श्री विजय गावडे
मनमंजुषेतून
☆ एक अनोखी अनुभूती! ☆ श्री विजय गावडे ☆
जुन्या घरातून नवीन घरात शिफ्ट करतांना काय नेऊ, काय नको या द्विधा मनस्तितीतून जात होतो. देव्हारा हालवताना मन गलबललं. देव्हाऱ्यातील सगळे देव एका जागी डब्यात ठेवून, खाली देव्हाराही हलवला.
दोघांचेही बाबा फोटोतून आमच्या हालचालीवर नजर ठेवून होते. तिचे बाबा, माझे बाबा. दोघेही जिगरी दोस्त.“ ते फोटो गावी नेऊ. राहू देत तो पर्यन्त इथे.” ही म्हणाली. मीही आग्रह नाही केला.
सामान सुमान आता व्यवस्थित लावून झालंय. देव्हारा पण छान सजलाय. लहानसा लामणी दिवा लटकताना खूपच शोभून दिसतोय. हा दिवा आणि विठ्ठल रखुमाईची ‘कटेवरी कर’ वाली मूर्ती पंढरपूरी खरेदी केलेली. सासरेबुवा महिंद्रातून रिटायर झाल्यावर आम्हा सर्वांना पंढरपूर यात्रा घडवली होती त्यांनी. स्वखर्चाने.
“अरे! विठोबा रखुमाई कुठाय? देव्हारी तर नाहीये. गेली कुठे. घेताना तर सर्व सान थोर देवताना एकत्र घेतलेलं. गेली कुठे?”——अचानक हिच्या गालावरून अश्रू ओघळले. जोरजोरात हुंदके देत हिला रडताना पाहून मीही हादरलो. रडू आवरून तिला बोलतं केलं—. “ आपल्या दोघांच्या वडिलांना मागे ठेऊन आलो आपण. त्याचीच ही परिणती. विठोबा रखुमाई दोघही रुसलीत आपल्यावर.”
——लागलीच जुन्या घरी जाऊन दोघांही बाबांना सम्मानपूर्वक नवीन घरी आणलं!
पुनः शोध. विठूरखुमाईचा. रखमाय रुसलेली ऐकलेलं. इथे तर दोघेही आमच्या दोघांवर रुसलेली. सहन होत नव्हतं. अस्वस्थता वाढत होती, आणि आज शेवटी त्या कटेवरी कर घेतलेल्या दोघांच दर्शन झालं एकदाचं. गणेशाच्या विश्वास बसणार नाही एवढ्या लहान तस्विरीच्या मागे लपले होते विठुराया, सहकुटुंब! आमच्या कन्या रत्नाचं आगमन होण्यासाठी थांबले होते जणू, प्रगट व्हायचे!
की दोघांच्याही जन्मदात्यांना मागे ठेऊन आल्यामुळे रुसलेले जगत्पिता!—-तो विठुरायच जाणो.
पंढरीनाथ महाराज की जय
© श्री विजय गावडे
कांदिवली, मुंबई
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈