सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२१ – आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम….
जुन्या काळातल्या पुण्यात भरारी घेताना मन आधुनिक पुण्यातही झेपावतं. नुकतीच कोथरूड येथे, मयूर कॉलनीत, जोग शाळे समोर असलेल्या ‘श्री वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान, ‘ येथिल ‘जैन स्थानक भवन ‘ येथे ‘भुकेलेल्यांना पोटभर जेवण ‘ ह्या एकाच तत्वावर चालविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती मिळाली. येथे गरीब श्रीमंत एकाच पंक्तीला बसून भोजनाचा आस्वाद घेतात. ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी, फक्त 100 रुपयांत भाज्या वरणभात, पोळ्या नमकीन, रविवारी मिष्ठान्न अशा गरमागरम ताज्या सात्विक भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतात. समस्त लहान थोर मंडळींची ‘पोटोबा’ शांती करणारे हे पुण्यपुरुष नव्हे संतच म्हणावं लागेल त्यांना, भोजन तयार करणाऱ्यांचाही यात सिंहाचा वाटा आहे, त्यांनाही ” अन्नदाता सुखी भव ” हा आशीर्वाद द्यावा लागेल कारण अनेकांच्या मुखात त्यांच्यामुळे घरगुती जेवण जाते. विद्यार्थ्यांच्या आया त्यांच्यामुळेच निर्धास्त असतात. असे हे महात्मा, समाजसेवक आहेत तरी कोण ? असा प्रश्न मला पडला. आणि त्यांची नांवे कळली. आनंद देणारे, घेणारे आणि वाटणारे हे समाजसेवक आहेत, श्री. ईश्वर भटेवरा आणि श्री. प्रितेश कर्नावट. त्यांच्या नांवातच ‘ईश्वर’ आहे आणि प्रितेश म्हणजे प्रित यांच्या नावातही ‘प्रेम’ आहे. या सदगृहस्थांशी संवाद साधताना जाणीव झाली, ‘ मानव सेवा हीच देशसेवा. ‘आणि ‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान ‘ही त्यांची ब्रीदवाक्ये आहेत. भोजनोत्तर तृप्त झालेल्या रुग्णांचे, वयोवृद्धांचे त्यांना भरभरून आशिर्वाद मिळतात. संस्थेतर्फे महिन्यातून सहा वेळा वारजे व किनारा हॉटेल नजिकच्या मजुरांना मोफत नाश्ता देऊन ते संतुष्ट करतात. धार्मिक कार्यात तर त्यांचं पुढचं पाऊल असतंच पण भूतदयेतही ही संस्था अग्रेसर आहे. ‘जीवदया ‘ गोशाळेला नियमितपणे चारापाणी देऊन मुक्या जनावरांचा, गोमातेचाही ते आशिर्वाद घेतात. इतर मदत करून आणि देणगी देऊन काही सज्जन त्यांना हातभार लावतात आपणही या सात्विक थाळीचा उपभोग घेण्यासाठी भोजनालयाला भेट देऊया. उत्तम आणि स्तुत्य अशा ह्या उपक्रमेला खूप खूप धन्यवाद.
त्यांचा पत्ता– श्रीवर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान, जैन स्थानक भवन, योग शाळेसमोर, मयूर कॉ. पुणे संपर्क– ईश्वर भटेवरा — 83 78 88 34 45 आभार..
– क्रमशः…
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈