मनमंजुषेतून
☆ मनातली अडगळीची खोली ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
काय डोकावले आहे का कधी ह्या खोलीत… ?
प्रश्न जरा विचित्र वाटतो खरा, पण बघा जरा विचार करून शेवटचं कधी डोकावलं होत ते.
आपण आपल्या घरातल्या अडगळीच्या खोलीत अधून मधून डोकावत असतो. नेहमी नाही पण महिन्यातून एकदा तरी नक्की डोकावतो. एखादी वस्तू जी क्वचित लागते ती तिथे ठेवलेली असते, ती आणायच्या कारणाने तरी, आणि नाहीच तर साठलेले धुळीचे थर झटकून खोली स्वच्छ करण्याच्या हेतूने तरी. सगळं सामान, अर्थात बरचस नको असलेलं झटकून स्वच्छ पुसून नीट लावून ठेवतो. उगीचच सगळ्या वस्तूंवरुन हात फिरवतो, काही खास गोष्टींवर घातलेले कव्हर बाजूला सारून ते झटकून परत घालतो.
काय काय सापडत म्हणून सांगू—. आरामखुर्ची, पेंड्युलमचे घड्याळ, कधी काळी शिवणकाम शिकलो आहे ह्याचा शिक्कामोर्तब करणारे मशीन, एफेम रेडियो, पिढ्यानपिढ्या चालत आलेला पाळणा, तीनचाकी सायकल जी आता कोणीही चालविणार नाही, पाटावरवंटा ज्यावर चटणी वाटण्यासाठी आपल्याकडे शक्तीही नाही, रॉकेल वरचे कंदील- आता रॉकेल न का मिळेना, स्टोव्ह जो पेटवता सुद्धा येत नाही अशा एक ना अनेक वस्तू असतात.
परवा मी पण सहज माझ्या अडगळीच्या खोलीत गेले होते. तिथे धूळ झटकून खोली आवरताना एक खुर्ची सापडली. ती पाहून मला माझ्या माळीकाकांची आठवण झाली. परवाच ते मला विचारत होते, ताई एखादी खुर्ची असेल तर द्याल का? त्यांचे वडील आले होते गावाकडून आणि त्यांना खाली बसता येत नव्हतं. पटकन ती खुर्ची काढली, झटकली आणि देण्यासाठी सज्ज केली. तेव्हाच ठरवलं अश्या वस्तू ज्या आपल्याला नको आहेत त्या आता ठेवायच्या नाहीत. ज्या चांगल्या आहेत त्या देऊन टाकायच्या. खराब झालेल्या टाकून द्यायच्या. नाही तर भंगारात द्यायच्या.
हा विचार करत असतानाच मला असं वाटलं—-की माणूस नुसते अडगळीच्या खोलीतच अडगळ ठेवत नाही, तर त्यापेक्षाही जास्त अडगळ मनात ठेवतो. ती साठवतो आणि त्याला खतपाणीही घालतो. त्या गाठोड्यात असतात अनेक गोष्टी— जसे मान, अपमान,अपयश, काही तुटलेली अपूर्ण राहिलेली स्वप्न, दुखावलेली दुरावलेली नाती, आपल्या मित्र मैत्रिणीशी झालेले भांडण, ते कोण मिटवणार म्हणून मनात असलेली अढी, अश्या एक ना अनेक गोष्टी. एकावर एक थर चढतच जातात, आणि नकळत त्याची अडगळीच्या खोलीपेक्षाही जास्त मोठी खोली मनांत तयार होते.
तेव्हा ठरवलं– घरात नको असलेल्या वस्तूंची खोलीच ठेवायची नाही. नको असलेल्या वस्तू ठेवायच्याच नाहीत, ना घरात आणि ना मनात. नको असलेल्या वस्तू देऊन मोकळं व्हायचं. सगळया गोष्टींचा कसा रोखठोक हिशोब ठेवायचा. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर तिथल्या तिथे सांगून मोकळे व्हायचे. त्याचे व्याजावर व्याज चढवायचे नाही मनांत. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली म्हणून कुढत बसायचे नाही, धुळी सारखी झटकायची आणि पुढे जात रहायचे. अपयशाला गोंजारत बसायचे नाही, तर त्याला यशाची पहिली पायरी समजून यश मिळेपर्यंत प्रयत्न करत रहायचे.
आज ह्या गोष्टी तुमच्या समोर मांडायच कारण आपण सगळेच जणं मनात खूप काही साठवून ठेवतो. भूतकाळाला जास्त महत्त्व देऊन वर्तमान हरवून बसतो. तसं न करता वर्तमानात जगूया ह्या क्षणाचा आनंद घेऊया.
बघा आठवून तुम्ही शेवटचे कधी डोकावले होते मनातल्या खोलीत??
आज नक्की डोकावा. नको असलेल्या साचलेल्या विचारांना काढून टाका, काही गैरसमज झाले असतील तर त्या व्यक्तीशी बोलून दूर करा. कुढत बसू नका आणि सगळ्यात महत्वाचे— विचार साठवून ठेवूच नका. कोणापाशी तरी बोलून मन मोकळं करा. साठलेली धूळ आपोआपच निघून जाईल—-एक स्वच्छंद, निरोगी मनाचे आयुष्य जगता येईल.
खुश रहा आनंदी जगा.
सहज मनाच्या कोपऱ्यातून
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
मो 9423566278
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈