श्री मयुरेश उमाकांत डंके
☆ “आम्हां काय त्याचें” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
पुण्यात पहलगाम हल्ल्याची बातमी समजली, तेव्हा मी एका मिटींगमध्ये होतो. आजूबाजूला बरीच माणसं होती. काम संपवून मी बाहेर पडलो आणि तशाच अस्वस्थ मनस्थितीत घरी आलो. येताना डोळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मस्त निवांत आणि आनंदाने मजा करणारे “भारतीय नागरिक” दिसत होते. कुठं कुणी गटागटाने सिगारेट्सचे झुरके घेत उभे होते, कुठे कुणी खाऊगल्लीत मस्त आस्वाद घेत होते, कुठे एखाद्या हॉटेल बाहेर लोक वेटींग मध्ये होते, मॉल खचाखच भरुन वाहत होते. काश्मीरमध्ये काहीतरी विपरीत घडवून आणलं गेलं आहे आणि हिंदू व्यक्तींना वेगळं काढून मारण्यात आलं आहे,हे लोकांच्या खिजगणतीतही नव्हतं.
‘जन्माला आलो हेच कर्तृत्व’ अशा अनेकांच्या वाढदिवसाची तयारी केकशॉप्स च्या बाहेर सुरु होती. आजही बारा वाजता सात-आठ ठिकाणी वाढदिवसाचे फटाके वाजलेच..!
आमच्या बाजूच्या वस्तीत कुठल्याशा कार्यक्रमाचा डॉल्बी चालू होता. काश्मिरबद्दल दुःख व्यक्त करायला सवड कुणाला आहे इथं ?
“भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.” हे शब्द शालेय वर्षं संपली की लोक विसरुन जातात. नंतर “भारत कधी कधी माझा देश आहे” अशी त्यांची धारणा होते. आणि आणखी काही वर्षांनी “भारत माझ्या फायद्यापुरताच माझा देश आहे” अशी मनस्थिती होते. हेच सत्य आहे.
आपल्याकडे सिनेमा थिएटर्स मधून प्रत्येक शो च्या आधी राष्ट्रगीत होतं. पण किती खाजगी कोचिंग क्लासेस मधून प्रत्येक बॅच च्या सुरुवातीला दररोज राष्ट्रगीत होतं? किती भाजी मंडयांमधून रोज राष्ट्रगीत होतं? किती स्पर्धापरीक्षा सेंटर्स मधून दररोज प्रत्येक बॅच च्या सुरुवातीला राष्ट्रगीत होतं? किती मॉल्स मधून दररोज राष्ट्रगीत होतं? हे शोधलं आहे का कुणी? शालेय वयात रोज म्हटलं जाणारं राष्ट्रगीत नेमकं कळत्या वयात आल्यानंतर ऐच्छिक कसं होतं? याच्या उत्तरावर कुणी शोधपत्रकारिता केली आहे का?
हिंदू सणांना अवाढव्य डॉल्बी लावणारे, फ्लेक्स लावणारे आता निषेधाचे फ्लेक्स लावणार का? निषेध आंदोलन करणार का? श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करणार का? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? पहलगाम मध्ये अगदी वेचून काढून २८ हिंदू पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, याच्या निषेधार्थ या डॉल्बीजीवी लोकांनी काय केलं? क्रिकेट मॅच जिंकल्यावर रस्त्यांवर एकत्र येऊन जल्लोष करणारे भारतीय नागरिक अशा दुःखद प्रसंगी एकत्र का येत नाहीत ? गाड्यांच्या नंबरप्लेट्स वर ‘हिंदू ‘ असं केशरी अक्षरांत लिहून घेणारे आता पहलगाम मधल्या हिंदूंच्या संहाराबाबत काय भूमिका घेणार?
“काश्मीर मध्ये आत्ता काय घडलं, ते तुम्हाला माहिती आहे का?” यावर कुणी पत्रकार किंवा व्हिडिओ जर्नलिस्ट पुण्यातल्या मॉल्स मध्ये मुलाखती घेत फिरला का? त्यानं मजा मारणाऱ्या तरुणांना विचारलं का? एका तरी आंदोलक संघटनेला “आता तुम्ही याचा निषेध का केला नाही?”असं विचारलं का? आयपीएल च्या टीम्स काळ्या पट्ट्या लावून खेळणार का? कालपासून एक तरी माध्यम प्रतिनिधी स्वतःच्या दंडाला काळी फित लावून वृत्तांकन करताना दिसला का?
एकाही दुकानाबाहेरची विद्युत रोषणाई काल बंद करण्यात आली नाही. कुठल्याही घराची मंगल कार्यासाठी केलेली रोषणाई काल बंद करण्यात आली नाही. उलट मोठमोठ्याने डॉल्बी लावून लोक नाचत होते. एखाद्या महापुरुषाच्या बाबतीत काही घडलं की, देशभर दंगली उसळतात. त्याप्रसंगी जे हातात दगड घेतात, बसेस फोडतात, वाहने पेटवून देतात, ते आज हिंदूंच्या अशा प्रकारे कत्तली झाल्यावर व्यक्त का होत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. सामान्य माणसांच्या भावना जितक्या त्यांच्या आराध्य महापुरुषांशी जोडलेल्या असतात, तशाच त्या राष्ट्रभावना आणि देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हिताशी जोडलेल्या असतात का? ह्याचं उत्तर आजतागायत कुणी शोधून काढलंय का?
कुणी कुठं एखादं वाक्य आक्षेपार्ह बोललं की, त्यावर त्याच्या फोटोला जोडे करण्यापासून ते त्याच्या फोटोवर लघुशंका करेपर्यंत आंदोलक निरनिराळी कृत्ये करतात. इथं तर भारताच्या २८ हिंदू नागरिकांनी केवळ हिंदू असल्यामुळे जीव गमावला आहे, आता कुणाचा आणि कसा कसा निषेध करणार?
काल एकाही मराठी कार्यक्रमाच्या आधी श्रद्धांजली आणि निषेधाची स्लाईड दाखवण्यात आली नाही. पुण्यातल्या चौकाचौकात डिजिटल जाहिरातींचे बोर्ड लावले आहेत, त्यावर निषेधाच्या स्लाईड दाखवण्यात आल्या नाहीत. भर गर्दीच्या चौकात हातात कुठलेशे पाचकळ बोर्ड हातात घेऊन रिल्स बनवणाऱ्यांनी काल निषेधाचा बोर्ड हातात घेऊन रिल्स केली नाहीत. एकाही स्टँड अप कॉमेडियनने “मी ह्या कृत्याचा निषेध करतो” असा बाईट केला नाही.
आपण भारतीय नागरिक अशा घटना मनाला लावून घेतच नाही. कारण त्यात आपलं स्वतःचं व्यक्तिगत असं काहीच नुकसान झालेलं नसतं. “ज्यांचं नुकसान झालं आहे, ते बघून घेतील, मला काय त्याचं?” ही अंगात मुरलेली वृत्ती आपण कधी आणि कशी उपटून काढणार? हा प्रश्न आहे.
अशा घटना घडल्यानंतर समाज म्हणून आपण काय करतो, हे आता तरी देशाचा घटक म्हणून स्वतःच्या आतल्या आवाजाला आपण विचारणार आहोत का?
किती शाळांमधून आज सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मैदानात एकत्र उभे राहून या मृत हिंदूंना श्रद्धांजली अर्पण केली? किती परिवारांमधून पालकांनी आपल्या मुलांशी या घटनेबाबत बसून सविस्तर चर्चा केली? किती कोचिंग क्लासेस नी श्रद्धांजली आणि निषेधासाठी एक मिनिट वेळ दिला? किती स्पर्धा परीक्षा सेंटर्स आणि अभ्यासिकांमधून सनदी अधिकारी होण्यासाठी अभ्यास करणाऱ्या मुलामुलींनी काल आणि आज या घटनेवर निषेधात्मक भूमिका व्यक्त केली? आहे का ह्याचं उत्तर कुणाकडे? हे सगळे म्हणतील – “ते आमचं कामच नाही आणि असा काही निषेध करायला आम्ही बांधील नाही. आम्ही कशावर व्यक्त व्हायचं अन् कशावर नाही, हे तुम्ही आम्हाला शिकवू नका.”
मला कालपासून प्रश्न पडला आहे की, आता विद्यापीठातल्या ललित कला केंद्राच्या वार्षिक परीक्षा सुरु होतील, त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा होईलच. काही काळापूर्वी रामायणावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाखवणारे विद्यार्थी पहलगाम च्या घटनेवर आधारित नाटक करणार का? पुरुषोत्तम करंडक किंवा फिरोदिया मध्ये पहलगाम घटनेवर आधारित एक तरी स्क्रिप्ट दिसणार का? मराठी नाट्यसृष्टी किंवा चित्रपट सृष्टी मध्ये या घटनेवर एकतरी वास्तव आली सत्य कथानक पडद्यावर येणार का? आहे का ह्याचं उत्तर?
मातृभूमीला माता मानणाऱ्या परिवारांमधून “आम्हा काय त्याचे” ही वृत्ती आधी खोडून काढली पाहिजे. घराघरांतून मुलांना “आपण असल्या भानगडीत पडायचं नसतं. तू तुझा अभ्यास कर” असले डोस देणं आधी बंद केलं पाहिजे. हा आपल्या देशाचा प्रश्न आहे आणि तो अत्यंत गंभीर आहे, हे आपल्या देशातल्या प्रत्येक कुटुंबानं मान्य केलं पाहिजे. कुटुंबातून राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याचे संस्कार जोवर प्राधान्यक्रमाने होणार नाहीत, तोवर “मला काय त्याचे ” ही भारतीयांची वृत्तीच शत्रूचं बळ वाढवणारी ठरणार आहे. संपूर्ण देश केवळ सोशल मीडियावर नाही तर प्रत्यक्ष सक्रिय रुपात एकत्र उभा राहिला तरच जगाला योग्य संदेश जाणार आहे.
नागरिक म्हणून आमचं चारित्र्य जितकं प्रखर राष्ट्राभिमानी असायला हवं तितकं आहे का? सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्याव्यतिरिक्त आमची स्वतःची भारतीय नागरिक म्हणून काही भूमिका आहे का? आणि निरपराध व्यक्तींना केवळ धर्मांधतेमुळे मुद्दाम मारण्यात आलं, ह्याचं सुतक देशातला प्रत्येक हिंदू पाळणार का? ह्या प्रश्नांची खरी आणि प्रामाणिक उत्तरं मिळू शकणार नाहीत. कारण, “मला काय त्याचे” ही वृत्ती आमच्या रोमारोमांत भिनली आहे.
©️ श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈