सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग पहिला ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस! आपल्या देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन!! त्यावेळी आम्ही पाचवी- सहावीत शिकत असू. शहरात सगळीकडे उत्साही वातावरण होते.. तसेच शाळेतही होते. एखाद्या सणाप्रमाणे आम्ही चांगले कपडे घालून, नटूनथटून शाळेत गेलो होतो. त्यावेळी शाळेचा विशिष्ट असा युनिफॉर्म नव्हता. शाळा रंगीबेरंगी पताका लावून सजवली होती. पंटागणात रांगोळी काढली होती. कोणी मोठे पाहुणे येणार असावेत! वातावरण स्वच्छ, सुंदर, आनंदी होते. मैदानावर रांगेत आम्ही सर्व मुले-मुली ऊभे होतो. शाळा सुरु होण्यापूर्वी रोज प्रार्थना असे. त्यादिवशी स्वतंत्र भारताचा
‘तिरंगा’ उंच फडकाविला गेला. ‘ वंदे मातरम’ गायले गेले, ‘राष्ट्रगीत’ झाले. ‘भारत माता की जय’ घोषणा दिली गेली. आम्ही सर्व मुले खूप जोरात मोठ्या अभिमानाने ‘जय’ म्हणत असू. आम्हाला सर्वांना गोड खाऊ वाटला गेला. आम्ही मुले स्वतंत्र भारताचे उद्याचे भविष्य आहे, असे काहीसे पाहुण्यांचे भाषण झाले. त्यांनी खूप काही सांगितले. ते म. गांधी, पं. नेहरु, सुभाषचंद्र बोस अशा अनेक थोर नेत्यांबद्दल बोलले. आम्हाला ‘देश स्वतंत्र झाला’; एवढे फक्त कळले. आता भारत देशाला, आपल्याला चांगले दिवस येणार. तो खूप आनंदी दिवस होता.
आमच्या घरात भिंतीवर एक फोटो फ्रेम होती. सुंदर रंगीत चित्र! भारताच्या नकाशाचे!! एका बाजूला गांधी, नेहरु, सुभाषचंद्र असे बऱ्याच पुढाऱ्यांचे चेहरे. दुसऱ्या बाजूला भारतातून ब्रिटिश शिपाई बाहेर पडत आहेत असे दाखवले होते. तसेच भारतीय लोकांची खूप मोठी रांग, जी संपूर्ण नकाशावर होती. प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज! हे चित्र मनावर कोरले गेले. खाली लिहिले होते. . . ” छोडो भारत”, “Quit India”. त्यावेळी त्या चित्राचा अर्थ फारसा लक्षात येत नसे. पुढे शाळेत इतिहासाच्या अभ्यासात; तसेच गोष्टी वाचनातून समजत गेले, तसे सर्व गोष्टींचे महत्त्व कळत गेले.
शालेय जीवनात माझ्या हातात एक पुस्तक आले. माझा चुलतभाऊ नाना ( चंद्रकांत ) याने ते मला भेट म्हणून दिले. मुखपृष्ठावर कॅप्टन लक्ष्मीचे लष्करी पोषाखातील आकर्षक रंगीत चित्र, बाजूला लष्करी पोषाखातील महिला. नाना आम्हां भावंडांपेक्षा वयाने बरेच मोठे होते. माझ्या आठवणीप्रमाणे ते ब्रिटिश काळात जेलर म्हणून नोकरीस होते. देशभक्त कैदी लोकांचे हाल त्यांना सहन होत नसत. म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली होती. आमच्या बालमनावर नकळत संस्कार होत गेले. आम्ही बघत होतो, ऐकत होतो, घडत होतो.
आम्ही असे मोठे होत गेलो. वाचन वाढले. संदर्भ लक्षात यायला लागले. ऑगस्ट महिन्यात अनेक सण येतात.पारंपारिक सणांशिवाय सर्व भारतीयांचे आनंदाचे सण, अभिमानाचे दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट क्रांतीदिन आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन!
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसची चळवळ हे जनतेने केलेले तीव्र आंदोलन होते. इ. स. २०२१ साली या चळवळीला एकोणऐंशी वर्षे, २०२२ साली ऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईत ज्या मैदानात या आंदोलनाला सुरुवात झाली त्या मैदानाला ‘ऑगस्ट क्रांतीदिन मैदान’ म्हणून ओळखले जाऊ लागले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रपिता म. गांधीजींनी ‘भारत छोडो’ हा अंतिम इशारा दिला. संपूर्ण देशातील अनेक लोक तरुण पिढी या आंदोलनात सहभागी झाली होती. प्रत्येक व्यक्ती जणू नेता बनली होती. ब्रिटिश सरकारने एक दिवस आधीच म. गांधी आणि प्रमुख पुढाऱ्यांना कैद करुन बंदी केले होते. ८ ऑगस्ट १९४२ या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या सभेत ह्या आंदोलनाचा निर्णय झाला होता. अरुणा असफअली ही शूर धाडसी तरुणी पकडली गेली नाही. ९ ऑगस्ट १९४२ या दिवशी मुंबईच्या ‘ गवालिया टॅंक मैदानात’ ‘तिरंगा ध्वज’ फडकविला गेला आणि ‘भारत छोडो’ आंदोलनाला सुरुवात झाली.
क्रमशः…………
© सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
फोन नंबर : 0738768883
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈