श्री अमोल अनंत केळकर

☆  मनमंजुषेतून : भक्तीसंगम ☆ श्री अमोल अनंत केळकर

मंडळी नमस्कार ??

आषाढ महिना संपत आला की धरण क्षेत्रातील पावसाने वाढलेल्या पाण्याच्या बातम्या लक्ष वेधून घेतात. अमुक पूल पाण्याखाली गेला, अमुक धरणं  क्षमतेच्या इतकी भरली , तमुक गावाचा संपर्क तुटला , या धरणातून अमुक तमुक क्षमतेचा विसर्ग चालू , हा बंधारा भरून वाहू लागला  इ इ.

अशावेळी  अनेक ठिकाणी  एक अपूर्व  दृश्य पहावयास मिळते.  यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो म्हणजे नरसोबावाडीच्या  (जिल्हा. कोल्हापूर ) ” दक्षिणद्वार ” सोहळ्याचा कृष्णा आणि पंचगंगा  यांच्या संगमावर असलेले नरसोबावाडी हे एक पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र. कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाने पंचगंगा ( जणू  पाच भगिनी) दुथडी भरून वाहू लागते. त्याचवेळी सातारा, सांगली  जिल्ह्यातील पावसाने  महाबळेश्वर, कोयना पाणलोट क्षेत्र, कोयना धरणातील पाण्याचा उत्सर्ग, चांदोली धरणातील उत्सर्ग  यामुळे  कृष्णा, कोयना, वारणा या नद्या आनंदाने फुलून जाऊन पात्राच्या बाहेर पडून दक्षिण दिशेकडून नरसोबावाडीला  येतात आणि एका अनोख्या भेटीसाठी  ‘सप्त कन्या’ आणि त्यांची ‘कृष्णा माई’ सज्ज होतात.

या मिळून सा-याजणींची  “परब्रह्म भेटीलागी ”  अशी अवस्था होऊन जाते आणि मग या सगळ्याजणी  सरळ पोचतात ते  श्री नरसिह सरस्वती यांच्या ‘ मनोहर पादुकांवर ‘ जलाभिषेक करण्यासाठी “शक्ती आणि भक्ती  यांचा हा  अनोखा संगम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चा जयघोष करत मग इतर भाविक  या भक्ती संगमाचा “याची देही ” अनुभव घेऊन भक्तीरसात चिंब होऊन जातात.

असा हा विलक्षण  दक्षिणद्वार सोहळा, दरवर्षी पावसाळ्यात दोन – तीन वेळा तरी अनुभवास येतो.

नरसोबावाडीस पोहोचण्यापुर्वी  या सगळ्या नद्या वाटेत अनेक ठिकाणी   अनेक गावातील  घाटांवरच्या देवळातील ‘ चैतन्याला ‘  स्पर्श करून आलेल्या असतात. काही उदाहरणे द्यायची झाल्यास कृष्णेने  वाईच्या ढोल्या  गणपतीच्या गाभा-यात जाऊन घेतलेले दर्शन किंवा कृष्णेचेच  औदूंबरला दत्त गुरु चरणी घातलेले लोटांगण सांगता येतील.

अगदी असंच त्र्यंबकेश्वरहून उगम पावणारी ‘गोदा’ त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन नाशिकला  ‘प्रभू श्री रामचंद्रा ‘ चरणी लीन  झालेली पहावयास मिळते.  माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेली ‘इंद्रायणी’ हे आणखी एक उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आपणसा  इतरत्रही पहावयास मिळतात.

नद्यांना या ” परब्रह्म भेटीच्या ओढीचे”  मूळ  माझ्यामते  फार पूर्वी पासून आहे. जेंव्हा श्रावण कृष्ण अष्टमीला  छोट्या गोविंदाला घेऊन ‘ कंसा ‘ पासून सुरक्षीत स्थळी  नेण्यासाठी जेंव्हा वासुदेव निघाले होते. ‘यमुनेला’ ही वाटलंच की  या देवकी पुत्राच्या छोट्या पावलांना स्पर्श करावा असं.  सोमवती अमावस्येला  ओंकारेश्वराच्या दर्शनाहून परत बोटीतून येताना ‘श्री गजानन महाराजांच्या’ बोटीला खालच्या बाजूने छिद्र पडले. नावेत पाणी  जाऊ लागले. इतर भक्त मंडळी घाबरली पण इथे ही ‘नर्मदा’ “राजाधीराज योगीराज परब्रह्म गजानन महाराजांचे” चरण स्पर्श करण्यासाठी आली होती.

आषाढ महिन्यात पांडूरंगाच्या भेटीसाठी तहान भूक विसरून निघालेले वारकरी  आणि याच आषाढ – श्रावणात परब्रह्ममाच्या भेटी साठी निघालेल्या या नद्या  यात मला तरी काही फरक वाटत नाही .  हे कालचक्र, जीवन असेच प्रवाहित राहील जोपर्यत ‘भेटीची ही आस ‘ निरंतर राहील आणि  एकदा का ही भेट झाली की मग फक्त जाणवेल.

तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही

तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही

विश्व् आत्मरुपी  अवघे एकरूप झाले

परब्रह्म भेटी लागी धरेवरी आले

सूर सूर चैत्यनाचा रोमरोम झाले

???

देवा तुझ्या द्वारी आलो

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

image_print
3 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

गुरूदेव दत्त !