सौ. सावित्री जगदाळे
☆ मनमंजुषेतून ☆ जावे त्यांच्या वंशा ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆
गावाकडे घर केलं तेव्हाच घराशेजारी दोन गुंठे जागेत भाजीपाला करायचा असं ठरवलं. यावेळी शेतात मूग पेरला. कडेने पावटा, भेंडी, गवार, दोडका, गोसाळी, कारले यांच्या बिया टोकल्या. वांगी, फ्लॉवर, कोबी, मिरच्या यांची रोपे लावली. शेपू, चाकवत, पालक, मेथी, कोथींबीरच्या बियांची चिमूट चिमूट लावली. सतत पाऊस पडत होता त्यामुळे पाणी द्यायची गरज पडली नाही. मूग चांगला आला. शेंगा काळ्या पडू लागल्या की तोडायच्या. पहिल्या दिवशी दोन बादल्या भरल्या. वाकून तोडाव्या लागत त्यामुळे कंबर दुखू लागली. तरी घरच्या शेतातला आणि खत, किटकनाशके न वापरता आलेला. त्यामुळे त्याचं समाधान जास्त. नंतर एक दोन दिवसांनी थोड्या निघत राहिल्या. यासाठी गौरी गणपती गावाकडेच बसवायचे ठरवले. त्यामुळे वरचेवर मुगाच्या शेंगा तोडता येतील. गौरी गणपती बसवताना सून, मुलगा आलेले. घरातली सगळी कामे झाल्यावर सुनबाई कुठेतरी फिरून येऊ म्हणाली. खेड्यात शेताशिवाय कुठे जाणार…
लांबच्या शेतात गेलो. हल्ली जास्त ऊसाचीच शेती केली जाते. आमच्या शेतात उंच वाढलेला ऊस होता. टॅक्टरने नांगरल्या मुळे बांध राहतच नाही. मग शेतातूनच वाट काढत जावं लागतं. शेजारच्या सोयाबीनच्या शेतातून निघालो. गुडघ्या एवढं पीक त्यात गवतही भरपूर. अनेक ठिकणी लाल मुंग्यांची वारुळे. साप असण्याची शक्यता. नीट बघूनच चालावे लागते. आम्ही दोघे, सूनबाई, सहा वर्षाचा नातू असे निघालो. मुलगा आदल्या दिवशीच जाऊन आल्यामुळे येणार नाही म्हणाला. त्याला अनुभव आलेला.
थोडे चालणं झाल्यावर ह्यांनी मागे वळून बघण्याच्या नादात वारुळावर पाय पडला. त्यांच्या पॅण्टवर सगळीकडे लाल मुंग्याच. पॅण्ट काढून मुंग्या झटकून मग पुन्हा घातली. थोड्याफार मुंग्या आम्हालाही चावल्या. शौर्य नाचायला लागला. सूनबाई म्हणाली, कशाला आलोय आपण इकडे? म्हटलं तुलाच हौस फिरायला जायची. माझ्या आणि शौर्यच्या कपड्यांना कुसळे भरपूर लागली. सोयाबीनचे शेत संपल्यावर ऊसाच्या शेतातून जावं लागलं. ऊसाचे काचोळे हाताला कापत होते. हाताने ऊस धरला तरी मागच्या येणाऱ्या च्या अंगावर पडत होता. शौर्य वैतागला. ऊसाच्या बाहेर आल्यावर शेजारच्या काकी मुलाला बघून म्हणाल्या, आमच्या शेतातून वाट होती की. इकडून यायचं नाही का? त्यांचा मूग काढल्यामुळे शेत मोकळं होतं. शेजारी हिरवंगार आल्याचे भरघोस पीक होते. पुन्हा एक ऊसाचे शेत ओलांडून उंबराच्या झाडाखाली आलो. तिथे कपड्यावरची कुसळे काढली. शौर्यने खाऊ खाल्ला. नुकतीच एका शेतात ऊसाची लागण केलेली. गेल्यावर्षी भुईमूग, हरभरा होता तेव्हा शेत छान वाटत होतं.
आता उंच वाढलेल्या ऊसामुळे जंगलात आल्यासारखे वाटत होते. थोडावेळ थांबून निघालो. येताना मात्र शेजारच्या आल्याच्या, मुगाच्या शेतातून आलो. तरी वर खाली बांध, पावसाने भरपूर तण वाढलेले आणि निसरडी जमीन. सापाची भिती. मुंग्यांची वारूळे चुकवत आलो. रस्त्यावर आल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. हे दोन तीन दिवसांनी शेतात चक्कर मारतात. त्यांना काही वाटले नाही. पण आम्हाला ट्रेकींगपेक्षा अवघड अनुभव आला. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव झाली. रोज किती यातना त्यांना सहन कराव्या लागतात. जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळते.
© सौ. सावित्री जगदाळे
संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈