच्या देवळात गेलेच नाहीये. जाईन एकदा”
” तुळशीबागेत जातेस ना ? मग जाऊन यायचं की”
” अगं तिथे गेल की खरेदीच्या नादात विसरून जाते.”
“असू दे … पुढच्या वेळेस गेलीस की जा … अजूनही कुठे कुठे रामाची देऊळं आहेत की तिथेही जाऊन ये..”
“खरचं ग.. लक्षातच येत नाही संध्याकाळी जाऊन येईन”
मी बघीतल आहे..खूप जणी अयोध्येला जायला मिळालं नाही म्हणून दुःखीकष्टी आहेत.
खरतरं ईथल्या देवळातल्या रामातही रामच आहे… कधीतरी जावं त्याच्या दर्शनाला.
त्या मूर्तीतही तेच प्राणदत्त्व आहे. पण आपण मूर्तीच्या सौंदर्याकडे मंदिराच्या शिल्पातच दंग होत आहोत का? असे वाटते आहे.
आपण टीव्हीवर मोबाईलवर अयोध्येच मंदिर बघितलेलं आहे. जेव्हा जमेल तेव्हा जाऊ नाही जमलं तर जाणारही नाही.
आपण जाऊ शकलो नाही अशी कित्येक ठिकाणं आहेतच की ….
त्यासाठी वाईट कशाला वाटून घ्यायचं…
आपला रामराया फक्त अयोध्येत नाहीये. तो इथल्या देवळातल्या मूर्तीतही आपण पाहूया…
त्यासाठी आधी शांतपणे बसुया…
डोळे बंद केले आणि मनोभावे त्याची आठवण केली की अंतर्यामी त्याची जाणीव होते.
जमेल तेव्हा अयोध्येला जरूर जा.
एक लक्षात ठेवा.. अमुक एक देवळात जाणं हेच आपलं साध्यं आहे का ? तिथे गेल तरच देव भेटणार आहे का? याचाही विचार करा.
रामराया कुठे आणि कशाकशात पाहायचा याचा शोध घ्या.
अंतरंगात डोकावून मनोभावे विचार करा .
रामराया कुठे ना कुठे भेटेलच…
रामनवमी पाच दिवसांवर आलेली आहे. रोज रामरक्षा, अभंग, रामाची गाणी, आरत्या म्हणा… तुमचा तुम्हाला आनंद मिळेल.
विष्णुदास नामा यांनी रामाची फार सुंदर आरती लिहीलेली आहे. ती तुमच्यासाठी पाठवत आहे.
☆ आरती ☆
☆
श्रीराम जय राम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
टणत्काराचे ठाण करी धनुष्यबाण
हनुमंत पुढे उभे हात जोडून ॥१॥
*
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळीती
सिंहासनी आरुढले जानकीपती ॥२॥
*
रत्नजडित माणिक वर्णु काय मुगुटी
स्वर्गातून देव पुष्पवृष्टी करिती ॥३॥
*
लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्रांची
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥४॥
*
विष्णुदास नामा म्हणे मागणे हेचि
अखंडित सेवा घडो रामचंद्रांची…
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
पुणे
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈