श्री मोहन निमोणकर
☆ “दात काढणे…” – लेखक : श्री अनिल बापट ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
अहं..ss..अहं मी क्रियेबद्दल बोलत नाहीये,तर शब्दशः दात काढण्याच्या प्रक्रियेविषयी बोलत आहे.
रोज दात घासत असूनही वयोमानानुसार एक एक दात माझ्याशी दगाबाजी करत होता.
राहिलेल्या दातांवर, खार न खाता, वेळोवेळी आवश्यकतेनुसार दाताच्या डाॅक्टरकडे जाऊन दातांची सफाई व इतर सोपस्कार करण्याचाही आता कंटाळा येऊ लागला होता.
आपल्याला सोसवेल या दृष्टिकोनातून आताच राहिलेले दात काढून घ्यावेत हा माझा विचार माझे डाॅक्टर जवळपास 3/4 वर्षे मोडीत काढत होते.
2025 साली मात्र ,आता परत दातांची तक्रार आली की दात काढायला सुरवात करायचीच ह्या निर्णयाला ठाम राहून डाॅक्टरांनाही तसे कळवून आलो होतो.
साधारण मार्च महिन्यात दात काढण्याची प्रोसेस चालू झाली.
4/5 भेटीत सर्व दातांना फारसा त्रास न होता निरोप देऊन झाला.जखमा भरून आल्या .आता थोडे थोडे पदार्थ मऊ करून खाता (गिळता )येऊ लागले.
कोणतीही गोष्ट चावून खाता येत नाही हे लक्षात आल्यावर खरी परिक्षा चालू झाली.
आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या विषयावर ,आपण दुसर्याला आवडीने का चावत असतो त्यामागची मेख लक्षात आली.
” मुकाटपणे गिळा ” असे म्हणायचीही सौ.ना मुभा नव्हती, कारण शब्दशः गिळणेच चालू होते.
ती बिचारी मला काय काय खायला देतात येईल,याच्या कायम विचारात व तयारीत असायची.
दात काढलेले असल्याने मोकळे झालेल बोळके घेऊन बाहेरही फारसे जाता येत नव्हते.
शाळा काॅलेजच्या मित्र मौत्रिणींना,आत्ताच ट्रिपचे बेत ठरवण्याचा दांडगा उत्साह आला होता. सोशल लाईफ जवळपास बंद पडलेले होते.
हिरड्या मजबूत झाल्याशिवाय कवळीचे माप देणे योग्य ठरणार नसल्याने वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. परिस्थितीला मी [दाती त्रूण धरून असेही म्हणण्याची सोय नव्हती म्हणून ] निमूटपणे शरण गेलो होतो.
एक मात्र खरे, तोंडातून शब्द बाहेर पडताच, त्याची पूर्तता व्हावी, या माझ्या अपेक्षांना परिस्थितीने काहीसे योग्य वळण दिले होते.आता उरलेल्या आयुष्यात ते वळण तसेच राहो व वाट सरळ न होवो हीच अपेक्षा आहे.
काही काही वेळेस वळणा वळणाचा घाटही सुखावतो त्याचीच प्रचीती आली.
आईच्या दुधावर पोसलेल्या दातांपासून सुरू झालेला हा प्रवास, कृत्रिम कवळीपर्यंत फारसे धक्के बुक्के न बसता सुखावहपणे पार पडला याचेच समाधान आहे.
मला दुधाचा पहिला दात आल्यावर त्याचे आई वडिलांनी केलेले कोड कौतुक आठवता,कवळीचे कौतुक करायला आता ते हयात नाहीत हीच सल आहे.
– – – समाज काय करतो ते पहायचे.
लेखक : श्री अनिल बापट
बाणेर,पुणे.
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈