श्री सुहास सोहोनी
मनमंजुषेतून
☆ चेक पोस्ट ड्युटी..शब्दांकन शीतल चव्हाण ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
(काळजाला हात घालणारा प्रसंग)
—-चेकपोस्ट अंकली…सोबत संजय जाधव सर… दुसऱ्या दिवशी पोलिसांनी काय मनावर घेतलं कुणास ठाऊक?..पण दुसऱ्या दिवशी सगळ्याच गाड्यांची झडती घेतली… पण तेवढ्यात सुध्दा लोकं डोळा चुकवून सटकत होती,…आणि जी अडवली जात होती त्यांच्या हातात हमखास दवाखान्याची फाईल…म्हणजे गेल्या 5 वर्षात जेवढी सांगलीला दवाखान्यात गेली नसतील ना.. तेवढी ह्या लॉकडाउनच्या काळात दवाखान्यात गेली….कुठून कुठून…,कधीच्या अन कुणाच्या फाईली हुडकून काढल्या कुणास ठाऊक?
ह्याच गडबडीत एक तरुण मुलगा येऊन माझ्यासमोर उभा राहिला….साधारण वीस बावीस वर्षाचा असेल…त्याला वाटलं आम्ही सुध्दा पोलिसच आहोत की काय !…म्हणाला “साहेब, बहिणीकडे चाललोय,पलूसला…प्लिज ..जाऊ दे.” जाधव सरांनी विचारलं.. ,”का चाललाय?”..त्यावर त्यानं जे उत्तर दिलं त्यावर आम्ही दोघेही खूप हसलो… म्हणाला, ” ते बहिणीला सांडगं, पापड, कुरुड्या आणि चटणी द्यायला चाललोय, उन्हाळ्याचं.”…मी हसत हसतच त्याला खुळ्यात काढलं,.. म्हटलं “लेका तुला काय कळतंय का?.. इथं काय चाललंय?..दुनिया थांबलीय अक्की..अन तुला कुरुड्याचं पडलंय होय!!”.. तसा त्याचा चेहराच पडला..”नाही साहेब, तसं नाही.. खरं प्लिज मला जाऊ दे”… मी त्याला पोलिसांकडे जायला सांगितलं.” जा..त्यांची घे जा परवानगी”. त्यानं पोलिसालापण हीच विनवणी केली… पोलिसांनी देखील सुरुवातीला त्याला शिव्याच घातल्या.. आणि परत जायला सांगितलं…तसा तो त्यातल्या एका पोलिसाच्या पायाशीच वाकला,..आणि ढसाढसा रडायला लागला….”साहेब प्लिज, मला जाऊदे, … नाहीतर माझ्या बहिणीचं काही खरं नाही… प्लिज मला माझ्या बहिणीसाठी तरी सोडा,….मी येताना परत इथं थांबतो,… त्यावेळी मला काय शिक्षा द्यायची ते द्या.”…. त्याच्या एवढ्या विनवणीवर आम्ही सगळेजण अवाक झालो…. त्या पोलिसाने त्याला जवळ घेऊन विचारलं…,”असं का म्हणतोयस”..त्यावर त्यानं रडतच उत्तर दिलं,…”साहेब ,दरवर्षी बहिणीला इकडूनच सगळं द्यावं लागतं,.नाहीतर सासरची लोकं तिला खूप त्रास देतात ओ….यावर्षी हे उन्हाळ्याचं द्यायला जरा उशीर झालाय तर दाजी तिला रोज फोडून काढा लागल्यात.” …. भयाण वास्तव… तो भाऊ आमच्यासमोर मांडत होता…. एका पोलीस मित्रानं त्याला सांगितलं….”अरे एक तारखेनंतर जा की लेका”.… तो नाही म्हणाला,..” कारण आज जर इथून परत गेलो तर घरात आई बाच्या जीवाला पण घोर लागेल… गेली महिनाभर त्या दोघांना सुध्दा बहीणीची खूप काळजी लागलीय….”
एक निवृत्तीला झुकलेले पोलीस काका होते…. त्यांच्या डोळ्यांत मात्र टचकन पाणी आलं…. बहुधा त्यांनाही एखादी लेक असावी… कारण त्या पोलिसाच्या वेशात भावुक झालेला बाप मला स्पष्ट दिसत होता…. सगळे पोलीस बंधू भगिनी, आम्ही क्षणभर शांत झालो होतो…. एरव्ही निर्ढावलेल्या चेहऱ्याच्या सर्व पोलिसांच्या डोळ्यांत पाणी साचलं होतं.… अन माझ्या साठलं होतं…. त्या पोलीस काकांनी त्याला स्वतःच्या गाडीवर बसवलं.. आणि म्हणाले..”चल, माझ्याबरोबर.. आपण दोघे मिळून तुझ्या बहिणीला हे सगळं देऊन येऊ.”….परत त्याला भीती.. पोलिसाला बघितल्यावर सासरची खवळतील अन परत बहिणीबाबत काही विपरीत घडायला नको…. म्हणून त्याने परत हात जोडून एकट्यालाच जाऊ द्यायची विनवणी केली….त्या पोलीस काकांनी त्याला धीर दिला.. “अरे मी समोर येणार नाही.. तू बाहेरच्या बाहेर दे आणि ये.. मी थांबतो अलीकडच्या चौकात.”..…एवढं ऐकल्यावर त्या मुलाने पोलीस काकांना घट्ट मिठीच मारली अन ओक्साबोक्शी रडू लागला……पोलीस काकांनी त्याला धीर देत गाडीवर पाठीमागे बसवलं.. त्या पिशव्या ,डबा ,,बरणी घेऊन तो पोलिसाच्या गाडीवर बसला आणि गाडी स्टार्ट झाली.. नजरेआड होईपर्यंत मी आणि जाधव सर त्या गाडीकडे पाहत होतो.. अगदी भरल्या डोळ्याने… पोलीस वेशातील एक बाप चालला होता.. ..एका लेकीकडे…..आणि एक भाऊ चालला होता एका बहिणीकडे…..फक्त नी फक्त तिचे अश्रू पुसण्यासाठी……
आज परत माझ्या मनात असंख्य प्रश्न काहूर माजवून गेले…..त्रास देवून गेले… ..तरीही आजूबाजूला अशी परमेश्वराची रूपं पाहायला मिळाली अन मी भानावर आलो….. आज परत मला कळेना कुणाला परमेश्वर म्हणू?….त्या भावाला?….त्या बहिणीला?….की त्या पोलीस काकांना?…..पण तो आहे एवढं मात्र नक्की.. कोणत्या ना कोणत्या रुपात तो तुम्हाला भेटावयास येतो… कदाचित आज देखील …
खरं सांगू… परमेश्वराने आपल्याला ” माणूस ” या पदावर पोस्टिंग केलंय.. पण आपण आपली पोस्ट विसरत चाललोय ….तसं विसरून नाही जमणार…. ती सतत चेक करावी लागेल आपल्याला…आपली माणूस ही पोस्ट… कदाचित ह्यालाच चेकपोस्ट म्हणतात बहुतेक…. . आज खऱ्या अर्थाने मी चेकपोस्टवर ड्युटीला होतो…..
थेट चेकपोस्टवरून…
शब्दांकन… शीतल चव्हाण, जयसिंगपूर
संग्राहक – श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
खूप छान ……