सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

निवडुंग.

निवडुंग या काटेरी, झुडुप प्रकारच्या वनस्पतीशी माझ्या काही बालपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत. धारदार बोथट मणके असलेल्या निवडुंगाच्या चांगल्या गलेलठ्ठ फांदीचे एक सारखे उभे तुकडे करून, त्याचे सुरेख दिवे आई बनवायची. त्यात तेल वात रुजवायची. आणि चांदीच्या ताटात ते पेटवलेले दिवे लावून दिवाळीच्या धनतेरसच्या दिवशी धनाची पूजा करायची. इतका देखणा देखावा असायचा तो!

आजी म्हणायची प्रत्येक वनस्पतीचा सन्मान ठेवणे ही आपली संस्कृती आहे.

याच निवडुंगाशी माझी एक कडवट आठवणही आहे. आमच्या बागेत सदाफुली, मोगरा, जास्वंदी, जाई आणि जुई सोबत एका कुंडीत कोरफड लावलेलं होतं. काटेरी धारदार गुळगुळीत, मऊ, हिरवागार कोरफडीचा वाढलेला गुच्छ छानच दिसायचा. पण मला खोकला झाला की आजी, या कोरफडीची फणी कापून त्यातला गुळगुळीत गराचा रस करून प्यायला लावायची. खोकला पळायचा पण मनात रुतलेला त्याचा कडवटपणा मात्र नकोसा वाटायचा.

कधी कधी आजी तो गर केसांनाही चोपडायची. माझे कुरळे दाट केस पाहून मैत्रिणी म्हणायच्या,

“इतके कसे ग दाट तुझे केस?” मी त्यांना सांगायची, “कोरफडाचा चीक लावा”. तेव्हां त्या नाकं मुरडायच्या.

ठाण्याला शहराचे स्वरूप गेल्या काही वीस पंचवीस वर्षापासून आलं असेल. पण त्याआधी ठाण्याच्या आसपास खूप जंगलं होती. काटेरी, वेडी वाकडी, मोकाट वाढलेली. प्रामुख्याने तिथे निवडुंगाची झाडे आढळायची. आणि त्या वयात निवडुंग या वनस्पतीविषयी कधी आकर्षण वाटलंच नाही. नजर खिळवून ठेवावी असं कधी झालं नाही.

नंतर कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्राचा अभ्यास करताना या निवडुंगाची पुन्हा वेगळी शास्त्रीय ओळख झाली. कॅक्टेसी, फॅमिली झीरोफाइट्स(xerophytes) अंतर्गत येणाऱ्या या निवडुंगाचे अनेक प्रकार हाताळले. पाहिले. कितीतरी वेगवेगळे प्रकार, वेगवेगळी नावे. वई निवडुंग, त्रिधारी निवडुंग, फड्या निवडुंग, बिनकाट्याचा निवडुंग, पंचकोनी निवडुंग, वेली निवडुंग, लाल चुटूक फळं येणारी काही गोंडस निवडुंगं, काही काटेरी चेंडू सारखे दिसणारे..असे कितीतरी प्रकार अभ्यासले. वाळवंटातही हिरवगार राहण्याची क्षमता असलेलं हे काटेरी झाड, फांद्यांमधे कसं पाणी साचवून ठेवतं आणि स्वतःला टिकवतं, याचा वनस्पतीशास्त्राच्या पुस्तकातून भरपूर अभ्यास केला. त्याचे पर्यावरणीय आणि वैद्यकीय फायदे जाणून घेतले. पुढील आयुष्यात तर या निवडुंगाच्या छोट्या कुंड्यांनी घरही सुशोभित केलं. एक काळ असा होता की घरात विशिष्ट प्रकारचं कॅक्टस असणं हे स्टेटस झालं होतं! आजकाल तर एलोवेरा जेल, एलोवेरा क्रीम, ऑइल यांनी तर घराघरात ठाण मांडलेआहे. एलोवेरा म्हणजे तेच ना आजीचं कोरफड?

आता माझ्या अंगणात एका कोपऱ्यात, आई ज्याचे दिवे बनवायची ते चौधारी निवडुंग खूप वाढले आहे. कधी कधी ते उपटून टाकावं का असेही माझ्या मनात येतं. पण उन्हाळ्यात जेव्हा काही झाडं सुकून मरगळतात तेव्हा हे हिरवंगार निवडुंगाचं झुडुप मला काहीतरी सांगतं. शिकवण देतं. माझा गुरू बनतं. मला ते काटेरी झाड स्वयंपूर्ण वाटतं. स्वतःची शस्त्रं सांभाळत स्वतःचं रक्षण करणारं सक्षम जैविक वाटतं. वाळवंटातही हिरवेपण जपणारं एक कणखर व्यक्तिमत्त्वाच्या रूपात ते माझ्यासमोर येतं. आणि मनात सहज येतं, आपणही असेच निवडुंग होऊन जावे. जीवनाच्या वाळवंटी, विराण वाटेवरही हिरवेगार राहावे. काटे सुद्धा दिमाखाने मिरवावेत…

आणि जमलं तर आईच्या पूजेच्या ताटातला दिवाच होऊन जावे..

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments