☆ दिल ढूंढता है… ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆
“मौसम” चित्रपटातील संजीवकुमारवर चित्रीत झालेलं हे गुलजार लिखित गाणं, मला फार भावलं…. चित्रपटातील नायक तीस वर्षांपूर्वी जिथं जिथं नायिकेसोबत फिरलेला असतो, तिथं तिथं उतारवयात जातो तेव्हा त्याला नायिकेसोबत, तारुण्यातील तो स्वतः देखील दिसू लागतो… वर्तमानात तो भूतकाळातील एकेक गोष्टी अनुभवतो…
आज मी वयाची पासष्टी पूर्ण करुन सहासष्टीमध्ये पाऊल टाकलंय.. माझीही अवस्था, पडद्यावरील संजीव कुमारसारखीच झालेली आहे… वयाच्या पाचव्या वर्षापासूनच्या घडून गेलेल्या गोष्टी, प्रसंग व घटना मला आजही स्वच्छ आठवताहेत…
मी चालू लागतो.. भरत नाट्य मंदिराजवळचं पावन मारुतीचं छोटं मंदिर दिसतं.. इथंच माझं बालपण गेलं. एक वर्षाचा असल्यापासून ते माझं लग्न होईपर्यंतची आयुष्यातील माझी सत्तावीस वर्षं याच परिसरात गेली..
मी चार वर्षाचा असताना आई बाहेर गेली होती म्हणून ती कुठे दिसते आहे का? हे पाहण्यासाठी फिरत फिरत मी महाराष्ट्र मंडळापर्यंत पोहोचलो.. माझा रस्ता चुकलेला पाहून, एका हवालदाराने मला पेरुगेट पोलीस चौकीत नेऊन बसविले… काळजीपोटी माझी आई शोधत शोधत त्या चौकीत पोहोचली.. तेव्हा मी निवांत स्टुलावर बसलेलो होतो.. मी आत्ता चौकीत डोकावलं तर, कंठ दाटून आलेल्या आईने मला उचलून कडेवर घेतलेलं दिसत होतं…
भावे प्राथमिक शाळेत मी पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत होतो.. परवा सकाळी तिथून जाताना मला तिसरीच्या वर्गातील मुलं व मुली रांगेनं रस्त्याच्या कडेने, विजय टाॅकीजकडे ‘देवबाप्पा’ चित्रपट पहाण्यासाठी जाताना दिसली.. त्यात मी देखील होतो… मोठा झाल्यावर मी चित्रपटांच्याच जाहिराती करणार असल्याची ती ‘नांदी’ होती…
मी चालत चालत टिळक रोडवरील माझ्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये पोहोचलो.. सहावीत असताना मी आजारी पडलो होतो.. बरा झाल्यानंतर मी शाळेत गेलो तरी आई मला घरुन डबा घेऊन येत असे.. वर्गात तास चालू असताना मित्रांनी माझ्या आईला पाहिलं की, सरांना ते सांगायचे.. मग मी बाहेर येऊन ग्राऊंडच्या बाजूला फरशीवर बसून डबा खात असे.. येताना तिने गरम पाणी भरुन तांब्या व फुलपात्रही आणलेलं असे… आज ती माउली या जगात नाही.. मात्र आता, तिच्यासमोर मला जेवताना पाहून, माझे डोळे भरुन आलेले आहेत…
शाळा झाल्यानंतर बीएमसीसी मध्ये प्रवेश घेतला.. मित्रासोबत परवाच्या रविवारी काॅलेज जवळून जाताना त्याला मी थांबवलं.. तो गाडी स्टॅण्डला लावून मोबाईलमध्ये हरवून गेला.. मी काॅलेजच्या दरवाजासमोर जाऊन उभा राहिलो… समोर पाहतो तर ‘मंथन’ या हस्तलिखित मासिकाचे संपादक मंडळातील सर्वजण, माझ्यासह फोटोसाठी उभे राहिलेले दिसत होते.. त्या फोटोनंतर मी मित्रांचे फोटो काढू लागलो.. माझ्या ‘पाॅंचवा मौसम’ या कथेतील नायिका, ‘रेवती’ इथेच मला भेटली होती…
काॅलेजनंतर नाटक, चित्रपटांच्या जाहिराती करण्याचा व्यवसाय, मी खालकर तालीम जवळील ‘गुणगौरव’ या इमारतीत सुरु केल्यावर अनेक ज्येष्ठ कलाकार व निर्मात्यांशी जवळून संपर्क आला.. काही दिवसांपूर्वी मी तिथून जाताना, माझ्या टीव्हीएस फिफ्टीवरुन शरद तळवलकरांना चिमणबागेतील त्यांच्या घरी सोडताना स्वतःलाच पाहिले…
अरविंद सामंत यांनी ‘थरथराट’ चित्रपटाचे काम करुन घेतल्यानंतर त्यांनी, त्यांच्या लक्ष्मी रोडवरील ऑफिसमध्ये बसून इथेही काम करत जा असे मला सांगितले होते.. गेल्या आठवड्यात मी त्या ऑफिसवर गेलो… तेव्हा अरविंद सामंत खुर्चीवर बसलेले दिसले.. त्यांच्या समोर मी बिल घेऊन उभा होतो.. त्यांनी त्यांची व्हीआयपीची सूटकेस बंद केली व मला पुढच्या शुक्रवारी आल्यावर मी बिलाचा चेक देईन असे सांगितले… मला मनातून त्यांचा खूपच राग आला होता, ते ओळखून अरविंद हसले व म्हणाले.. ‘चिडका दोस्त’…
माझा मुलगा भावे स्कूल शाळेत शिकला.. काही दिवसांपूर्वी मला घरी जाण्यास उशीर झाला होता.. रात्रीचे साडेदहा वाजले होते.. सहलीला गेलेल्या मुलांची बस अजूनही आलेली नव्हती.. पावसाची रिपरिप चालू होती व शाळेच्या फाटकापाशी मी छत्री घेऊन मुलाची वाट पाहताना दिसलो….
काही दिवसांपूर्वी अप्पा बळवंत चौकात गेलो होतो तेव्हा संस्कृती प्रकाशनाची इमारत दिसली… इथे मी काही वर्षे अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे साकारली… मी पहात होतो, मानपत्रांच्या दोन फ्रेम्स घेऊन मी संस्कृतीचा जिना चढत होतो…
गेल्या महिन्यात मी टिळक रोडवरील साहित्य परिषदेच्या बसस्टाॅपवर उभा होतो.. मागे वळून पाहिलं तर मसापच्या सभागृहात माझ्याच विवाहाचा स्वागत समारंभ चालू होता… गावाहून आलेले नातेवाईक, सदाशिव पेठेतील शेजारी व बरीच मित्रमंडळी दिसत होती…
पंधरा दिवसांपूर्वी केके मार्केट समोरील ‘वाशिष्ठी’ बिल्डींग जवळून जाताना माझे लक्ष गॅलरीकडे गेले.. कोरोनाच्या काळात ‘फेसबुक लेखक’ म्हणून घडणारा, एकाग्र चित्ताने मोबाईलवर टाईपिंग करीत असलेला मी दिसलो….
गेल्याच महिन्यात माझ्या उजव्या डोळ्याचं मोतिबिंदूचं ऑपरेशन झालं.. एक महिनाभर नारायण पेठेतील ऑफिस बंद होतं… नेहमीच्या ग्राहकांना महिन्यानंतर काम करु शकेन, असं व्हाॅट्सअपवर कळवलं होतं… कालच मी नवीन चष्मा करुन घेतला व ऑफिसमध्ये येऊन बसू लागलो… दिवसभरात कुणी आलं नाही की, नैराश्य यायचं… अशावेळी आतापर्यंत मला दिसणारा ‘तो’ समोर आला व म्हणाला, ‘सुरेश, हा महिनाभराचा काळ खरं तर स्वल्पविराम होता.. पूर्णविराम नक्कीच नव्हता, पुन्हा तुझी कामं चालू होतील…. All the best!!!
© सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈