श्री विजय गावडे
मनमंजुषेतून
☆ बाबासाहेब पुरंदरे….. एक आठवण ☆ श्री विजय गावडे ☆
ज्यांचे पूर्ण जीवन शिवशाहीमय झालंय त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेना मानाचा मुजरा.
साधारण विसेक वर्षांपूर्वीचा काळ. असेच पावसाळ्याचे दिवस होते. धो धो सरी कोसळत होत्या. पाय मात्र दादरच्या राजा शिवाजी विद्यालयच्या दिशेने चालत होते. आज शिवशाहीरांच व्याख्यान होणार होतं. विषय होता ‘महाराजांची Time Management ‘ प्रमुख पाहुणे होते रिझर्व बँकेचे त्या वेळचे संचालक डॉ. नरेंद्र जाधव.
राजा शिवाजी विद्यालय सभागृह तुडुंब भरलेलं. ओल्या अंगानिशी लोक मिळेल तिथे स्तब्ध. ज्यांना जागा मिळाली नव्हती ते उभे होते. सभागृहात प्रवेश न मिळालेले कमी भाग्यवान क्लोज्ड सर्किट टीव्ही वर समाधानी होते.
महाराजांच्या Time Management वर बोलणारे बाबासाहेब स्वतःही दिलेल्या वेळेच्या अगोदर हजर होते. मात्र पावसामुळे झालेल्या वाहन कोंडीत अडकलेले डॉ. नरेंद्र जाधव मात्र थोडे उशिरा पोहोचले. आपणांस झालेल्या उशिराबद्धल त्यांनी शिवशाहीरांशी दिलगिरी व्यक्त केलेली दिसली.
पावसाच्या पाण्याने तुडुंब झालेल्या जलाशयाप्रमाणेच ओसंडून वाहणाऱ्या सभागृहामध्ये शांतता पसरली आणि शिवशाहीरांची ओघवती वाणी बरसु लागली.
“ वेडात मराठे वीर दौडले सात “ या गीतात वर्णिलेली प्रतापराव गुजर आणि मंडळीची ती अंगावर शहारे आणणारी गोष्ट कथन करतांना शिवशाहीर तल्लीन झालेले आणि एक एक पदर तारखानीशी उलगडून दाखवताना त्यांच्या वाणीला चढत जाणारी धार श्रोत्यांना शिवकाळात घेउन जाणारी.
बाबासाहेबांच्या वाणीतून तो प्रसंग तर जीवन्त झालाच परंतु वेळेच्या काटेकोर अंमल बजावणीविना प्रतापराव आणि मंडळींना महाराजांच्या खपामर्जीला कसे बळी पडावे लागले हे शिवशाहीरांच्या तोंडून ऐकण्याचे भाग्य आम्हाला त्या दिवशी लाभले.
सम्पूर्ण आयुष्य शिवशाही आणि छत्रीय कुलवतन्स छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोवतीच ज्यांनी खर्ची घातलं त्या या महाराष्ट्र भूषण ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाला शम्भराव्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
© श्री विजय गावडे
कांदिवली, मुंबई
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈