डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बड्डे… बिड्डे…. अन् रिटर्न गिफ्ट…!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
आज 17 एप्रिल माझा जन्मदिवस!
ज्यांना माहित होते, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या, या सर्वांचा मी ऋणी आहे!
आजही मी नेहमी सारखाच भिक्षेकऱ्यांच्या सेवेसाठी ठरलेल्या स्पॉटवर गेलो, तिथे एक वेगळा सुखद धक्का बसला.
श्री अमोल शेरेकर, स्वतः दिव्यांग असून आपल्या सोहम ट्रस्टमध्ये अन्नदान प्रकल्प पहात आहेत.
यांच्या निमित्ताने अनेक दिव्यांग कुटुंबांनी मला त्यांच्यात सामावून घेतले आहे.
माझ्या स्पॉटवर मी पोचलो, मोटरसायकल स्टँडवर लावताना अचानक माझे पाच-पन्नास दिव्यांग बंधू-भगिनीं समोर दिसले… कुणी कुबडी घेऊन आले होते, कोणी काठी, तर कोणी व्हीलचेअरवर.
नेमकं झालंय काय मला कळेना…
त्यांच्याजवळ जाऊन मी भांबावून विचारले, ‘अरे काय झालं? तुम्ही इथे सर्व कसे? ‘
सगळे एका सुरात म्हणाले, हॅपी बड्डे सsssर…!
‘अच्छा असं आहे होय? घाबरलो की रे मी…’ असं म्हणत हसत सर्वांचे हात हातात घेतले.
ज्यांना हातच नाहीत त्यांच्या पायांना स्पर्श केला…!
कोणाला पाय नाहीत, कोणाला हात नाहीत… याही परिस्थितीत कुबड्या काठ्या व्हीलचेअरवर हि मंडळी कुठून कुठून कसरत करत, बस / रिक्षा / चालत आली होती…
हे प्रेम, ही माया कुठून आणि कशी उत्पन्न होत असेल?
मतिमंद म्हणून ज्यांच्यावर शिक्का बसला आहे अशी तीन मुलं माझ्या कमरेला विळखा घालून, हॅपी बड्डे… हॅपी बड्डे… म्हणत नाचत होती… नव्हे मला नाचवत होती…!
कसं म्हणायचं यांना दिव्यांग?
कसं म्हणू यांना मतिमंद?
समुद्रात / नदीमध्ये विसर्जित केलेली मूर्ती…
कालांतराने या मूर्तीचे हात, पाय, मुकुट आणि चेहऱ्यावरचा रंग अशा अनेक बाबी निसर्गामध्ये विलीन होतात. पण अशी हात नसलेली, पाय नसलेली, मुकुट नसलेली मूर्ती दिसूनही श्रद्धा असलेल्या माणसाचे हात नमस्कारासाठी आपोआप जुळतात…! वेगवेगळ्या समुद्रातून, नदी मधून, तलावामधून अशा सर्व भंगलेल्या मूर्ती आज माझ्यासमोर प्रत्यक्ष येऊन, मूर्त स्वरूपात मला आशीर्वाद द्यायला माझ्यासमोर उभ्या होत्या… कुणी दिव्यांग म्हणो… कोणी मतिमंद म्हणो…. माझ्यासाठी या भंगलेल्या, परंतु पवित्र मूर्तीच आहेत…. भंगलेल्या या पवित्र मूर्तींसमोर मग मी नतमस्तक झालो…!
मी कुठल्याही मंदिर मशीद गुरुद्वारा चर्चमध्ये गेलो नाही… तरी मला भेटायला, आज देवच माझ्या दारात आला, माऊली….! ! !
माझ्या या सर्व देवांनी केक आणला होता, माझे स्नेही डीडी (फेसबुकचा आणि मनाने अत्यंत श्रीमंत असलेला राजा, श्री धनंजय देशपांडे) हे कानीकपाळी ओरडून सांगतात, केक नका कापू, कलिंगड कापून वाढदिवस साजरा करा…!
माझा तोच विचार होता, परंतु या सर्वांनी येतानाच खूप महागाचा केक आणला होता, आता केक नको, कलिंगड कापू असं म्हणून त्यांचा हिरमोड करण्याचं माझं धाडस झालं नाही…. Next time नक्की DD.
तर या सर्व गोष्टी आमच्या भिक्षेकरी आजी-आजोबा, मावश्या, बंधू भगिनी यांच्यासमोरच सुरू होत्या.
.. डाक्टरचा आज वाडदिवस हाय, हे समजल्यानंतर आम्हाला का नाही सांगितलं म्हणून त्यांनी आधी माझी खरडपट्टी काढली.
‘ आगं हो, आरे हो… सांगणारच होतो ‘.. म्हणत वेळ मारून नेली.
मी आमच्या लोकांना मग वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली. बाजूला सहज लक्ष गेलं, अनेक आज्या मावश्या आणि माझे भाऊ एकत्र येऊन, गंभीर चेहऱ्याने काहीतरी खलबतं करत होते.
– – भारताची अर्थव्यवस्था, अमेरिकेने भारतावर लादलेले कर, कोसळलेला शेअर बाजार, महागाई अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते गहन चर्चा करत असावेत; असं समजून हसत मी माझं काम चालू ठेवलं.
माझं काम संपलं… मी उठलो, पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो, इतक्यात एक मावशी आली आणि दरडावणीच्या सुरात म्हणाली, ‘वाडदिस हूता तर आदी आमाला का नाय सांगटलं, पयलं ह्याचं उत्तर दे… ‘
‘आगं… ‘
‘आगं आनं फगं करू नगो, हुबा ऱ्हा… ‘
रोबोट प्रमाणे तिने जिथे सांगितले तिथे मी उभा राहिलो. यानंतर एक भला मोठा हार माझ्या गळ्यात घालण्यात आला, पेढ्यांचे चार पाच बॉक्स समोर आले. काहीतरी गोड द्यायचं म्हणून कोणी उसाचा रस आणला, कोणी लस्सी, कुणी गुलाबजाम ज्याने त्याने आपापल्या परीने काही ना काहीतरी आणलं होतं.
कुणी पारले बिस्कीट, कुणी गुड डे बिस्किट, कुणी वडापाव, कुणी केळी, तर कोणी प्रसादात मिळालेला शिरा… प्रत्येकाला वाटत होतं त्यांनी आणलेली प्रत्येक गोष्ट मी संपूर्णपणे खाऊन इथेच चट्टामट्टा करावी…
मी लटक्या रागाने म्हणालो….
‘म्हातारे तु सहा केळी आणली, बाबांनं चार वडापाव आणले, मावशीनं पारलेचे सहा पुडे आणले… पाच पेढ्याचे बॉक्स आणलेत…. एकदाच खाऊ घालून काय मारता का काय मला वाढदिवसाला…? ‘
ती म्हणाली ‘खा रं ल्येकरा, आमी भिकारी हाव, भिकारी म्हणून, आमाला कुनी बी कायबाय देतंया, पण नौकरी, कामधंदा सोडून तू आमच्यासाठी एवड्या खस्ता खातो… तू काय कुटं कामाला जात न्हायी…. मंग तुला तरी कोन देइल…?’
‘खा रं माज्या सोन्या.. तुला माज्या हातानं सोन्याचा न्हाय… पन येवडा तरी योक घास भरवू दे… खा रं… माज्या बाळा… आ कर.. आ कर… हांग आशी… ‘
‘आम्हाला कुनी बी देईल, तुला कोण देणार?‘
– – या वाक्याने अंगावर काटा आला… ती मला स्वतःच्या तराजूत तोलते… स्वतः ज्या पायरीवर उभी आहे त्याच पायरीवर ती मला पाहते… ती मला सुद्धा भिक्षेकरी समजते…
स्वतःला जी दुःख आहेत तीच दुसऱ्याला असतील हे ती समजते…
दुसऱ्याशी ती एकरूप होऊन जाते…
…… अद्वैत म्हणजे आणखी काय असतं???
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈