सौ.सुचित्रा पवार
मनमंजुषेतून
☆ आदरणीय टिळक, आज तुम्ही हवे होतात … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
महनीय,लोकमान्यजी टिळक
साष्टांग अभिवादन
खरे तर आम्ही तुम्हाला पत्र लिहावे इतके आम्ही मोठे नाही,तुमच्याशी कोणती चर्चा करावी इतकेही समपातळीचे नाही तरीही ‘थोरांची ओळख ‘या इतिहासाच्या पुस्तकापासून आपली ओळख अन विचारांनी आम्ही प्रेरित झालो,तुमच्या जयंती पुण्यतिथीला त्याच पाठातून तुम्ही उच्चारलेली,”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !” या ब्रिटिश सरकारला दिलेल्या बाणेदार उत्तराने आमचे रोम रोम स्फुल्लींगले,” मी शेंगा खाल्ल्या नाहीत,टरफले उचलणार नाही अन कोणाचे नावही घेणार नाही ” हा परखडपणा नकळत आमच्याही अंगी आला ;आणि कित्येक भाषणाना वाहवा मिळवली ! आपण सुरु केलेली ‘मराठा,केसरी ‘ वर्तमान पत्रातून हिंदी जनतेत ब्रिटिशांविरुद्ध वाढवलेला असंतोष,तुरुंगातही गप्प न बसता लिहिलेला ‘गीतारहस्य ‘ हे सगळं तुमच्या अंगी कुणी बाणवले? आणि आजच्या पिढीत ते का नाही? हा प्रश्न वारंवार सतावतो.
देशास समर्पित सर्वच हुतात्मे, महान व्यक्तिमत्त्वे आणि देशभक्तांकडे पाहिले की वाटते,ही जाज्वल्यता ,प्रखर तेज आमच्याकडे का नाही? या प्रश्नाचे उत्तर खोलवर विचार केल्यावर सापडले.आम्ही खूप खुजे अन स्वार्थी आहोत,त्याग,संयम अन साधना या गोष्टी आमच्या आसपासही नाहीत.भारत माझा देश आहे…ही प्रतिज्ञा नुसतीच म्हणतो खरेच माझे माझ्या देशावर प्रेम आहे? आहे तर मग ही बेसुमार वृक्षतोड,वाळू उपसा,नद्या तलावावरील अतिक्रमणे,भ्रष्टाचार,लाच,हिंसाचार कुठून आले? काय स्वतंत्र देशाचे स्वप्न तुम्ही असे पाहिले होते? आणि आज तुम्ही असतात तर हे सहन केले असते? की कडक शासन करून फासावर लटकावले असते? तुमच्या जहाल विचारांची आज देशाला गरज आहे आणि म्हणून तुम्ही हवे होतात. आजची सरकारे तुम्ही कधीच उधळून लावली असतात आणि ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असं सारखंच खडसावले असते !
जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी तुम्ही गणेशोत्सव सार्वजनिक केला पण आज त्याचे रूप हिडीस,विकृत,ओंगळ झालेय. देवाचा मालकी हक्क अन कोपऱ्या कोपऱ्यात स्वतंत्र गणेश मंडळे,देणग्या,राजकारण अन टोकाच्या अस्मितेने,अहं भावनेने ही एकी कधीच बेचिराख झालीय !
आम्हाला थोरामोठ्यांनी केलेल्या बलीदानाविषयी,त्यागाविषयी कृतद्न्यता नाही,प्रेम आदर तर नाहीच नाही कारण आजचे शिक्षण फक्त पैसे कसे मिळवायचे अन ऐश आरामात कसे रहायचे? याचे शिक्षण तासून,घासून देते असे गुळगुळीत गोटे मग पुढच्या पिढीला अजून गुळगुळीत बनवून घरंगळत जायला भाग पाडतात,माणूस म्हणून कसे जगायचे? देशप्रेम,राष्ट्रवाद या गोष्टी त्यांच्यासाठी मूर्खपणा आहे,यातून काय मिळणार? हाच वयवहार ते शिकत आलेत.
केवळ जयंती,पुण्यतिथी करून का कुणी मोठे झालेय? त्यासाठी आदर्श तत्वे अंगी बाणवायला हवीत अन आचरणातही आणायला हवीत पण खरे दुःख तर इथेच आहे आजच्या पिढीपुढे आदर्शच नाहीत ! मनोरंजनाचे आकडे करोडो च्या घरात असतात अन उपाशी माणसाच्या भुकेला भाकरीचा गोल सापडत नाही,ही प्रचंड लोकसंख्या का वाढली? याचे उत्तर आहे,प्रत्येकाला देशापेक्षा स्वहित अन स्वार्थ महत्त्वाचा वाटतो.
तंत्रज्ञानाने देश जवळ आले, पाश्चात्त्य देशातील नको ते आम्ही स्वीकारले पण त्यांच्या देशप्रेम,स्वच्छता,शिस्त याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
देशातील स्वातंत्र्याचा असा स्वैराचार तुम्हाला खपला असता? नाही ना? तुम्ही हाकलून लावले असते अशा कृतघ्ननाना !
म्हणूनच तुम्ही हवे आहात पुन्हा एकदा देश प्रेमाचा धडा शिकवायला अन सार्वजनिक गणेशोत्सव बंद करायला,देशास वळण लावायला अन मूळ सुजलाम,सुफलाम रूप द्यायला !
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈