श्रीमती सुधा भोगले
मनमंजुषेतून
☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 3 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
(१९५६-१९७० च्या या आठवणी)
घरात परतत असू………. च्या पुढे?
आजीने केलेले ताजे लोणचे आमटी भात तोंडल्याची भाजी खाताना जेवणाची मजा येत असे. तसे पूर्वी भाकरी पोळी कमीच दोन्ही वेळा भातच असे. भाकरी संध्याकाळी तांदळाच्या गरम गरम आजी पंगत बसली की करत असे त्या भाकरी सोबत नारळाची लसुण व लाल तिखट, किंचीत आंबट घातलेली चिंच मीठ साखर आणि पाट्यावर वाटलेली चटणी लज्जतदार लागे.
असे करत रात्रीची जेवणे झाल्यावर, अंथरुणं पडतं फार उन्हाळा व उकाडा वाढला की मागच्या दारी घातलेल्या तात्पुरत्या मांडवात बिछाने घालत वार्यावर झोप लगेच येई काही वेळा गप्पा रंगत. मोठा मामा भुताच्या गोष्टी सांगत असे. त्यामुळे सुरुवातीला उत्कंठा वाटे पण नंतर बोबडी वळे. गिर्हा, जखीण, मुंजा, अशी काहीतरी नाव असत रात्रीच्या वेळी ते अधिकच भयप्रद होई. मग अंगाचे मुटकुळे करून डोक्यावर पांघरूण घेऊन डोळे गच्च मिटले जात. सकाळ कधी होई ते कळत नसे.
सकाळी उठून प्रात:र्विधी आवरण्याची घाई असे. तोंड धुण्यापासून सर्व मागच्या हौदावर जाऊनच करावे लागे. हल्ली सारखी घरातल्या घरात बेसिन नळाला पाणी अशी सोय नव्हती. शौचालाही खूप लांब घरापासून पाचशे फूट अंतरावर जावे लागे. पत्र्याची चौकोनी बांधलेली बंदिस्त खोली मागे चर पाडलेला असे. लहान मुलांसाठी लांब लाकडे टाकून केलेली तळात चर असलेली व्यवस्था म्हणजे त्याला ठाकुली म्हणत.
हौदात पाणी येण्याकरता विहिरीवर रहाट असत. मोठे लाकडी चक्र त्यावर सुंभा च्या दोरीने आडवे बांधलेले पत्र्याचे डबे किंवा मातीचे पोहरे म्हणजे मडके असे. त्या चक्राचा लांब दांडा विहिरीच्या बाहेरच्या बाजूला असे त्याला ही लाकडी चक्र जोडलेले असे आणि वरून खाली उभा खांब जमिनीत उभा केलेला असे. त्या खांबाला दुसरा एक आडवा बांबू जोडून ते जोखड बैलाच्या पाठीला बांधत बैलाच्या डोळ्यावर झापड बांधलेले असे मग त्याला जुंपले की तो गोल गोल फिरत राही.म्हणजे चाकांना गती मिळून रहाट फिरू लागे तसतशी एक एक पोहरा विहिरीत सर सोडलेल्या माळे वरून पाण्यात बुडे व भरून निघून रहाटावरून उलट होत वरच्या बाजूला जोडलेल्या पत्र्याच्या पन्हाळात उलटा होऊन पाणी पडे ते पुढे सिमेंट बांधलेल्या दांड्या तून थेट वेगाने हौदाकडे वाहू लागे मग टाकी भरून घेतली जाई
त्याच पाण्याने खाली गुरांना पाणी प्यायची टाकी असे तीही भरे मग या दोन्ही टाक्यांची तोंडे गच्च कपड्याच्या बुचाने रोखली जात आणि पाणी नारळ पोफळीची जी बाजू त्यादिवशी पाणी सोडायची असेल तिथे सोडले जाई. याला शिपणं करणे असे म्हणत. हे रोजचं काम आणि प्रत्येक घरातून सकाळच्या वेळी चालू असे.रहाटाचा कुईsss कुईsss आवाज येणे ठरलेलेच असे.
वेगवेगळ्या ऋतूत तेथे वेगवेगळी मजा असे उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे फणस जाम कोकम, पोह्याचे पापड याची मज्जा असे कोकम फळे आणून फोडून टाकून बियांचा गर एका पातेल्यात जमा होई. वरची टरफले साखर भरून बरणीत ठेवली जात मिठ ही घातले जाई मग त्याला भरपूर रस सूटे. रस ओतून घेऊन त्यात प्रमाणात पाणी साखर मीठ घातले, थोडी जिरेपूड की झालं कोकम सरबत तयार हे ताज्या फळाचे सरबत अप्रतिम चवीचे लागे उन्हाळ्यात तखलीकीने कोरडा पडलेला घसा शांत होई
जाम हे किंचित पांढरे हिरवी झाक असलेले भरपूर पाण्याचा अंश असलेले फळ प्यास लागलेली शमन करत असे. एखादा दिवस पापड करण्याचे ठरे. लाकडी उखळीत पोह्याचे पीठ तिखट मीठ हिंग पापड खार पाणी हे प्रमाणात घालून मुसळाने कुटले की पापडाचा गोळा तयार होई, काही वेळेला कांडपिणी असत त्या कुटून देत मग मावशी, आई, आजी व मी मोठे मोठे पोळपाट घेऊन सरासरा पापड लाटत असू. मावशीचा लाटण्यावर खूपच हात चाले मग कोण जास्त पापड लाटतो अशी शर्यत ही लागे. असे पापड उन्हात घालून वाळल्यावर खाण्यातली मजा काही औरच असे. ताकातले हि पापड आजी चविष्ट करीत असे. तसे पापड आता मूळ चवीचे खायला मिळत नाहीत. हल्ली त्याला (authentic) म्हणतात.
—–क्रमश:
© श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
खुप सुंदर आठवणी