मनमंजुषेतून
☆ मसाला डोसा….पाणी पुरी…वडा पाव ☆ संग्राहक – सुश्री प्रभा हर्षे ☆
१. “मसाला डोसा”
बाबा आणि मी, दोघांच्या बऱ्याच आवडी-निवडी सारख्याच…..
….लहानपणी ते माझे सुपरहिरो.. त्यांचीच कॉपी करायचो…
….आयुष्याच्या शाळेत ठामपणे उभं रहायला त्यांनीच भक्कम आधार दिला….. काळानुसार दोघांचे आयुष्य वेगवेगळे झाले…. मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड लाईफ…..
….वाद नव्हता, पण संवाद कमी मात्र नक्कीच कमी झाला….. अचानक…. आम्ही दोघंच.. असे खूप वर्षांनी हॉटेलात जाण्याचा योग आला…… पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी बाबांचा हात हातात घेतला….. बाबा हसले…… त्यांच्या मनात काय आले असेल याची कल्पना आली…..
:पस्तीस वर्षापूर्वी परिस्थिती बरोब्बर उलटी होती……
….तेव्हा त्यांनीच मला आधार दिला होता, आता मी…… *
…. काळानुसार आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्यासुद्धा…..
…बाबांच्या चेहऱ्यावरचे समाधान खूप काही सांगून गेले…. बाप-लेकाचे नाते अपडेट झाले…..
…. खुर्चीवर बसताना त्यांनी पाठीवर थोपटले…. तेव्हा खूप इमोशनल झालो…. वेटर आला, तेव्हा दोघांनी एकदम ऑर्डर दिली “मसाला डोसा”…….
2 “पाणीपुरी”
लग्नानंतर तिने संसारालाच सर्वस्व मानले……
…..शिक्षण, करियर…. नोकरी बाजूला ठेवून हाउसवाईफ झाली…..
….. तिचं आयुष्य घर… मुले आणि मी यांच्यापुरतेच झाले तर मी माझ्याच विश्वात… तिचा कधी विचारच केला नाही… कायमच टेकन फॉर ग्रँटेड…..
….आठ दिवसांपूर्वी आजारपणामुळे ती झोपून होती.. तेव्हा घर थांबले, कारण सगळे प्रत्येक गोष्टीत तिच्याचवर अवलंबून… याचाच तिला प्रचंड गिल्ट आला… मीच समजूत काढली….
“दोन दिवस घरीच थांबता का?” तिने विचारले……
…त्यामागची तळमळ जाणवली….. मी थांबलो…. ती प्रचंड खूष… परिणाम… रिकव्हरी लवकर झाली…..
मी आठवडाभर सुट्टी घेतली… तिला सुखद धक्का!!
तिला पाणीपुरी प्रचंड आवडायची…. मला अजिबात नाही….. म्हणून तिने कधीच आग्रह केला नाही…..
तिला सरप्राईज…. “चल आज पाणीपुरी खाऊ”… असे मी म्हणल्यावर भूत पाहिल्यासारखे तिने पाहिले…..
….तिला प्रचंड आनंद झाला होता, पाणीपुरी खाताना ती खूप बोलत होती, हसत होती. तिला खूप काही सांगायचे होते…..
फक्त माझ्यासोबत वेळ घालविण्याची किती साधी अपेक्षा, पण तीसुद्धा मला समजली नाही. माझे डोळे भरून आले, तिच्या लक्षात आले….
“काय झाले?”….
“पाणीपुरीची चव आज कळली” मी हसत उत्तर दिले…. ‘अजून खाणार?’ विचारल्यावर तिने आनंदाने मान डोलावली….
मी आता ठरवलंय… तिला जपायचं…. तिच्या आवडीत माझी आवड शोधायची…..
संसारसुद्धा आंबट, गोड, तिखट, चटपटीत, रुचकर असतो – जणु काही पाणीपुरीच….
३. “वडापाव”
रुटीन ऑफिस वर्कमुळे खूप दमलो आणि कंटाळलो होतो.
उगीचच चिडचिड चालू होती, बोर झालो…..
अचानक डोक्यात ट्यूब पेटली. ….जिवलग मित्राला फोन केला… तोसुद्धा रुटीनला वैतागलेला… दोघं समदु:खी लहानपणी कायम सोबत असणारे आम्ही… बऱ्याच दिवसात भेटलोच नव्हतो….
समोरासमोर आल्यावर गळाभेट घेतली… “किती बदललोय यार… एकमेकांपासून लांब गेलो”, मी…..“बघ ना… एकाच शहरात राहून भेटू शकत नाही….. साली लाईफ फालतू झाली आहे”… मित्र भावुक झाला…..
….“चलो तर मग….” मी म्हणालो….
….दोघांचे मोबाईल सायलेंट मोडवर…. ….“वडापाव” आमचा वीक पॉईंट……
….आतापर्यंत शेकड्याने खाल्ले, पण मित्रासोबत खाण्याची मजा काही औरच…
…..नेहमीच्या दुकानात गेलो, वडापाववर ताव मारायला सुरूवात केली….. दोन राउंड झाले, सोबत कटिंग चहा… पोटभर गप्पा मारल्या…. फार मस्त वाटले…. एकदम फ्रेश झालो…..!!!!
….मी, मित्र आणि वडापाव असा झकास सेल्फी काढला…..
…..दोस्ती रिचार्ज करून पुन्हा आपापल्या वाटेने निघालो…..
…. आयुष्य वेगळे झाले, तरी दोन गोष्टी अजूनही तशाच होत्या – आमची मैत्री आणि आवडीचा वडापाव……
© सुश्री प्रभा हर्षे
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈