सौ कुंदा कुलकर्णी
अल्प परिचय
निवेदिका, लेखिका, कवयित्री, समाजसेविका, व्याख्याती.
विविध दैनिके मासिके यातून लेखन. ” नैमिषारण्य सुरम्य कथा पुस्तक लिहिले आहे.
संस्कार भारती, साने गुरुजी कथामाला, सखी संवादिनी, वगैरे संस्थावर पदाधिकारी.
मनमंजुषेतून
☆ पाण्यातले भाऊजी ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
—-गौरी-गणपतीचे दिवस, आईची देखणी पूजा, पुरणावरणाचा साग्रसंगीत स्वयंपाक, आम्हाला सर्वांना वात्सल्याने ओवाळणं, भावुक होऊन दाराच्या दिशेने अक्षता टाकून” पाण्यातले भाऊजी, जिथे असाल तिथे सुखात रहा” असं पुटपुटणं आणि नंतर त्या भाऊजींची कथा सांगणं सारं सारं आठ वतं. सांगतेच सख्यांनो तुम्हाला.
माझ्या आईचा जन्म 1921 साल चा. अत्यंत देखणी, समजुतदार, सासरी माहेरी सर्वांची लाडकी. तेराव्या वर्षीच लग्न होऊन सासरी आली. घरात प्रेमळ पण करारी सासुबाई , शिस्तीचे भोक्ते व सदैव देव धर्मात रमलेले दीर, कष्टाळू जाऊ व एक तिच्याच वयाचे दीर होते. त्यांचे नावही माहीत नव्हते पण बरोबरीचे असल्यामुळे तिला ते जास्तच आवडत. ते कुणाशीही बोलत नसत. जणु मुकेच होते. पण ते तासनतास देवघरात रमत. स्तोत्रे म्हणत. देव त्यांच्याशी बोलतही होते म्हणे. एकदा ते देवघरातून बाहेर आले आणि मोठ्याने म्हणाले
” आता नदीला पूर येणार आणि आम्ही जाणार.” ते छान पोहत असत. सर्वांना वाटले ते पुराचे पाणी बघायला आणि पोहायला जाणार.
गणपती बसले. गौरी आवाहनादिवशी आजीने आईला सांगितले ” संध्याकाळी शेजारच्या बायकांबरोबर पूजेचे साहित्य घेऊन खड्याच्या गौरी घेऊन ये. तुझ्या पाठी मागे तुझा लाडका दिर घंटा वाजवत येईल. दारात आल्यावर तुझी मोठी जाऊ पायावर दूध-पाणी घालेल. शुक्रवारी बसवलेली सुगडाची गौर तुझ्या गौरी ला भेटवेल. घरात सगळीकडे हळदीकुंकवांनी गौरीची पावले काढलेली असतील. त्यावर पावले टाकीत ये. प्रत्येक खोलीतून तुझ्या गौरीला फिरवून आण. ती पाहुणी आलेली असते. प्रत्येक पाऊल टाकताना म्हणायचे
” गौर आली गौर.” आम्ही विचारू
” कशाच्या पावलांनी” तू म्हणायचे” सोन्या रुप्याच्या पावलांनी ” गौरीला सगळे घर दाखवायचे व विचारायचे ” इकडे काय आहे?” मग जाऊ सांगेल” इकडे देवघर आहे, इकडे स्वयंपाक घर आहे, इकडे कोठीची खोली आहे, इकडे माजघर आहे ,इकडे न्हाणीघर आहे.” असे सगळे घर दाखवून देवघरात पाटावर दोन्ही गौरींना शेजारी बसवायचे. साग्रसंगीत पूजा करायची शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवायचा.”
आई आनंदाने संध्याकाळी शेजारणीं बरोबर छोट्या दीरासह गेली. नदीला भयानक पूर आलेला होता. सुरक्षित ठिकाणी सगळ्यांनी पूजा केली. स्वच्छ घासलेल्या तांब्यात 5 खडे, गौरीच्या झाडांचे फुलासकट लांब तुरे , मोठमोठ्या दुर्वा, आघाडा , कडेने चाफ्याची पाने लावून नदीच्या पाण्याने तांब्या भरला. त्याला बाहेरून ओल्या हळदीची व कुंकवाची बोटे रेखून छान सजवला. मनोभावे पूजा करून सगळ्याजणी घराकडे निघाल्या. प्रत्येकीच्या मागे कोणीतरी घंटा वाजवत येत असे. आईच्या मागे तिचे भाऊजी येणारच होते. सासूबाईंनी बजावून सांगितले होते ” गौरी घेवून सरळ घरी यायचे. मागे वळून पाहायचे नाही.” त्याप्रमाणे आई आली. जाऊ बाईंनी पायावर दूध-पाणी घालून सुगडाची गौर भेटवली.” जेष्ठा कनिष्ठा” घरभर फिरून देवघरात स्थानापन्न झाल्या. पूजा नैवेद्य आरती झाली.
जेवायला पंगत बसली. धाकटे भाऊजी कुठेच दिसेनात. तोपर्यंत सर्वत्र अंधार दाटला होता. त्यावेळी गावात वीज आलीच नव्हती. बत्तीच्या उजेडात सारेजण शोधायला बाहेर पडले. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पुरात उड्या मारल्या. नावाड्याने खूप शोधाशोध केली. पण काही उपयोग झाला नाही. भाऊजी दिसलेच नाहीत.
आधीच अबोल असलेली आमची आजी पार मुकीच झाली. पण तिला आपले बाळ परत येईल अशी शेवटपर्यंत आशा होती. दुसर्या दिवशी तिने पुरणावरणाचा स्वयंपाक केला. सर्वांना ओवाळले. शेवटी दाटल्या गळ्याने तिने दाराकडे अक्षता टाकून आपल्या बाळाला औक्षण केले व म्हटले
” औक्षवंत हो बाळा. कुठे असशील तिथे सुखात रहा.”
तिचे बाळ कधीच परत आले नाही. पण माझी आई मात्र दर श्रावण शुक्रवारी व गौरजेवणादिवशी दाराबाहेर अक्षता टाकून औक्षण करायची व म्हणायची
” पाण्यातले भाऊजी , औक्षवंत व्हा. जिथे असाल तिथे सुखात रहा .”
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈