श्रीमती सुधा भोगले
मनमंजुषेतून
☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 6 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
(१९५६-१९७० च्या या आठवणी)
बर्फीत पडले असावे?
आजोबांनी जे काही रागे भरले, त्याने भिवून मी दुकानाच्या पडवीतल्या दारातून शेजारच्या जिन्यावरून वरती माळ्यावर धूम ठोकली. खरं तर, वर माळ्यावर काळोख होता. एरवी मी वर जायला घाबरायचे. कारण तेथे वाळलेले भोपळे ठेवत, त्याची लहानपणी भिती वाटे का कोणास ठाऊक? बर्फी तयार झाली पण रॉकेल चा वास लपत नव्हता. म्हणजे आता विक्री होणार नाही थोडक्यासाठी नुकसानं झाले. मी त्यात नकळत दोषी ठरले अर्थात माझाही दोष नव्हताच. तो एक अपघाताच होता. पुढे जत्रेतल्या दुकानात ती बर्फी विकायला ठेवली की नाही ते माझ्या बालमनाला कळले नाही.
तेव्हा, दत्तजयंतीला दोन ठिकाणी जत्रा असत. एक थळ फाट्यावरून, आत येताना असलेल्या टेकडीवरच्या दत्तमंदिरात, तर दुसरी चौल च्या डोंगरावरच्या दत्त मंदिरात असे. दोह्नी ठिकाणी दुकाने थाटली जात. मग मुंबईला नोकरी करणारे मामा रजा टाकून, मदतीला येत असत. बरेच सामान डोंगरावर न्यावे लागे. मोरुकाका सुंकलेंची (आजोबा) मिठाई प्रसिद्ध होती. पाकवलेले काजू हीतर खास हातखंडा असलेली पाककृती. लोक आवडीने घेत.
मुल्लुंडला आमचेकडे आजी कमी पाकवलेले काजू, बर्फी असा प्रसाद दरवर्षी मामाबरोबर पाठवी मी फुलवेडी असल्याने माझ्यासाठी चाफ्याची, बकुळीची, गुलाब, अशी फुले केळीच्या पानात बांधून येत. मध्यंतरी चारवर्षा पूर्वी आम्ही दोघं भावंड दत्त जयंतीला तिकडे गेलो होतो आता चौलच्या दत्ताला वरपर्यंत मोटार रस्ता झाला आहे. पायऱ्या चढून जावे लागत नाही माझे बंधू खाली दुकानात पाकवलेले काजू मिळतील असे वाटून बघायला गेले तेव्हा तेथल्या दुकानदारांकडून कळले की ही खासियत फक्त सुंकल्यांच्या दुकानातच मिळत असे. आता पुढची पिढी, नोकर्या करायला लागली त्यांना यात रस वाटेना मग एकेकाळचे प्रसिद्ध दुकान बंदच झाले, अशीच जत्रा आवासला नागोबाच्या देवळात असे. तेथे हि मिठाईचे दुकान असे. महाशिवरात्रीला कनकेश्वर च्या डोंगरावर शिव मंदिर आहे तेथे जत्रा भरे येथेही पायऱ्या चढून वर जावे लागते. सर्व सामान वाहून वर न्यायला लागते अशी हि शेतीला पूरक उद्योगाची जोडणी असे.
हळूहळू संक्रांतीचे सण जवळ येई, शेतात पेरलेल्या वालांना कोवळ्या कोवळ्या शेंगा लागत. मग एके दिवशी ‘पोपटी’ करायचा बेत ठरे ‘पोपटी’ म्हणजे वालाच्या अखंड शेंगा, कांदे, बटाटे, वांगी, सगळे तिखट मीठ मसाला घालून माठात भरायचे आणि तो माठ उलटे तोंड करून निखार्यावर भाताचा पेंढा पेटवून जमिनीत पुरायचा, म्हणजे आतले जिन्नस वाफ धरून शिजत असत. गरमागरम खाण्यात अनोखी लज्जत येई. पण आम्हाला शहरात पाठवताना पोहचेपर्यंत थंडच मिळे. हा प्रकार गुजरात मध्ये ‘उंदियो’ म्हणजे उलट, उपडे असा अर्थ, त्याच प्रकारातला शेतातला नव्या सोन्याचा नमुना!
वायशेत या गावाला आजोबांची शेतजमीन होती तेथे शेतं लावले जायचे पुढे थळ-वायशेत खत प्रकल्पात ती जमीन सरकारने घेतली. घरटी कंपनीत नोकरी मिळण्याकरिता जेवढी तरुण पिढी होती त्यांना प्रकल्प तयार झाल्यावर नोकरीच्या हमीचे ओळखपत्र दिले होते. मग पुढच्या काही तरुणांनी कंपनीत नोकरी मिळवली, ते थळवासी झाले.
पूर्वी आम्ही ओढीने जमेल तेव्हा मामाकडे जात असू, आता आमचा लळा असलेले मामा, मामी नाहीत, आजी-आजोबा काळानुरूप कैलासवासी झाले, पुढची मामे भावांची पिढी आता घरचा व्याप नोकर्या करून सांभाळते गायी गुरे ही सांभाळणे आता होत नाही. विहीरीवर मोटार बसली, रहाटाची कुईsss कुईssss संपली, स्थल काळाच्या दुरत्वाने पुढच्या पिढीशी, आमच्यापेक्षा लहान असलेल्यांशी लळा जिव्हाळ्याचे नातं, नात्या पुरतचं उरलं. तरीही अजून वाटतं “मामाच्या गावाला जाऊ या, आंबे-फणस खाऊ या, सुट्टीची मजा चाखू या!”
—–समाप्त
© श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈