श्री सुधीर करंदीकर
☆ “खुश है जमाना आज पहिली तारीख है” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
फार पूर्वी महिन्याची एक तारीख म्हणजे सगळ्यात आनंदाचा दिवस असायचा, कारण त्या दिवशी पगार मिळायचा आणि तो पण चक्क कॅश.
१ तारीख आणि पगार हा विचार मनात आला, आणि मी चक्क १९७१ सालामध्ये नाशिकला पोहोचलो.
उत्तम मार्काने इंजिनिअरिंग पास केले होते, पण कुठेही नोकरी लागत नव्हती. जवळजवळ पन्नास एक ठिकाणी तरी अर्ज केले असतील, कुठूनही उत्तर नाही. अचानकपणे नशिबाने साथ दिली आणि चक्क नाशिकला हिंदुस्थान एरोनॉटिक्स, मिग विमान तयार करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी लागली. पगार होता २२५ प्लस महागाई भत्ता ४०.
दर एक तारखेला दुपारी पगाराचे पैसे २६५ रुपये हातामध्ये मिळायचे. पैसे नंतर बँकेत भरायचे. आणि लागतील तसे २० रुपये, कधी ४० रुपये बँकेतून काढायचे. मजा असायची.
कंपनी मधला मित्र सिद्धांति याच्याबरोबर एका खोलीत भाड्याने राहत होतो.
खोलीचे भाडे होते प्रत्येकी १५ रुपये, बाहेर चहा प्यायला गेलो तर भोसले टी हाऊस चा चहा होता १२ पैसे, संध्याकाळी बाहेर जेवायला जायचो, तिथे साधे जेवण १ रुपया आणि स्वीट डिश आणि दह्याची वाटी घेतली तर जेवण दीड रुपया. सकाळचे जेवण कंपनीमध्येच व्हायचं, आणि चार्जेस अगदीच किरकोळ असायचे.
रात्रीचे जेवण झाल्यावर मित्राबरोबर फिरायला जायचो. एका छोट्या हॉटेलच्या समोर मोठी शेगडी ठेवलेली असायची आणि त्यावर कढईमध्ये दूध उकळत असायचे. आणि एकीकडे गरम गरम जिलब्या तळणे चालू असायचे. जिलबी मिळायची ३ रुपये किलो. गरम दुधाचा ग्लास वरती साय टाकून किंमत ३० पैसे (या किमतींवर आता विश्वास बसणार नाही). तिथे मस्त बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसायचं, इकडे तिकडे बघत बघत गप्पा मारायच्या, ५० ग्रॅम जिलबी आणि मस्त ग्लासभर दूध प्यायचो. नंतर फिरत फिरत खोलीवर परतून मस्त झोपायचो.
अशा रीतीने पगाराचे पैसे कॅश मिळणे, आणि कॅश खर्च करणे यात एक वेगळीच मजा असायची.
साधारण ११ महिन्यानंतर नाशिकची नोकरी सोडून पुण्याला टाटा इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये आलो, आणि एक तारखेला पगाराचे पैसे हातात मिळणे हा प्रकार संपला.
पण अजूनही महिना संपल्यानंतर कॅलेंडरचं पान उलटलं आणि एक तारीख बघितली की नाशिकची आठवण हमखास येतेच येते. आणि एक छान गाणं पण आठवतं किशोर कुमारचं – खुश है जमाना आज पहिली तारीख है…
तुमच्या पण अशाच आठवणी कळवा, मजा येईल.
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈