डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ मांडवावरची वेल ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
आमच्या घरी सरुबाई खूप वर्षे काम करतात. अतिशय गरीब, प्रामाणिक, आणि कष्टाळू. त्या दिवशी खूप अस्वस्थ होत्या. सकाळी चहा पण नको म्हणाल्या.
“ काय झालय सरुबाई.”
“ काय न्हाय व रोजचे तमाशे.. जीव नुसता नको झालाय. रोज रोज कटकटी, भांडणतंटे.
मुलं मोठी झाली तरी अक्कल येईना या नवऱ्याला,.दारू तरी किती ढोसावी–आता ही पोरं शिकून मार्गी लागली तरच आशा– कसलं व हे जिणं. बघा ना, तुमच्या ताई एवढंच असेल माझं थोरलं. ताई आपल्या किती अब्यास करत असतात ते बघतेय ना मी. आणि आमचं दिवटं–
अक्खा दिवस वस्तीत फिरत असत्यय शाळा बुडवून. आमची वस्ती ही अशी. बाई वेळ नाही व लागत बिगडायला. न्हाय म्हणायला,पोरगी मात्र आहे हुशार पण किती व काम लागतं तिला बी घरात.”
सरुबाईची समजूत घालून, खायला देऊन, पाठवले खरे,पण मन मात्र अस्वस्थच होते.
दिवस पळत होते. माझ्याच आयष्याची लढाई लढताना, मी तरी कुठे कोणाकोणाला पुरणार होते? —
दरम्यान,माझ्या हॉस्पिटलने चांगलाच जीव धरला। खूप छान चालायला लागले। मला दिवसाचे 24 तास पुरेनासे झाले आता मी सरुबाईना पगार वाढवला. माझ्या हॉस्पिटलच्या पेशंटचे जेवणखाण त्या करू लागल्या. मला ती काळजीच उरली नाही. मध्ये मध्ये समजायचे, मुलगी छान मार्क मिळवतेय, पण मुलगा काहीही करत नाही. नुसता अड्ड्यावर बसून जुगार खेळतो.
–आम्ही बघण्या खेरीज काहीच करू शकत नव्हतो.
सरूबाईंची मुलगी खूप वेळा यायची आईला मदत करायला. मोठी गोड मुलगी. वेळ मिळाला, की अभ्यासाचे पुस्तक उघडून बसायची. मला मोठे कौतुक वाटायचे तिचे..काही अडले,तर माझ्या मुलीला विचारायची—
त्या दिवशी मला तिने प्रगती पुस्तक दाखवले. कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकणाऱ्या या पोरीला आठवीत ९0 टक्के मार्क्स होते, पाच तुकड्यात ती पहिली आली होती.
आम्हाला अत्यंत आनंद झाला.आणि कौतुक वाटले. मी तिला मोठे बक्षीस दिले. माझ्या मुलींनीही तिला सांगितले, “ हे बघ,राधा,आता मागे वळून बघू नको. खूप हुषार आहेस तू.
आत्ता वाटेल तेवढे कष्ट कर, पण या परिस्थितीतून तू स्वतःला बाहेर काढ. अग, हेही दिवस जातीलच. आम्ही आहोत ना–कोणतीही मदत लागेल ती माग.”
राधाला दहावीला 92 टक्के मार्क मिळाले. मला विचारायला आली—
“ बाई, यापुढे मी काय करू? आई तर माझं लग्न करायला निघालीय, पण बाई,मला शिकायचंय हो। मला तुमच्यासारखे मोठे व्हायचंय. मला डॉक्टर तर होता येणार नाही, पण निदान काहीतरी करून दाखवायचं आहे. ”
तिची तळमळ अगदी काळजाला भिडली. सरुबाईना बोलावले आणि म्हटले,
“ लग्न करताय हो राधाचे? वाटतंय का जीवाला काही ? द्या असाच दारुडा बघून, की सुटलात.
जरा धीर धरा सरुबाई. ही मुलगी खरंच पुढे जाईल, पांग फेडील तुमचे. मी भरते तिची सगळी फी यापुढे.. “
“ अव, फी मस भराल बाई, पण लोक काय म्हणतील ? आणि हिला शिकलेला नवरा कुठून आणू मग.? “
मी चिडून म्हणाले,” गप बसा. आणेल तिचा ती शोधून. जा ग राधा, मी घेईन सगळी तुझ्या शिक्षणाची जबाबदारी.”
राधा 12 वी झाली. इतके सुरेख मार्क होते, की तिला कुठेही सहज प्रवेश मिळू शकत होता.
पुन्हा राधा माझ्याकडे आली.‘ आता काय? ‘हा प्रश्न होताच कायम. माझी बहीण डि. एड. कॉलेजची प्रिंसिपल होती।
आधी राधाला विचारले, “ तुला शिक्षक व्हायला आवडेल का? बघ–तू 2 वर्षात डी एड होशील, आणि लगेच नोकरीही लागेल. मग बाहेरून कर बी. एड. नाही तर तुला नर्सिंगचाही पर्याय आहे–सहज मिळेल तुला ऍडमिशन दोन्हीकडे. “
राधा म्हणाली, “ बाई,मी जर नर्सिंग केले, तर मला सगळे फ्री होईल ना? हॉस्टेल, स्टायपेंड? “
” अर्थात राधा. तुला काहीही खर्च नाही पडणार.”
राधाने बी. एस्सी. नर्सिंगला ऍडमिशन घेतली. तिची जिद्द कायम होती. राधा आता एकदम स्मार्ट झाली. दिसायला छान होतीच, पण चेहऱ्यावर बुद्धीचे तेज दिसू लागले.
राधा बी. एस्सी. ला डिस्टिंक्शनमध्ये पास झाली. लगेच तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला. फुल युनिफॉर्ममधली राधा माझ्यासमोर येऊन उभी राहिली, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणीच आले. किती सुंदर दिसत होती राधा.
तीनच वर्षात राधा चीफ स्टाफ झाली. ‘ ऑपरेशन थिएटर सिस्टर ’ अशी मोठी जबाबदारीची पोस्ट तिला मिळाली.
एक दिवस ती माझ्या घरी एका मुलाला घेऊन आली—” बाई,आता हाही प्रश्न तुम्हीच सोडवायचा– नेहमी सारखा. “
राधाच्या चेहऱ्यावर लाजरे हसू होते.
“ बाई हा सतीश. माझ्याच हॉस्पिटलमध्ये नोकरी करतो. एम.कॉम. आहे, आणि हॉस्पिटल ऍडमीनमध्ये आहे. मला लग्न करायचंय याच्याशी. “
मी सतीशची माहिती विचारली. छानच होता मुलगा. स्वतःचा छोटा फ्लॅट होता. आईवडील गावी असायचे. पगारही चांगला होता. पण सरुबाई —“ बाई ,जातीचा न्हाय आमच्या हा. “
“ सरुबाई, बास झाले. काय केलेत हो आजपर्यंत या लेकरासाठी तुम्ही? लग्नासाठी एक पैसाही न मागणारा असा उमदा जावई आपणहून दारात येऊन उभा राहिलाय. आणि मुले मोठी आहेत आता. मुकाट्याने परवानगी द्या. नाही तर ती लग्न करूनच येतील.”
सरुबाईना पटले– साधेसुधे लग्न झाले. किती सुंदर दिसत होती जोडी. मला वाकून नमस्कार करताना राधा म्हणाली, “ बाई तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. तुमच्या दोन, तशीच तिसरी मुलगी मानलीत मला .” राधाने मला मिठी मारली. मला खूप समाधान मिळाले.
केव्हाही पायदळी तुडवली जाईल अशी ही वेल, माझ्या हातून मांडवावर चढवली गेली.
आता ती फुलेल फळेल—- आणि समाधान मला मिळेल.
देवानेच हे काम करून घेतले होते माझ्याकडून.
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
अतिशय सुंदर भावपूर्ण रचना बधाई