: निरोप समारंभ ☆ सौ.अमृता देशपांडे

ऑफिस मधला एक सहकारी रामानंद आज सेवानिवृत्त झाला. त्या निमित्ताने एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. कोणी ही  सेवानिवृत्त होतानाचा हा दिवस खूपच वेगळा असतो.  सकाळी 9 ते संध्याकाळी 6, दिवस भर एकत्र काम करणे, खाणे- जेवणे, एकमेकांवर रागावणे, रुसणे, एकमेकांची काळजी घेणे, आपलं काम

जितकंं चांगले करता येईल तितका प्रयत्न करणे.  या सर्वात इतकी वर्षे कशी गेली कळतच नाही. सेवानिवृत्त होणारी व्यक्ती उद्यापासून आपल्यात नसणार ही हुरहुर सर्वांना अस्वस्थ करते. निवृत्त होणार्या व्यक्तीच्या  मनात तर भावनांचे काहूर माजलेले असते. काळीज गलबलून गेलेले असते.  मनातलं  वादळ, गलबलणं, चेहर्यावर दिसत असतं. खूप ह्रदयस्पर्शी असतो तो दिवस.

रामानंदच्या निरोप समारंभाचा प्रसंग.  आज प्रास्ताविकापासून सगळं  वातावरण घरगुती स्वरूपाचं होतं. प्रेमळ आणि साधेपणाचं होतं.  आपण घरी जसे एकत्र जमून छोटंसं स्नेहपूर्ण संमेलन करतो, अगदी तसं…..कुठेच औपचारिकता नाही, कुणाचा ईगो नाही, सर्वच जण आपापली post ची शाल आपल्या जागेवर ठेऊन मनमोकळ्या स्वच्छ मनाने एकत्र जमले होते. मनाच्या कोपर्यात चलबिचल होती, रामानंद उद्या पासून ऑफिस मध्ये असणार नाही याची.

रामानंद मॅनेजिंग डायरेक्टर श्री भट सर यांच्या ऑफिस मध्ये attendant म्हणून काम करत होता. पर्सोनल खात्याच्या श्री बाल्लीकर सरांनी त्याच्या कामाची मोजक्या पण अर्थपूर्ण, यथोचित आणि नेमक्या शब्दात प्रशंसा केली.  ते काही वरवरचे शब्द नव्हते.  त्यातलं खरेपण आम्ही सर्वांनी अनुभवलेलं होतं. त्याचं पटपट चालणं, चटचट काम करणं, भराभर फाईल्स पोहोचवणं. कधीच  कामचुकारपणा नाही, वेळकाढूपणा नाही कि कंटाळा नाही.  चालण्या बोलण्यात, काम करण्यात ex- serviceman ची शिस्त आणि तत्परता होती. नेहमीच स्वच्छ, व्यवस्थित  inshirt केलेला पेहराव.  गबाळेपणाला थारा नाही. ना वागण्यात, ना बोलण्यात, ना कामात. आजही त्यानं घातलेला गुलाबी शर्ट त्याला छान शोभत होता. त्याच्याच सहकारी मित्रांनी त्याला आज प्रेमानं भेट दिला होता.

स्टेजवर होते फक्त दोघं. भटसर आणि रोज सकाळी आल्यावर चहा देणारा रामानंद. मला भट सरांचही कौतुक वाटलं आणि मनातला आदर दुणावला.

रामानंदला तुला काही बोलायचं आहे का असं विचारण्यात आले.  खूपदा निवृत्त होणारा नाही बोलत. मन असंख्य आठवणीनी आणि भावनांनी व्याकुळ झालेलं असतं. डोळ्यांच्या काठांवर थोपवलेलं पाणी कोणत्याही क्षणी  कोसळेल असं वाटत असतं. पण रामानंदनं सुखद धक्काच दिला. तो बोलायला उभा राहिला.  …….” MD साहेबा, सब बडे साहेबा, और मित्रों…. हे शब्द मनाला स्पर्शून गेले. पहिल्यांदाच त्याचं इतकं सलग बोलणं ऐकलं. एरव्ही कामाशिवाय तो जास्त बोलत नसे. त्याच्या शब्दातून, भावना व्यक्त करण्याच्या शैलीवर भारतीय सैन्य दलातील हिंदीचा प्रभाव थक्क करणारा होता. अतिशय सहज, सोप्या भाषेत त्याने मनातले भाव व्यक्त केले. मनाच्या गाभार्यातून आलेल्या ह्रदयस्पर्शी भावना साध्या शब्दातूनही किती सुंदर परिणाम साधतात, हे सर्वांनी कडकडून वाजवलेल्या टाळ्यांनी सिद्ध केले.

सैन्य दलातून निवृत्ती घेऊन तो 18 वर्षांपूर्वी EDC त आला. आज तो याही सेवेतून मुक्त झाला.  मुलं अजून शिकत होती.  आर्थिक परिस्थिती पण जेमतेमच.  पण कुठेच त्रासिक पणा नाही, रड नाही, ” आणि दोन वर्षे वाढवून द्या, एक तरी  द्या……” अशी भीक नाही मागितली. शांत, समाधानी, नम्र स्वभाव. उद्यापासून काय करायचं ते आधीच ठेवलेलं. वयाची साठी आली तरी आरोग्य ठणठणीत कसं ठेवायचं ते त्याच्याकडून शिकावं.

Healthy mind stays in healthy body. समाधानी वृत्तीच चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते. कामचुकारपणा? लबाडी, अति हव्यास, हेवेदावे, मत्सर, खरेपणाचा अभाव अशा वृत्तींमुळे आपण सुखाला मुकतो आणि आनंदाला पारखे होतो.

रामानंदची समाधानी वृत्ती, सतत  कार्यरत रहाण्याची धडपड, आणि साधेपणा खूपकाही शिकवून गेला. आभार मानताना त्यानं हिंदीतून व्यक्त केलेलं अस्खलित आणि ओघवतं मनोगत खूपच भावलं.

इतकी वर्षे आपल्या बरोबर असणार्या सहकारी मित्राची नवी ओळख सर्वांचंच मन हेलावून गेली. वयाच्या 18 व्या वर्षी भारतीय सैन्य दलात सामील होऊन 40 व्या वर्षापर्यंत तेथील कडक शिस्तीचे, कठोर परिश्रमांची नोकरी संपवून घरी आला. Ex serviceman म्हणून आमच्या ऑफिस मध्ये आला.  आता 58 व्या वर्षी निवृत्त झाला. आता तो त्यांच्या घराण्याचा पारंपारिक व्यवसाय आनंदाने करतो. मासे गरवण्याचा. म्हणजे गळ टाकून मासे पकडणे.

आधी देशसेवा, नंतर राज्यसेवा, आता पारंपरिक व्यवसाय.  सर्वार्थाने आयुष्यातली परिपूर्ती हीच आहे ना!

 

© सौ.अमृता देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

प्रसंग नेहमीचा,पण अनुभव खूप वेगळा.
खूप छान.