डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ मदतीचा त्रास ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
विशु आमची जवळची मैत्रीण.
स्वभावाने लाख, हुशार आणि मदतीस अगदी तत्पर.
गम्मत अशी, की विशूचा मनुष्य संग्रह अत्यंत मोठा.
कोणतेही काम सांगा, हिच्याकडे,त्यावर माणसे,आणि उत्तर तयार असते.
बरं ,यात तिला मोठेपणाही नको असतो.
पण मदत करण्याची हौस—
हसू येईल सांगितले तर,
पण हिच्या मदतीचा लोकांना त्रास होतो.
कसे म्हणताय?
ऐका तर।
लेकाचे लग्न विशूने हौसेने केले.
सूनबाईना वेगळा फ्लॅट आधीच घेऊन ठेवला होता.
सूनबाई घरी प्रवेश करायच्या आधीच , विशूने, आपल्या हौसेने, घर अगदी मस्त लावून टाकले.
सूनबाईने बघितले, आणि म्हणाली, मला हा नको होता फ्रीज. आणि मला हा रंग नाही आवडत भिंतींना. मला तरी विचारायचे ना आधी.
झाले। एवढा खर्च, कष्ट करूनही दोघीही नाराजच.
तरी विशूची जित्याची खोड जात नाही.
ती इतकी भाबडी आहे ना,की, समोरचा रागावूही शकत नाही.
सहज वीणा म्हणाली, बाई ग परवा केळवण करणार आहे, 10 माणसे यायची हेत. ,काही सुचत नाही बघ, काय मेनू करू,आणि कसे करू.
विशूने तिला न विचारता, तिच्या समोरच एका बाईना फोन केला, आणि मेनूही सांगून मोकळी झाली.
वीणा म्हणाली, अग हे काय,। मी आहे ना इथे,मला विचार की. पैसे मी देणारे ना.
आणि तुला कुणी सांगितलं मला बाई हवीय ? मी बघीन काय करायचे ते–
ते विशूच्या गावीही नव्हते.. हल्ली लोक तिला बोलवेनासे झालेत.
आली की सर्व सूत्रे हाती घेतलीच म्हणून समजा.
भिडस्त लोकांना हे आवडत नाही पण बोलताही येत नाही.
तिलाही फटके कमी नाही बसत,या स्वभावाचे.
कामवालीच्या उनाड मुलाला हिने नोकरी लावून दिली.
4 दिवसात मालकाचा हिलाच फोन। बाई कसला मुलगा दिलात–.गेला की काम सोडून।
विचारले कामवालीला, तर फणकाऱ्याने म्हणाली, “काय व बाई. असली नोकरी देतात व्हय? दुधाच्या पिशव्या टाकायच्या- तर कोण तिसऱ्या तर कोण 5व्या मजल्यावर राहत्यात। पोराचे पाय दुखले, दिली सोडून नोकरी “.
विशू हतबुद्ध झाली, शेजारच्या मुलीचे लग्न जमता जमत नव्हते.
विशूच्या ओळखीचा एक मुलगा होता. हिने लगेच, त्या मुलीला, त्याचे स्थळ सुचवले.
दोघे, भेटले, बोलले.
ती मुलगी विशूला म्हणाली, “काकू, कसला मुलगा, सुचवलात हो. सगळे एकत्रच राहतात. केवढी माणसे, घरात. आणि त्याला पगारही माझ्यापेक्षा कमी. नका बाई असले मुलगे सुचवू.”
बिचारी विशू.
तरीही, विशूची जित्याची खोड जाईना.–तिची मदतीची हौस भागेना,.–आणि मूळ स्वभाव बदलेना..
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈