☆ मनमंजुषेतून : फुलपाखरू… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
फुलपाखराचं वेलींवर, फुलांवर बागडणं पाहणं हे नयन सुखकारक आहेच; पण त्याहीपेक्षा त्यांच्या पंखांवरची रंगांची पखरण न्याहाळण्यात मी जास्त रमून जाते.
लहानपणी फुलपाखरांच्या मागे धावून त्यांना पकडण्याचा माझा छंद आता मला खूप खटकतो. कदाचित इतरांचे अनुकरण करण्याचा शिरस्ता मी मोडत नसेन इतकेच!
खूप छोटी छोटी झुंडीनं येणारी आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तोच दूर निघून जाणाऱ्या फुलपाखरांचं मला आकर्षण कधी नव्हतच. तेच जर एखादे मोठे फुलपाखरू फुलावर स्थिरावलं की मी हळूच बोटाच्या चिमटीत पकडत असेआणि बोटाच्या तळव्यावर उमटलेलं मीनाकाम तासन तास बघत बसे. फुलपाखरू केव्हाच स्वच्छंदी होऊन जायचं!!
काल सकाळी नेहमीप्रमाणे गणपती साठी जास्वंदीची फुले आणावीत म्हणून गच्चीवर गेले आणि माझं लक्ष वेधलं ते एका सुरेख अशा फुलपाखराने!! बऱ्याच दिवसानंतर फुलपाखरू दिसले आणि मी मोहरले.
जांभळा, पारवा,निळा, आकाशी,गडद निळा अशा निळ्या रंगांच्या विविध छटा आणि त्यात कोरलेली सुरेख नक्षी, तीही एक सारखी, दोन्ही पंखांवर मोजून मापून काढल्यासारखी जणू फ्रीहँड ड्रॉईंग! कमाल वाटली त्या विधात्याची!!
पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात ना इतकी निरव शांतता ठेवून मी पायरीवर स्थिरावले आणि फुलपाखराला न्याहाळू लागले मधु घटातील मध चोखता चोखता परागीभवनाचे काम नकळत सुरू होतं. जसं काही स्वार्था बरोबर परमार्थ!!!
उशीर झाला तसा मला खालून घरातून बोलावणे यायला सुरुवात झाली. मांजरीच्या पावलाने खाली उतरून “मी योगा करते आहे. मी ध्यान लावून बसले आहे. मला दहा मिनिटे त्रास देऊ नका.”अशी सर्वांना तंबी देऊन पुन्हा गच्चीवर आले.फुलपाखरू गोड हसत होतं…..
फुलपाखराला टेलीपथी झाली की काय? दहा मिनिटांनी ते उडून गेलं. ते पुन्हा येईल या आशेने तिथेच घुटमळले. पण व्यर्थ….
सकाळच्या कामाची लगबग सुरू होती.जास्वंद देवाला अर्पून मी स्वयंपाकाला लागले.अहो आश्चर्यम्! तेच फुलपाखरू माझ्या स्वयंपाक घरातील मनी प्लॅन्ट वर बसलेलं मला दिसलं.लगबगीने मी आरुषला म्हणजे माझ्या नातवाला बोलावून दाखवले. तोही बराच वेळ फुलपाखरू पाहण्यात रमला. नंतर ते सवयीप्रमाणे उडून गेले. पुन्हा दिसले म्हणून मीही भरून पावले.
दिवसभर त्याच्या निळ्या जांभळ्या पारव्या रंगाचा विचार घोळत होता. डोळ्यांनी तर ते रंग साठवूनच घेतले होते. मिक्सिंगच्या टाक्याने अगदी डिट्टो फुलपाखरू विणायचा संकल्पही झाला मनोमन!..
संध्याकाळच्या चहासाठी स्वयंपाक घरात आले आणि एकदम दचकले! फुलपाखरू माझ्या हातावरच बसलेलं दिसलं मला. त्याचा अलवार स्पर्श जाणवला ही नाही. आरुष माझ्या पाशी उभा होता.त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती अशा संमिश्र भावना होत्या.
जरासा हात हलला आणि ते उडून गच्चीच्या कठड्यावर जाऊन बसलं. डोळ्याची पापणीही न लवू देता आरुष एकटक त्याकडे बघत होता. माझ्यासारखाच तोही भावूक रात्री झोपेपर्यंत त्याच्या आणि माझ्यात फुलपाखरू सोडून कोणताही विषय नव्हता. आपल्या रंग पेटीतले सगळे निळे जांभळे रंग काढून तो फुलपाखरू आठवत होता.
माझ्यासारखाच फुलपाखरू चितारण्याचा संकल्प त्याने मनोमन केला असावा.
रात्री झोपतानाही आजी फुलपाखराची गोष्ट सांग असा हट्ट त्याने धरला.
“बाळा, मी तुला फुलपाखराचं छान गाणं म्हणून दाखवू का?”असे म्हणून मी ‘छान किती दिसते फुलपाखरू’ म्हणायला सुरुवात केली. ऐकता ऐकताच माझ्या पाखराच्या पापण्या मिटल्या……
सकाळी उठल्यावर मी गॅलरीचे दार उघडलं आणि खाली पडलेलं फुलपाखरू मला दिसलं. जवळचच कुणीतरी गेल्याच दुःख मला झालं. मी पटकन कुणी उठायच्या आत त्याची विल्हेवाट लावायचं पुण्यकर्म करून टाकलं.
मी विचार करू लागले की एरवी माणसांना घाबरणारा हा जीव आज माझ्या हातावर कसा काय येऊन बसला? मरणासन्न झालेलं ते माझ्या आश्रयाला आलं होतं. माझी मदत मागत होतं. मरण जवळ आलं आणि ते अगतिक झालं होतं. माझ्यावर इतका कसा त्याचा विश्वास? माझं मन त्याला उमगलं असेल का? माझ्या भावना त्याच्या पर्यंत पोहोचल्या असतील का? म्हणून तर त्याने इतक्या विश्वासाने माझ्या हाताचे चुंबन घेतलं असेल का? एक ना दोन हजार प्रश्नांचे काहूर माजले माझ्या मनात!
आरुष उठला, “आजी आज पण ते फुलपाखरू येईल ना ग?”
“हो,येईल ना! तू सगळं दूध पटापट पिऊन होमवर्क कम्प्लीट केलस तर येईल नक्की!!”
निरागस हा ही आणि निरागस ते ही…..
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
Mob.No. 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
निरागसतेचे अनोखे दर्शन.