सुश्री नीता कुलकर्णी
☆ प्रेमाचे झाड… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆
आमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. हळूहळू मोठे होत होत ते आमच्या गॅलरीपर्यंत आले. कोवळी पोपटी मऊशार पानं दिसायला लागली. त्यावरून अलगद हात फिरवावा असं वाटे.
हळूहळू पान मोठी होत जाताना बघणं फार आनंदाच वाटत होत. अगदी गॅलरीतल्या कठड्या जवळच फांद्या होत्या. काही फांद्या आतही आल्या…
एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली..
“अरे म्हणजे आता चिंचा येणार “
मी अगदी आतुरतेनी वाट पाहायला लागले. कोवळी नाजूक चिंच दिसली….
हळूहळू मोठी होत गेली… निसर्गाचा तो सोहळा बघताना फार मजा येत होती. रोज उत्सुकतेनी मी बघत होते.
होता होता चिंच चांगलीच मोठी झाली. चिंचेचे आकडे तयार झाले.
ते बघून शाळेच्या दारात चिंचा विकणाऱ्या मावशी आठवल्या… तेव्हा चिमणीच्या दाताने तोडलेला तुकडा आठवला. मैत्रिणी, शाळा, बाई आठवल्या……..
आणि नंतर या झाडाची गंमतच सुरू झाली.
घरी कोणी आलं की आधी त्यांना घेऊन गॅलरीत जायचं आणि हे झाड दाखवायचं..
एकदा मैत्रिण व तिची जाऊ आली. तिच्या जावेने तर फांदी हातात घेऊन अगदी गालाजवळ नेली… तिचे डोळे भरूनच आले होते. ती म्हणाली
“अग नीता आमचं घर म्हणजे फक्त दोन छोट्या खोल्या होत्या. पण दारात एक भलं मोठं चिंचेचे झाड होतं. त्याच्या सावलीतच आम्ही अभ्यास केला तिथेच मैत्रिणींशी गप्पा मारल्या. बाबा आणि आजोबा त्याच्या सावलीत झोपायचे. या झाडाला आज स्पर्श करून खूप समाधान वाटलं बघ.. त्याच झाडाची आठवण आली. “
विलक्षण प्रेमाने ती बोलत होती.
झाडाला बघून तिचा हळवा कोपरा उघडला होता…. निघताना पण तिने हलकेच फांदीवरून हात फिरवला…
झाड मोठं व्हायला लागलं. चिंचा आता छान वाळल्या होत्या.
एक मध्यम वयाच जोडपं आलं. झाड झोडपून देतो म्हणाले.
“आम्हाला थोड्या चिंचा द्या बाकी तुम्ही घेऊन जा “म्हणून सांगितलं.
त्यांनी चिंचा पाडल्या. पोती भरली. आम्हाला दिल्या. खुश होऊन निघाले. निघताना त्या बाईं झाडाजवळ गेल्या झाडाला डोकं टेकवलं….. कवटाळलं नमस्कार केला… देवाला करावा तसा..
मी बघत होते
“फार झोडपल बघा झाडाला… पण चिंचा पाडण्यासाठी असं करावंच लागतंय बघा… “
त्या म्हणाल्या.
झाडाबद्दल तेवढी कृतज्ञता..
पुढे सांगत होत्या..
“आम्ही शेतकरीच आहोत भाऊकी सुरू झाली…. छोटा तुकडा वाट्याला आला.. मग शेती विकली. पैसा घेतला आणि आता शहरात आलो जगायला… “
काय बोलावं मला पण काही सूचेना…. डोळे भरून आले..
” बरं ताई येतो आम्ही परत पुढच्या वर्षी” असं म्हणून दोघं निघाले.
निघताना दादांनीही झाडाला डोकं टेकवलं…
हाडाचे शेतकरीच होते ते…
काही दिवसांनी लक्षात आलं की झाडावर दोन पक्षी येऊन बसत होते. त्यांचे विभ्रम चालायचे..
मैत्रीण आली होती तिला सहज सांगितले.
“हेच दोघे येऊन वेगळे बसतात बघ. प्रेमात पडलेले असतील बहुतेक”
ती बघायला लागली..
” चल ये आत कॉफी करते”
म्हटलं तर ती तिथेच उभी…
लक्ष त्या पक्षांकडेच म्हणाली “पक्षांमध्ये जात, धर्म, पंथ नसतात हे किती बरं आहे ना… सुखात राहू दे यांची जोडी… “
पक्षांना बघून तीच खूप जुनं दुःख नकळत वर आलं होतं…
अशावेळी काही बोलूच नये..
शांतपणे मी आत आले.
नंतर पण घरी आली की गॅलरीत जाऊन झाड बघून यायची…
का… अजून काही आठवायची…………
खारूताईच चिंच खाणं बघत राहावं असं असायचं. बाईसाहेब मजेत दोन पायांच्या मध्ये चिंच धरायच्या आणि खात बसायच्या…
ह्या झाडाच्या तर मी प्रेमातच पडले होते.
री डेव्हलपमेंट होणार म्हणून काही दिवस घर सोडायचे होते. झाडाला सोडायचे वाईट वाटत होते.
दोन्ही नातवंड साहिल शर्वरी आले. चिंचा काढल्या. त्यांनाही झाडाबद्दल विलक्षण प्रेम वाटत होतं. ममत्व होतं….
“आता खाली पार्किंग येणार मग आपला फ्लॅट अजूनच वर जाणार आपल्या गॅलरीत हे झाड नसणार रे” साहिलला मी म्हणाले.
तर तो म्हणाला
“अग आजी तोपर्यंत झाड पण वाढणार नाही का? मग ते आपल्या गॅलरीत येणार… “
“अरे हो खरंच की”
त्याच्या बोलण्याने मन आनंदुन गेलं.
येताना झाडाचाही निरोप घेतला.
भेटू काही वर्षांनी…
आणि मधुन मधुन येत जाईन रे तुला बघायला… झाडाला सांगितलं.
वारा आला.. फांद्या हलल्या…
माझं मलाच छान वाटलं…
असा जीव जडला की लांब जाताना त्रासच होतो…
मग तो झाडावर जडलेला असला तरी…
© सुश्री नीता कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈