श्री मयुरेश उमाकांत डंके
मनमंजुषेतून
☆ “जंववरी रे तंववरी…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
कुठल्याही गडाचा घेरा पायी चालत पालथा घालणं, हा वरकरणी रिकामटेकडा उद्योग वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र तसं नसतं. आपण फिरायला लागलो की, आपल्याला खूप शिकायला मिळतं. माणसांकडे, त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन नक्की बदलले जातात.
पन्हाळा ते विशाळगड असा पावनखिंड ट्रेक आम्ही सगळे करत होतो. त्यावर्षी ऐन मे महिना असूनही दोन दिवस सलग मुसळधार पाऊस पडत होता. वाटेत लागणाऱ्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमधल्या आयाबहिणींची त्या पावसात प्रचंड धावपळ सुरु होती. जंगलातल्या अशाच एका वाटेवरल्या घरापुढं आम्हीं थांबलो. सरपणासाठी दिवसभर जंगल फिरुन गोळा केलेला लाकूडफाटा पावसात भिजू नये, म्हणून त्या घरातली सगळी माणसं प्रयत्न करत होती. सलग दोन दिवस अविश्रांत पाऊस पडल्यानंतर भिजलेलं सरपण कोरडं पडणार कधी अन् घरात चूल पेटणार कधी?
आमच्या गटात एक सातवीत शिकणारा मुलगा होता. “दादा, हे लोक गॅस वर स्वयंपाक का करत नाहीत?” असा त्याचा प्रश्न. त्या घरातली एक मुलगी म्हणाली, “तो सिलेंडर खालून इथपर्यंत आणणार कोण? सिलेंडरची गाडी इथपर्यंत येत नाही. सिलेंडर बदली करायला रोज खालच्या रस्त्यांवर जाऊन उभं राहावं लागतं. गाडी नेमकी कधी येणार हे सांगता येत नाही. ” दुसरा एक जण त्यावर म्हणाला, “पण तुम्हाला ऑनलाईन बुक करता येईल. त्यावर आधीच मेसेज येतो, सिलेंडर कधी येणार आहे ते समजतं. तेव्हाच आपण जायचं. ” ती मुलगी म्हणाली, ” आमच्या इथं मोबाईल इंटरनेट चालत नाही. रिकामा सिलेंडर एकवेळ कसातरी खाली घेऊन जाऊ. पण भरलेला सिलेंडर वर कसा आणणार? त्याला फार शक्ती पाहिजे. जेव्हा कुणाची गाडी, बैलगाडी खालून वर येणार, तेव्हाच आमचा सिलेंडर वर येणार. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून जड सिलेंडर वर आणता येत नाही. ” आम्हीं सगळे ते उत्तर ऐकून गप्पच झालो. त्या परिस्थितीत उत्तर काढणं किती कठीण असतं हे हळूहळू मुलांच्या लक्षात येत होतं. कळत्या वयात संवेदनशीलता योग्य जाणिवेतून विकसित झाली तर उत्तम असतं. तिला पूर्वग्रह किंवा पोकळ अभिनिवेशाची बाधा झाली तर व्यक्तीच काय, समाजाचं सुद्धा नुकसान व्हायला वेळ लागत नाही.
आम्ही दरवर्षी निरनिराळ्या गडांच्या पायथ्याला असणाऱ्या वाड्या वस्त्यांमधून राहतो. अगदी निर्धास्तपणे राहतो, स्वतःचंच घर असल्यासारखे वावरतो. स्वच्छंद भटकंती करतो, गप्पांचे फड रंगवतो. वीस-पंचवीस जणांच्या सामान-सुमानानं घरं आणि त्या समोरची अंगणं भरुन जातात. पण आजतागायत आमच्या सोबतच्या एवढ्या अवाढव्य सामानातून एक साधं फुटण्याचं पाकीटसुद्धा गायब झालेलं नाही. उलट यापूर्वी मुक्कामी राहिलेल्या माणसांच्या टोप्या, गॉगल्स, मोबाईल चार्जर्स, पॉवर बँका, स्विस नाईफ असल्या कितीतरी अति महागड्या गोष्टी सुद्धा त्यांनी वर्षानुवर्षं निरिच्छपणे एका पिशवीत भरून ठेवलेल्या असतात. अशाच एका कुटुंबात मी व्हॅनगार्ड ची दुर्बीण सुती कापडात गुंडाळून ठेवलेली पाहिली. तीस -चाळीस हजार रुपये किंमतीची ती वस्तू गेली दोन वर्षं त्या कुटुंबात आहे. कुणाची आहे, ठाऊक नाही. पण दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा नाही, हा संस्कार पक्का रुजलेला असल्यानं इथल्या माणसांना असले मोह होतच नाहीत. आपण करमणूक किंवा निवांतपणा म्हणून त्यांच्या परिसरात एक-दोन दिवस राहणं सोपं आहे. पण त्यांचं आयुष्य कायमस्वरूपी जगणं हे फार मोठं आव्हान आहे.
मागे एकदा एका अनुभूती मध्ये आम्ही आमच्यासोबत भारत-भारती चा पुस्तक संच नेला होता आणि रात्री मुक्कामी सगळीकडे अंधार करुन कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात भारतातल्या स्त्री क्रांतिकारकांच्या कथा त्या त्या गावातल्या मुलामुलींना वाचून दाखवत असू. भगिनी निवेदिता, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुस्तिका वाचत असू. मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, खुदीराम बोस, डॉ. रामन, डॉ. विश्वेश्वरय्या, यांच्या गोष्टी गावातल्या मुलामुलींना सांगताना फार वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव आला.
एखाद्या वस्तीत दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलो तर, कोंबड्या पकडण्याचा खेळ एकदम भारी रंगायचा. एखाद्याला वजन कमी करायचं असेल तर हा खेळ एकदम मस्त आहे. झाडावरून एखादा फणस उतरवून त्याचा अगदी मनसोक्त आनंद घेणं, विटीदांडू किंवा गोट्या खेळणं, कैऱ्या पाडणं हा तर अगदी स्वाभाविक उद्योग. कनकेश्वर किंवा रायरेश्वर ते जांभळी पर्यंत जाणारी नेसणीची वाट किंवा केंजळगडाचा पायथा.. करवंदांना तोटा नाही. कोल्हापुरात दाजीपूर किंवा राधानगरी परिसरात भटका, तिथं जांभळं मुबलक.. ! कितीही खा हो, त्या फळांचा मालक फक्त एकच. तो म्हणजे निसर्ग.. !
एका वर्षी तर फार मजा आली. आम्ही प्रतापगड उतरून शिवथरघळीच्या वाटेवर होतो. वाटेत रस्ताभर कैऱ्याच कैऱ्या दिसत होत्या. पण संधी मिळत नव्हती. वरंधा उतरुन शिवथर घळीच्या जवळ पोचलो अन् संधी मिळाली. एका काकांना गूळ लावून आठ दहा कैऱ्या काढून घेतल्या. त्यातल्या तीन-चार पाडाच्या होत्या. आमच्यातल्या एकाचं डोकं बरोब्बर चाललं. त्यानं फोल्डिंग सुरी काढली आणि त्यातल्या कच्च्या कैऱ्या बारीक चिरल्या. एका छोट्या पातेल्यात काढल्या, त्यांना साखर, मीठ, तिखट लावलं आणि झाकून ठेवल्या. सॅक मधून दोन लिंबं काढली. चॉपर काढून कांदे, टोमॅटो, काकडी बारीक कापून घेतली. आणि कोरडी भेळ काढून मोठ्या पातेल्यात सगळं एकत्र करायला घेतलं. झकास भेळ तय्यार.. ! एकट्यानंच पंचवीस जणांसाठी भेळ केली आणि तीही फक्त पंधरा मिनिटांत.. ! चारही बाजूंना नुसत्या डोळ्यांच्या भुवया उंचावल्या तरी अवाढव्य डोंगर दिसतात, अशा ठिकाणी एका भल्यामोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसून आम्ही भेळ खात होतो. आजूबाजूला खारी, साळुंक्या, चिमण्या अगदी निर्धास्तपणे बागडत होत्या. व्वा.. ! ती दुपार आणि ती भेळ मी कधीही विसरु शकणार नाही.
एखाद्या विस्तीर्ण पठारावर आपली छोटीशी राहुटी टाकून, समोर शेकोटी पेटवून, मंद वाहत्या गारव्यात, शाल पांघरून मस्त गप्पा मारत बसणं, हा अनुभव जोवर आपण घेत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यातली श्रीमंती कळणार नाही. एरवी रात्रभर जागरण करत मोबाईल फोनमध्ये डोकं खुपसून बसणारा सुद्धा अशा वातावरणात रात्री साडेनऊ – दहा वाजता गाढ झोपी गेलेला असतो. रात्रभर शेकोटी ऊब देत राहते. पहाटे चाराच्या सुमाराला पक्ष्यांचा किलबिलाट सुरु झाला की, आपोआप डोळे उघडतातच.. ! रात्र-रात्र झोपच लागत नाही असं रडगाणं गाणारे सुद्धा अशा वातावरणात चटकन निद्रादेवीच्या अधीन होतात.. !
अनुभूती मध्ये मोबाईल फोन, स्मार्ट फोन, आयपॉड, कॅमेरा अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत असलेल्या चालत नाहीत, त्याचाच मोठा लाभ सहभागी असणाऱ्यांना होतो. आपले डोळे, कान खऱ्या निसर्गाचा अनुभव आणि आनंददायक प्रत्यय घ्यायला लागतात. आजवर कधीही न जगलेलं खरंखुरं जगणं अनुभवायला लागतात. साहजिकच, आपल्यालाच आपल्या आनंदमय कोषाचा नव्यानं परिचय व्हायला सुरुवात होते. हीच तर खरी अनुभूती… !
यांत्रिक सुखात आळसावलेल्या आणि सुखासीन आयुष्य जगणाऱ्या आपल्या मुलांच्या मनांना आणि शरीरांना आलेलं जडत्व हाच तर त्यांचा खरा शत्रू आहे. यंदाच्या सुट्टीत हे व्हर्च्युअल जडत्वाचं जोखड आपल्या मुलांच्या खांद्यावरून उतरवून टाकायला हवं. त्यांनी स्वतः पलिकडचं थोडं तरी जग पहायला हवं, जगायला हवं. त्यातून त्यांना मिळणारी समृद्धता आणि अनुभवांची श्रीमंती इतकी वेगळी आणि अक्षय्य टिकणारी असेल, की आयुष्यभर ही शिदोरी त्यांना आनंद देत राहील.
हॉटेलिंग, शॉपिंग, सोशल मीडिया, वातानुकूलित आराम हेच खरं आयुष्य असा आपला समज असतो. पण हा असा नवा अनुभव मिळाला की, ही जुनी बेगडी कागदी सजावट पाचोळ्यासारखी उडून जाते. ज्ञानोबारायांचं एक फार सुंदर भारुड आहे –
“जंववरी रे तंववरी जंबुक करी गर्जना ।
जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥”
माऊली म्हणतात – कोल्हा मोठमोठ्या गर्जना करत असतो. पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला सिंहाचं दर्शन होत नाही तोपर्यंतच..
आपल्या मुलांचं तसंच काहीसं असतं. वरवर दिसणाऱ्या चकचकाटानं त्यांना मोहिनी घातलेली असणारच. पण कुठपर्यंत? जोपर्यंत साध्या आणि निसर्गाशी तादात्म्य पावणाऱ्या जीवनशैलीशी त्यांची ओळख होत नाही तोपर्यंतच.. !
© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ
संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈