सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
मनमंजुषेतून
☆ चांदणक्षण आठवणींचे ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
“को जागर्ती, को जागर्ती, कोण जागं आहे? हे बघत शंकर-पार्वती आज आकाशातून फिरत जात असतात आणि म्हणून आज जागं राहायचं, म्हणजे सुख-समृद्धी आपल्या घरी येते” अशी कोजागिरी ची गोष्ट लहानपणी आम्ही मामा मराठ्यांच्या चाळीत ऐकत असू. ती गोष्ट वैद्य वहिनी अगदी रंगवून सांगायच्या आणि दरवर्षी ऐकली तरी त्यातील गोडी कमी व्हायची नाही! मराठ्यांची चाळ आमच्या घरापासून जवळच असल्याने आणि त्या चाळीत आमचे येणेजाणे असल्याने कोजागिरी साजरी करायला आम्ही तिथे जात असू.माझ्या जवळच्या मैत्रिणी तिथे रहात असत. साधारणपणे 1962 ते 71 आमचे बि-हाड रत्नागिरीत होते. तोच माझा शाळेचा ही कालखंड होता, त्यामुळे मैत्रिणींचे वेड घरच्यां पेक्षा जास्तच! एकत्र खेळायचं, शाळेला जायचं, शाळेतून येताना कोपऱ्यावर तासन-तास गप्पा मारायच्या असा आमचा दिनक्रम होता!
रत्नागिरी शहर तसं लहान! मराठ्यांची चाळ झाडगावात प्रसिद्ध… बटाट्याच्या चाळी सारखी! जवळपास सतरा अठरा बि-हाडे असतील तिथे! वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या व्यवसायातील माणसे तिथे आनंदाने राहत असत. चाळीतला गणपती उत्सव ही दणक्यात साजरा होत असे. पाऊस नसला तर करमणुकीचे कार्यक्रम होत असत. कोजागिरी पौर्णिमेला मात्र बहुतेक वेळा लख्ख चांदणे अनुभवता येई! आता इतका निसर्ग लहरी नव्हता बहुतेक! चाळीत कार्यक्रम ठरला की आमचे छोट्या मुलांचे करमणुकीचे कार्यक्रम असतच! छोटी नाटिका,नकला, चित्रपटातील गाणी नाट्यछटा वगैरे. मीनाच्या वडिलांचा स्टुडिओ असल्याने तेथील मोठा पडदा कार्यक्रमासाठी मिळत असे.
संध्याकाळपासून आमची कार्यक्रमाची तयारी सुरु असे. त्यातल्या आठवणार्या एक-दोन नाटिका म्हणजे एक ध्रुवाची आणि दुसरी कृष्णाची! माझ्या मैत्रीण बरोबर अर्थातच त्यात माझी भूमिका असे. असे हे कार्यक्रम झाले की कोजागिरीच्या रात्री समुद्रावर फिरून येणे हा आनंदाचा भाग! टिपूर चांदण्यातून, चमचमणाऱ्या वाळूतून, समुद्राचे खळाळणारे रूप पाहात फिरताना अवर्णनीय आनंद मिळत असे. समुद्रावरुन घरी यायला नको वाटत असे पण भेळ आणि मसाला दूध याच आकर्षण अर्थातच चाळीत पुन्हा घेऊन येत असे. चंद्राला ओवाळून दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि आणि दुधाचा आस्वाद घ्यायचा, यामध्ये स्वर्गीय सुख होते. या सर्वासाठी सामूहिक वर्गणी असे. सगळेजण एकत्र येऊन काम करत असत. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचे आनंद घेण्यात सगळेच सामील असत. आतासारख्या मोठमोठ्या पार्ट्या नसतील तेव्हा, पण एकत्र येऊन भेळ खाणे, दुग्धपान करणे आनंददायी असे.त्या आटीव दुधाचा स्वाद अजूनही मनात रेंगाळत आहे! पावभाजी,वडा पाव यासारखे पदार्थ तेव्हा नव्हते! कधीकधी गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची यासारखे खेळही होत असत.
कोजागिरी जागवणे हे बहुतेक दर वर्षी होई. कोकणात पावसाचा सीझन संपला, आणि आकाश निरभ्र झाले की पावसाला कंटाळलेली माणसे कोजागिरीचा आनंद मनसोक्त घेत असत!
कोजागिरी पौर्णिमेला “नवान्न पौर्णिमा” असेही म्हणतात, कारण यादरम्यान ‘हळवं भात’ शेतात तयार झालेले असे. त्या नव्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य या दिवशी करतात. यानंतर दसरा-दिवाळी यासारखे मोठे सण येणार असल्याने कोजागिरी पौर्णिमे पासूनच वातावरण आल्हाददायक होण्यास सुरवात होत असे. कोजागिरी पासून एक महिना वेगवेगळ्या देवळातून (रामाच्या, राधा कृष्णाच्या, विठ्ठलाच्या) काकड आरती सुरू होत असे. त्या पहिल्या दिवशी तरी आम्ही देवाला जाऊन काकड आरती साजरी करत असू.थंडीची हलकीशी सुरुवात झालेली असे. स्वच्छ हवा, टिपूर चांदणे आणि समुद्रावरचे फिरणे अशा सर्व अविस्मरणीय अनुभवाचे वर्णन शब्दात करणे
अशक्य आहे…
आज इतकी वर्षे झाली तरी मामा मराठ्यांच्या चाळीत अनुभवलेली कोजागिरी मनात जपून ठेवली आहे. काळाबरोबर माणसे गेली,ती चाळही गेली ,पण आमच्या स्मरणात मात्र मामा मराठ्यांच्या चाळीतील ते चांदणक्षण कायमचे राहून गेले!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈