सुश्री नीलाम्बरी शिर्के
मनमंजुषेतून
☆ प्राजक्त… ☆ सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆
माझ्या अंगणात आपसूक आले होते एक प्राजक्ताचे झाड. पहिल्यांदा मला त्याच्या पानाचा खरखरीतपणाच लक्षात आला. नंतर तो बोचूही लागला. पण त्याचे औषधी गुण जाणल्याने मी ते सहन करू लागले. हळुहळु त्याला नाजुक फुलेही आली. वासही मंदमंद असा— मनाला चित्ताला प्रसन्नता देणारा. मी फुलांच्या सौंदर्य व सुगंधात गुंतले. नंतर लक्ष गेल तर झाडाची भली मोठी फांदी कुंपणापलीकडे वाढत जाऊन बहरलेली. रोज तिकडे फुलांचा सडा नजरेला दिसायचा. गंधाचे झोत वारा इकडे तिकडे उधळायचा. माझी फुले माझी, पण पलिकडची पखरणही माझ्याच मालकीहक्काची होती ना ? पण तक्रार केली तर “ तुला कमी पडताहेत का फुलं ?मग गप्प बस की “ असं उत्तर मिळालं .या उत्तरातून मला शापच मिळाला जणू– माझ्याकडची फुलं मला प्रसन्न करायला असफल होऊ लागली.—-आणि पलिकडची फुल अस्वस्थता देऊ लागली. पलीकडे जाणारी फांदी तोडण्याचा अयशस्वी प्रयोगही केला ,कारण ते माझ्या ताकदीबाहेरचं काम हे माझ्या लक्षात आलं, अन खरखरीत पानं जास्तच खरखरीत वाटू लागली.
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈