प्रा. सौ. सुमती पवार
मनमंजुषेतून
☆ आजोबा आजी ….☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
आमच्या खळ्यामध्ये एक मोठे वडाचे झाड होते.लहानपणी वडीलांबरोबर मीही खळ्यात जात असे. बैलांची पायत बाजरीच्या कणसांवरून फिरत असे. वडाचा रूबाब व घेरा एवढा मोठा होता की शेकडो चिमण्या कावळे पक्षी त्यावर आनंदाने उड्या मारत असत, व वडाला आलेली लाल टेंभरे खात बागडत असत. मी पण खालच्या फांद्यांवर जाऊन बसत असे व त्यांची ती लपाछपी बघण्यात मला फार मजा येत असे. सुगी आणि उन्हाळा तसे सुटीचेच दिवस असल्यामुळे माझे खूप वेळा खळ्यात जाणे होई. कधी कधी तर वडावर बसून अभ्यास केल्याचे ही मला आठवते.
घरी आले की, खाटेवर माझे आजोबा मला बसलेले दिसायचे. माझ्या आजोबांनी व माझ्या पूर्ण कुटूंबानेच स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. माझे आजोबा, आई वडील माझी आत्या काका साऱ्यांनीच स्वातंत्र्यासाठी तुरूंगवास भोगला होता हे मोठी झाल्यावर मला कळले. तेव्हा खाटेवर बसलेले ते आजोबा आठवून अभिमानाने माझा ऊर भरून आला. देशासाठी खस्ता खाणारे माझे कुटूंब व त्यातील सदस्यांचे मला खूप कौतुक वाटले.
न कळत माझे मन त्या प्रशस्त वडाची व माझ्या आजोबांची तुलना करू लागले. तळपत्या उन्हात भली मोठी घेरदार सावलीचे छत्र धरणारा तो वड व माझे आजोबा सारखेच नव्हते काय..? हो सारखेच होते. नदी काठावर भर उन्हात थंडी पावसात भिजत आपला पर्ण पसारा वाढवत थंडगार सावलीचे छत्र धरणाऱ्या त्या वडात व माझ्या आजोबात मला खूप साम्य दिसले. अगदी जुन्या काळात १९१०/२० च्या काळात घरची अत्यंत गरीबी असतांना माझे आजोबा आजी संसार ओढत होते. आणि अशाही परिस्थितीत १९३० पासून ते गांधीजींच्या चले जाव आंदोलनात सामिल झाले.. केवढे हे देश प्रेम..!
नकळत माझे मन मनात बसलेल्या वडाशी तुलना करू लागते. त्या वडासारखाच माझ्या आजोबांचा त्याग नव्हता काय? तो वड जसा पाऊस पाणी थंडी वारा वीजा वादळ यांची पर्वा न करता आपल्या अंगाखांद्यावर वाढणाऱ्या गोकुळा साठी निसर्गातल्या साऱ्या संकटांशी लढत होता त्या प्रमाणे माझे आजोबाही देशावर आलेल्या पारतंत्र्याच्या संकटाशी दोन हात करत होते. मोठ्या कुटूंबाची जबाबदारी खांद्यावर असतांना गरिबीत ही देशासाठी तुरूंगवास भोगत होते. त्या काळी शिक्षणाची तशी वा न वा च असतांना अडाणी असले तरी देशप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते व ते तुरूंगात जात होते. केवढी ही कर्तव्यनिष्ठा देशासाठी…!
वडाच्या पारंब्यांसारखाच आजोबांचा वंश विस्तार होता. वडाच्या पारंब्या म्हणजे माझ्या आजोबांचे शुभ्रधवल केसच जणू … त्या वडा सारखेच शांत मिष्किल हसणारे आजोबा मला दिसतात. जुना काळ असतांना सुविधा नसलेले दिवस आठवून त्यांचे कष्ट आठवतात व नकळत मी नतमस्तक होते. आजोबांच्या बरोबरीनेच वाढणाऱ्या त्या वडाला आणि आजोबांना गरिबीत नेटाने साथ देणाऱ्या आजीलाही मी मनोमन शतश: प्रणाम करते … हो, ते होते म्हणून तर आपण आहोत ना? केवढे त्यांचे उपकार की एवढे हे असे सुंदर जग त्यांनी आपल्याला दाखवले. त्यांच्या मुळेच या सुंदर जगाचा अनुभव ह्याची देही ह्याची डोळा आपण घेत आहोत ना….? आणखी काय पाहिजे …!
कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञताच ….!
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
(९७६३६०५६४२)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈