मनमंजुषेतून
☆ पूर्वजांचे अस्वस्थ आत्मे..…! ☆ संग्रहिका : सौ. स्मिता पंडित ☆
घरी आल्यावर हातपाय धुतलेस का? चल उठ आधी, तशीच बसलियेस घाणेरडी! अग जेवायला बसायचं ना, हात धुतलेस का स्वच्छ? संध्याकाळ झाली, आधी तोंड धू आणि नीट केस विंचरून वेणी घाल. तोंड पुसायचा टॉवेल हात पुसायला घेऊ नको ग, गलिच्छ कुठली! बाथरूम मधून बाहेर येताना पाय कोरडे कर, ओले पाय घेऊन फिरू नको घरभर! केस स्वयंपाकघरात नको ग विंचरू, अन्नात जातील, शिळ्या भाताचा चमचा ताज्या भाताला वापरू नकोस, खराब होईल तो, दुधाची पातेली एकदम वरच्या खणात ग फ्रीजमध्ये, खालती नको ठेऊ! वाट्टेल त्या भांड्यात दुध नाही तापवायच ग. तुझ्या भांड्याने पाणी पी, माझं घेऊ नकोस, अग केस पुसायच्या पंचाने अंग नको पुसू, बेक्कार नुसती!!! खोकताना तोंडावर रुमाल घे, कितीवेळा सांगायचं, आणि तो रुमाल स्वतः धू, बाकीच्या कपड्यात टाकू नको धुवायला, दुसऱ्याशी बोलताना चांगलं हातभार अंतर ठेवून उभी रहा, थुंकी उडते कधीकधी ?. कशाला जाता येता मिठ्या मारायच्या एकमेकांना, घाम असतो, धूळ असते अंगाला ती लागेल ना! काहीतरी फ्याड एकेक, काय ते प्रेम लांबून करा!!! चप्पल घालून घरात आलीस तर याद राख, काढ आधी ती दारात. खजूर खल्लास, बी टाकून दे लगेच, तशीच ठेवायची नाही,तोंडातली आहे ना ती? नीट जेव, शीत तळहाताला कस लागतं ग तुझं? कसं जेवत्येस! ताट स्वच्छ कर, आणि पाणी घालून ठेव, करवडेल नाहीतर! तोंडात घास असताना बोलू नकोस, इतकं काय महत्वाचं सांगायचंय ??
——–तात्पर्य काय? तुम्हाला जर असं वाढवलं गेलं असेल, तर कोरोना ची अजिबात चिंता करू नका, कारण आज सगळं मेडिकल सायन्स जे सांगतंय, ते आपल्या पितरांनी आपल्याला लहानपणीच शिकवलंय. तेव्हा जाच वाटला खरा, पण आज ह्याच सवयी आपलं कोरोना पासून रक्षण करतील. तेव्हा काळजी करू नका, जसे वागत आलायत तसेच वागत रहा .
——–एक शंका, आपल्या पूर्वजांचे अस्वस्थ आत्मे तर कोरोनाच्या रूपाने परत आले नाहीत जगाला स्वच्छता शिकवायला??? नाही म्हणजे, इंग्लंड चा राजा पण शेकहँड करायच्या ऐवजी नमस्कार करतोय म्हणे ??
संग्रहिका : सौ. स्मिता पंडित
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈