सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ Speak up before you give up  – सुश्री वृषाली दाभोळकर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

Speak up before you give up – 

‘डिप्रेशन‘  या विषयावर आपण सध्या बऱ्याच पोस्ट वाचतोय. मीही आज माझा अनुभव शेअर करतेय – वयाच्या १९ व्या वर्षी मी सरकारी नोकरीत रुजू झाले आणि ३९ वर्षे सर्व्हिस करून जानेवारी २०२०मधे स्वेच्छानिवृत्ती घेतली. माझी पोस्ट Clerical. पण मला बरीच वर्षे माझ्या पोस्ट पेक्षा अधिक जबाबदारीचे काम करण्याची संधी मिळाली e.g. GM/DGM Secretariat. 

ऑफिस मधील बहुतेक सर्व कमिटीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सर्व काही छान चालले होते. ऑफिसमधील वेगवेगळ्या सेक्शनमधील कामाचा अनुभव मी घेतला. क्रेडिट सोसायटी, युनियन सर्वच ठिकाणी मी अॅक्टिव होते. थोडक्यात ऑफिस हेच आयुष्य बनले होते.

५-६ वर्षापूर्वी माझ्या मुलाला डेंग्यू झाला. तो ठाण्यात हॉस्पिटल मधे अडमिट होता. प्लेटलेट्स कमी होत होत्या, काळजी वाढत होती. मी त्याच्याबरोबर होते आणि त्याचदरम्यान माझी बदली  त्याच बिल्डिंगमधे एका अश्या ठिकाणी झाली/केली गेली ज्याची मी कधी अपेक्षाच केली नव्हती. एक आऊटसोर्स  केलेले डिपार्टमेंट  पुन्हा ताब्यात घेऊन तेथे स्टाफची नेमणूक करण्यात आली होती. सरकारी खात्यात असलेल्या सर्व असुविधा तेथे होत्या. गेट जवळील वॉचमनरूमशेजारील छोटी रूम, पत्र्याची शेड, डासांचे साम्राज्य…. १५-२०दिवसानंतर मुलाची तब्बेत सुधारल्यावर मी ऑफिसला नवीन सेक्शनमध्ये जॉईन झाले.  ऑफिसवर/तिथल्या कामावर मनापासून प्रेम होते त्यामुळे कामात लक्ष नसणे/चुका होणे असे कधी सुदैवाने झाले नाही, किंवा ऑफिसला जाऊ नये असेही कधी वाटले नाही. पण मनावर कुठेतरी खोलवर परिणाम झाला होता. घटना छोटीशी असते —आता कुणीही म्हणेल की सरकारी खात्यात एका डिपार्टमेंटमधून त्याच बिल्डिंगमधे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदली यात काय विशेष? अगदी खरंय… मला हेच तर सांगायचे आहे. एखादी छोटीशी घटना तुमच्या मनाला किती खोल जखम करून जाईल सांगता येत नाही. ऑफिसचे काम व्यवस्थित चालू होते त्यामुळे कुणालाही माझ्या मानसिक स्थितीचा अंदाज येणे शक्य नव्हते. मलाही नक्की काय होतंय हे समजत नव्हते. सतत कुठलातरी अवयव दुखायचा, कधी पाठ तर कधी हात.. डॉक्टरच्या फेऱ्या– पण टेस्टचे रिपोर्ट मात्र नॉर्मल. आजार शरीराला नाही तर मनाला झालाय हे समजतच नव्हते. रात्रीची झोप येत नव्हती, बेचैनी वाढत होती. कुठल्याही गोष्टीचा आनंद वाटेनासा झाला होता. दरम्यान मुलाने आणि सुनेने पवईसारख्या एरियात फ्लॅट घेतला, होंडा कार  घेतली. खरंतर किती आनंदाचे प्रसंग ! माझ्या डोक्यात मात्र निगेटिव्ह विचारांनी थैमान घातले होते. हे काहीतरी वेगळे आहे हे माझ्या लक्षात येऊ लागले होते, पण उपाय सापडत नव्हता. काहीच दिवसात परिस्थिती आणखी बिघडली – मी ९ व्या मजल्यावर राहते. घराला दोन टेरेस.  मला असे वाटू लागले की मी आता टेरेसमधून खाली उडी मारणार…. खूप भीती वाटायची, मी टेरेसची दारे बंद ठेवू लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी ऑफिसला अगदी नेहमीप्रमाणे टापटीप, छान साड्या/ड्रेस घालून जात होते, काम अगदी व्यवस्थित करत होते.  त्यामुळे माझ्या मनात काय चालले आहे हे कुणालाही समजत नव्हते. दरम्यान मी ठाण्याला माझ्या विहीणबाईंकडे गेले असता त्यांच्याशी बोलले. त्यांनी डॉ आनंद नाडकर्णी यांच्या IPH (Institute of Psychological Health)  या  संस्थेतील डॉ कवलजीत यांची अपॉइंटमेंट घेतली. आम्ही डॉक्टरांची भेट घेतली. कवलजीताना  माझी मातृभाषा समजत नव्हती,  पण माझ्या मनाचा आजार समजला होता. त्यांनी मला या आजारा – विषयी संपूर्ण माहिती सांगितली व तो लगेच बरा होणार नसल्याचेही सांगितले. औषधे सुरू झाली. प्रश्न होता तो मी हा आजार स्वीकारण्याचा . जसा शरीराला आजार होतो तसा आपल्या मनाला झालाय आणि यातून आपल्याला यशस्वीपणे बाहेर पडायचे आहे हे मनाला आणि मेंदूलाही पक्के समजावले. या आजाराशी लढताना मला माझ्या कुटुंबाचीपण खूप चांगली साथ मिळाली. माझ्या डोळ्यातून अनेकदा वाहणाऱ्या अश्रूंचा अर्थ त्यांना समजू लागला होता. टीव्हीवर हाणामारीचे किंवा दुःखाचे प्रसंग दिसताच चॅनल बदलले जाऊ लागले होते. माझ्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली. ७-८ महिन्यानंतर ३ गोळ्यापैकी २ गोळ्या बंद झाल्या. दरम्यानच्या काळात मी पुण्यातील IPH मधेही ट्रीटमेंट घेतली– आता गाडी पूर्वपदावर आली आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेऊ लागले आहे. सकाळी चहा पिणे , पेपर वाचणे तर संध्याकाळी सूर्यास्त  बघणे असा माझ्या टेरेसचा मनसोक्त आनंद घेत आहे. माझ्या आयुष्यातील आनंद परत मिळवून दिल्याबद्दल डॉ आनंद नाडकर्णी आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार. अर्थात या आजारावर आपल्याला मात करायची आहे या माझ्या मनाच्या निग्रहाचीही खूप मदत झाली. एवढं सगळं लिहिण्याचा उद्देश हाच की साधारणपणे हा आजार दडवून ठेवण्याची मानसिकता असते. समाज काय म्हणेल त्याचे भय असते. कुटुंबाकडूनही– दुर्लक्ष कर, लोकांच्यात मिसळ, हसत राहा, छंदात मन रमव– असे सल्ले दिले जातात आणि उपचार घेण्याचे टाळले जाते. मी खरंच सांगते, त्या मानसिक अवस्थेत हे कुठलेही सल्ले मेंदूपर्यंत पोहोचतच  नाहीत तर उपयोगी कुठून पडणार? हे सारे लाभदायक ठरते ते मानसिक अवस्था सुधारल्यानंतरच. साधारणपणे सेलिब्रिटीज,राजकारणी , प्रसिद्ध खेळाडू, श्रीमंत वर्गातील लोक या आजाराचे शिकार होतात असे समजले जाते. तसेच, डिप्रेशन  कर्जबाजारी झाल्यामुळे, प्रेमभंग झाल्यामुळे किंवा मोठ्या अपयशामुळे येते असेही नाही. तेव्हा कृपया आपल्या वागण्यात काही बदल झालाय का, आपण उगाचच इमोशनल होतोय का, काहीतरी आपल्या मनाला बोचत आहे का याकडे लक्ष द्या, वेळीच जवळच्या व्यक्तीजवळ बोला, दुर्लक्ष करू नका किंवा समोरची व्यक्ती आपल्याला काही सांगत असेल तर त्याकडेही नक्कीच दुर्लक्ष करू नका. कदाचित तिला तुमच्या मदतीची गरज असेल. मुख्य म्हणजे गरज पडल्यास ट्रीटमेंट जरूर घ्या, टाळाटाळ करू नका. आयुष्यापेक्षा काहीही महत्वाचे नाही. डिप्रेशन मधून तुम्ही नक्की बाहेर येऊ शकता हे मी माझ्या अनुभवावरून सांगते.

माझी ही पोस्ट वाचली की काहीजण  मला कदाचित बिचारी म्हणतील, यापुढील काळात माझ्या एखाद्या वाक्याचा/वागण्याचा माझ्या डिप्रेशनशी संबंध लावला जाईल. पण मला ते महत्वाचे मुळीच वाटत नाही.  उलट या पोस्टचा एखादया व्यक्तीला जरी फायदा झाला तरीही ती या एवढ्या मोठ्या पोस्टची अचिव्हमेन्ट असेल.

ले : सुश्री वृषाली दाभोळकर

प्रस्तुती – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments