श्री संदीप काळे
मनमंजुषेतून
☆ प्रश्न सामाजिक स्वास्थ्याचा… ☆ श्री संदीप काळे ☆
छत्रपती संभाजीनगर जवळ घृष्णेश्वर मंदिर आहे. मी आणि माझा मित्र किशोर गुंजाळ दर्शनासाठी तिथे गेलो होतो. मंदिराच्या एका कोपऱ्यात एक स्त्री आणि एक पुरुष एकमेकांचे हात हातात घेऊन रडताना दिसले. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघालो.
थोड्यावेळाने माझे लक्ष झाडाखाली बसलेल्या काही लोकांकडे गेले. त्याच लोकांमध्ये ते दोघेही होते, ज्यांना मी मंदिरात रडताना पाहिले होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अजूनही थांबले नव्हते. बाजूला बसलेली काही मंडळी त्यांना शांत होण्याचा सल्ला देत होती.
आम्ही थोडे पुढे गेल्यावर एका ठिकाणी जेवायला बसलो. त्या हॉटेलमधील एक माणूस दुसऱ्याला सांगत होता, “त्या झाडाखाली बसलेले जोडपे आहे ना, त्यांनी पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत. पैसा, संपत्ती, सगळं काही आहे, पण समाधान नसल्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. ” हे ऐकून मी गडबडीने किशोरचा हात पकडला आणि त्या माणसांमध्ये जाऊन बसलो.
‘जर त्या त्या वेळी कोणीतरी मार्गदर्शन करणारे असते, तर माझ्याकडून चुकीचे काम झाले नसते’, असे ठामपणे सांगणारे अनेक जण मी पाहिले आहेत. मात्र, येथे मी ते प्रत्यक्ष अनुभवत होतो.
ते जोडपे, ते कुटुंब आणि त्या सर्व माणसांशी मी संवाद साधला. त्या संभाषणानंतर मी इतका थक्क झालो की, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांची नावे अर्चना देशमुख आणि सतीश देशमुख.
अर्चना देशमुख या मूळच्या यवतमाळच्या, पूर्वाश्रमीच्या अर्चना पाटील. त्या मराठवाड्यात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. सतीश देशमुख हे मराठवाड्यातील एक मोठे उद्योजक आहेत. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. त्यांना दोन अपत्ये झाली. मात्र, काही वर्षांतच सतीश आणि अर्चना यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचले आणि अखेर त्यांनी घटस्फोट घेतला.
सतीश आणि अर्चना यांचा मुलगा संकेत हा अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) क्षेत्रात कार्यरत आहे, तर त्यांची मुलगी सत्यभामा ही परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. घटस्फोटानंतरही सतीश यांच्या आई-वडिलांपासून अर्चनाच्या आई-वडिलांपर्यंत, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांपर्यंत सर्वांचे नाते घट्ट राहिले. मात्र, सतीश आणि अर्चनाचे नाते मात्र तितकेच ताणले गेले होते.
दोघांचेही स्वभाव अतिशय टोकाचे होते. दोघेही प्रतिष्ठित आणि उच्च सामाजिक स्थान असलेले व्यक्ती असल्यामुळे त्यांना मन मोकळे करणे सहज शक्य नव्हते. पण खोलवर विचारल्यानंतर, ते दोघे हळूहळू व्यक्त होऊ लागले.
अर्चना सांगत होत्या, “आम्ही दोघेही आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एवढे झटत होतो की, त्यात आमचे व्यक्तिगत आयुष्यच हरवून गेले. वैयक्तिक, मानसिक आणि शारीरिक गरजा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी कधी कधी एक पाऊल पुढे टाकावे लागते, तर कधी एक पाऊल मागेही घ्यावे लागते. कधी नवऱ्याने समजून घ्यावे लागते, तर कधी बायकोने. मात्र, हे सगळे आम्ही दोघेच विसरलो होतो. त्यामुळे आमच्या नात्यात इतकी दरी निर्माण झाली की, अखेर घटस्फोट झाला. ”
पुढे त्या म्हणाल्या, “खरं तर सामाजिक आणि शारीरिक गरजा कुठेतरी पूर्ण होतील, या विचाराने आम्ही विभक्त झालो. मात्र, घटस्फोटानंतर आम्हाला मानसिक शांती मिळाली नाही. अखेरीस आम्ही समुपदेशनासाठी गेलो, आणि तिथेच आम्हाला सत्याचा साक्षात्कार झाला. मग आम्ही निर्णय घेतला की, आपल्याला एकत्र राहिले पाहिजे. त्यातूनच आम्ही पुन्हा एकत्र आलो. ”
सतीश आणि अर्चनांच्या नातेवाईकांमध्ये संजू पाटील नावाचे एक वकील होते. ते म्हणाले, “हे दोघेजण पुन्हा एकत्र आल्यावर, त्यांच्या आई-वडिलांनी ठरवलं की आपण ज्या घृष्णेश्वराला मानतो, त्याच्या समोर जाऊन नतमस्तक व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळेजण आज घृष्णेश्वर ला आलो. ”
संजू एकेक विषय मांडत होते, आणि मी त्यांना प्रश्न विचारत होतो. अर्चना आणि सतीश हे दोघे विभक्त का झाले, याची कारणे उघडपणे सांगणे सोपे नव्हते. पण हा प्रश्न केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहिला नव्हता, तो आता संपूर्ण समाजाच्या मानसिक आरोग्याशी निगडित झाला होता. संजू वकील आणि त्यांच्यासोबत असलेल्या मंडळींनी यावर माझ्याशी चर्चा केली.
मी अर्चना आणि सतीश दोघांनाही विनंती केली, “तुम्ही आज अनेक भांडणाऱ्या आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून नाती तोडणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी एक आदर्श आहात. ”
अर्चना माझ्याकडे पाहत शांतपणे म्हणाल्या, “आम्ही काही उदाहरण वगैरे नाही आहोत. जर उदाहरण असायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला खूप वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. स्त्री आणि पुरुष निसर्गाने वेगळे बनवले आहेत, पण अनेकदा दोघेही ते वेगळेपण स्वीकारत नाहीत. त्यामुळे वाद होतात. ”
डॉ. विजय दहिफळे
सतीश म्हणाले, “तेरा दिवसांपूर्वीच मी संभाजीनगरमध्ये डॉ. विजय दहिफळे (93560 33230) यांच्या ‘सामाजिक स्वास्थ्य’ कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यांना मी याआधी टीव्हीवर पाहिले होते, पण त्या दिवशी प्रत्यक्ष ऐकले आणि मनावर जबरदस्त परिणाम झाला. त्याच कार्यक्रमातून मी माझ्या बायकोला फोन केला. रडत रडत तिने तो फोन उचलला आणि म्हणाली, ‘हा एवढासा फोन करायला तुला पंधरा वर्षे लागली?’”
मी तिला उत्तर दिलं, “आता मला एकही मिनिट तुझ्यापासून दूर राहायचं नाही. तू जिथे कुठे आहेस, मला सांग, मी तुला भेटायला येतो. ” अर्चना संभाजीनगरपासून १५० किमी दूर होती, पण त्या क्षणी मी थेट तिच्याकडे पोहोचलो.
मी तिला पाहिलं आणि जाणवलं—ती अजूनही तशीच होती. माझी वाट पाहत बसलेली, माझी काळजी करणारी. तिला फक्त माझ्याकडून प्रेमाची, आपुलकीची, सुरक्षिततेची जाणीव हवी होती.
मी मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तिला काय हवं आहे, कधी हवं आहे, हे समजण्याइतका मी सजग नव्हतो. पण ही डोळस समज आणि खऱ्या अर्थाने ‘पुरुष’ असण्याची अनुभूती मला डॉ. विजय दहिफळे यांच्या सहवासात आल्यावरच मिळाली. आम्ही दोघेही त्यांच्या क्लिनिक मध्ये जाऊन त्यांना भेटलो. त्यांनी आमचं गैरसमजुतींचं जडलेलं आवरण दूर करून सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र दिला.
सतीश पुढे म्हणाले, “आमच्या घटस्फोटामुळे आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला. आमच्या मुलांना मानसिक वनवास भोगावा लागला. आम्ही दोघेही आमच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी नव्हतो. अशा कित्येक समस्या या एका निर्णयामुळे उभ्या राहिल्या होत्या. ”
मी आणि किशोर दोघेही हे ऐकून थक्क झालो.
डॉ. विजय दहिफळे यांचा संपर्क आणि पत्ता घेऊन आम्ही त्यांना भेटायचं ठरवलं. संभाजीनगरमध्ये न्यायालयाजवळच त्यांचा दवाखाना होता. सायंकाळची वेळ होती, आणि त्या वेळीही डॉक्टरांना हार-तुरे घेऊन भेटायला आलेल्यांची संख्या मोठी होती. आम्हीही भेटण्याच्या रांगेत उभे राहिलो.
तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी बोलत असताना लक्षात आलं की, बहुतांश लोक शारीरिक आणि मानसिक त्रासांतून बाहेर पडून आता सुखी जीवन जगत होते. माझ्या मनात एकच विचार घोळत होता– आपलं सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अशा डॉक्टरांची समाजाला नितांत गरज आहे. सतीश आणि अर्चना यांच्यासारख्या शेकडो जोडप्यांनी नव्याने आयुष्य सुरू केलं होतं, आणि त्यासाठी डॉ. दहिफळे यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरलं होतं.
सुख, मग ते शारीरिक असो की मानसिक, ते उपभोगण्यासाठी आपला जन्म कसा आहे? आपण कसे वागले पाहिजे? याबाबत समुपदेशन करणे, आणि गरज पडल्यास स्वतः विकसित केलेली औषधे लोकांना देणे यामध्ये डॉ. दहिफळे यांचा कमालीचा हातखंडा होता.
मी डॉक्टरांनी जे काही उभं केलं होतं, ते बारकाईनं निरीक्षण करत होतो. तुटलेली लग्न आणि मनं पुन्हा जोडण्याच्या कार्यात डॉक्टरांनी जागतिक पातळीवर विक्रम केले होते. एक-दोन नव्हे, तर अडीच लाखाहून अधिक जोडप्यांना सामाजिक स्वास्थ्याचं महत्त्व पटवून देऊन त्यांनी त्यांना एकत्र आणलं होतं.
मी स्त्रीरोगतज्ञांविषयी अनेक ठिकाणी वाचलं होतं, पण इथं डॉक्टर पुरुषरोगतज्ञ होते.
डॉक्टर बाहेर आले. त्यांनी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधला. सर्वांशी बोलून झाल्यावर शेवटी आम्ही दोघेच उरलो. डॉक्टर आमच्याशी अगदी आत्मीयतेने बोलले. आम्ही अर्चना आणि सतीश यांचा दाखला देत डॉक्टरांशी संवाद सुरू केला.
अत्यंत हुशार, प्रचंड हजरजबाबी आणि अनेक वर्षांचा सामाजिक स्वास्थ्याचा अनुभव असलेले डॉक्टर आमच्या प्रत्येक प्रश्नाला सखोल उत्तर देत होते. आम्ही अडीच तास डॉक्टरांशी गप्पा मारल्या, पण तरीही आमचे समाधान झाले नाही.
मी डॉक्टरांना अनेक वेळा टीव्हीवर ‘कामशास्त्र’ या विषयावर मनमोकळेपणाने बोलताना पाहिले होते. आज समाजात, घरात, शाळा- कॉलेजांमध्ये सेक्स संदर्भात उघडपणे बोललं जात नाही. त्यामुळेच संपूर्ण पिढी गोंधळलेल्या विचारसरणीकडे आणि अज्ञानाकडे झुकत आहे, हे डॉक्टर आम्हाला समजावून सांगत होते.
डॉक्टर म्हणत होते, “हे सत्य आहे की, सेक्स या विषयावर घरात, शाळेत, कॉलेजमध्ये आणि समाजात उघडपणे चर्चा केली जात नाही. त्यामुळेच तरुणाई दिशाहीन होत आहे. ”
डॉक्टरांनी राज्यभरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समुपदेशन मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेमुळे दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.
डॉक्टरांनी त्यांच्या कामाचे पुरावे—बातम्या, छायाचित्रे आणि संशोधन दाखवत आम्हाला समजावले की, आपल्या भारतीय संस्कृतीने ‘कामसूत्र’ या महत्त्वाच्या ग्रंथाकडेही दुर्लक्ष केले आहे.
ज्या डॉक्टरांनी पाच लाखांहून अधिक संसार वाचवले, दहा लाखांहून अधिक युवकांना शारीरिक जाणीव आणि समज दिली, त्या क्षेत्रात कदाचित राज्यात कुणीच इतकं मोठं कार्य केलं नसेल.
भविष्यात पुढील चारशे वर्षे डॉक्टरांचे ज्ञान पुढील पिढ्यांच्या उपयोगी यावे, यासाठी डॉक्टरांनी आधीच तयारी करून ठेवली आहे.
काही माणसं समाजासाठी पूर्णतः झपाटलेली असतात आणि ते केवळ समाजाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात. हीच भावना डॉक्टरांच्या कार्यातून प्रकर्षाने जाणवत होती.
सेक्स, कामसूत्र, स्त्री-पुरुष संबंध यांसारखे शब्द ऐकताच पुढे काय बोलावे हे कळत नाही. मात्र, डॉक्टर या प्रश्नांकडे थेट आणि डोळसपणे पाहतात.
मूळचे अंबाजोगाईचे असलेले डॉ. दहिफळे हे “माझ्या घडणीत वडील सोपानराव आणि आई पार्वती यांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे, ” असे आवर्जून सांगत होते.
डॉक्टर अनेक लोकांशी संवाद साधत होते, कुणाला समुपदेशन करत होते, कुणाला औषधे देत होते. पण हे सर्व करत असताना तिथे पैशाची अजिबात विचारणा नव्हती.
मी डॉक्टरांना विचारले, “डॉक्टर, समाजसेवा ठीक आहे, पण हे सगळं चालवायचं कसं?”
डॉक्टरांनी वर पाहत हात जोडले आणि उत्तर दिले, “त्याची सगळी काळजी घेतली आहे. ”
एखाद्या मंदिराबाहेर जशी मोठी गर्दी आणि प्रदीर्घ रांग असते, तशीच रांग डॉक्टरांना भेटण्यासाठीही होती. लोक हार-तुरे घेऊन त्यांना भेटण्यासाठी उभे होते.
मी आणि किशोर परतीच्या मार्गाला लागलो. आम्ही दोघेही चर्चा करत होतो की, मानसिक आणि शारीरिक आरोग्य समाजासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी डॉक्टर दहिफळे जे महान कार्य करत आहेत, ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं होतं.
डॉ. दहिफळे थेटपणे कार्य करतात आणि आता हे कार्य आपण सर्वांनी हाती घेण्याची गरज आहे.
तुम्ही डॉक्टर नसाल, तरीही तुम्ही चांगले समुपदेशक बनून भरकटलेल्या पिढीला योग्य मार्ग दाखवू शकता.
हेही तेवढेच सत्य आहे, बरोबर ना?
— डॉ. विजय दहिफळे
© श्री संदीप काळे
संस्थापक, व्हाईस ऑफ मेडिया, मुंबई
मो. 9890098868
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈