श्री उदय गोपीनाथ पोवळे
मनमंजुषेतून
☆ “यश ज्वेलर्स” चा शुभारंभ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
आणि ……….
आणि तो दिवस उगवला, माझ्या यश ज्वेलर्स दुकानाच्या शुभारंभाच्या आधीचा एक दिवस– ०५ सप्टेंबर १९९८. अनंत चतुर्दशी.
——सर्विसला असतानाच दुकानाची तयारी चालू होती १ टनापेक्षा जास्त वजनाची समेरिका कंपनीची तिजोरी कोल्हापूरवरून येऊन स्थानापन्न झाली होती. दुकानाचा लोगो तयार झाला. फक्त १५ दिवस हातात होते. काम पटापट चालू होते. दुकानाचा शुभारंभ धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडून करायचे ठरविले होते– “ एक मराठी माणूस सर्व्हिस सोडून सोन्याच्या दागिन्यांचे दुकान चालू करतोय म्हणजे मी नक्कीच येणार आणि आशिर्वाद देणार “, अशी त्यांनी ग्वाही दिली. ०६ सप्टेंबरला सकाळी १० वाजताची वेळ नक्की झाली.
चार दिवस आधी सोन्याचे दागिने तयार होऊन हातात आले होते. दुकानाच्या बोर्डावर पितळी धातूची अक्षरं असलेले “ यश ज्वेलर्स “ हे चमचमणारे नाव झाकून ठेवले होते. सगळे ठरल्या वेळेत आणि मनाजोगतेही होत होते.
———आणि तो दिवस उगवला, आदल्या दिवशी दुपारी आम्ही पनवेलहून सगळे दागिने आणून, नवीन तिजोरीत ठेऊन, तिजोरी नंबर -लॉकिंगने बंद केली, आणि जेवायला गेलो. परत आल्यावर दागिने भिंतीवरच्या ट्रे मधे लावून उद्याची रंगीत तालीम करायचे ठरविले. दागिने तिजोरीतून बाहेर काढण्यासाठी तिजोरीची चावी फिरवली, ठरलेले नंबर सेट केले आणि——-
———आणि जे काही घडले ते अक्षरशः अनाकलनीय होते. ती नवी तिजोरी जी गेले महिनाभर दिवसातून एकदातरी उघड -बंद करीत होतो, आजही सकाळपासून तीनदा उघड- बंद केली होती, ती तिजोरी उघडेना. पुन्हापुन्हा प्रयत्न केला. परत परत नंबर चेक केले तरीही तिजोरी उघडेना. मी पुरता घामाघूम झालो होतो. दुकान चालू होण्याआधीच स्वामींनी मला मोठ्या परीक्षेला बसविले होते. दुपारचे चार वाजले. डोळ्यात पाणी आले, नको ते विचार डोक्यात येऊ घातले. तिजोरी नाही उघडली तर उद्या दुकानाचे उदघाटन कसे होईल ? अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. सगळे दागिने तिजोरीत अडकले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता उदघाटन होते. फक्त १८ तास हातात होते. जे काही करायचे ते लवकर करायला लागणार होते. मी समेरिकाच्या वर्कशॉपला फोन केला. मालक पांचाळ फोनवर होते. त्यांना तिजोरीचा गोंधळ सांगितला. त्यांनी दिलासा देत सांगितले—-’ फक्त मी सांगतो तसं करा.’ नंतर जवळ जवळ एक तास त्यांच्या सूचनांप्रमाणे मी तिजोरीचे नंबरलॉक फिरवत होतो, पण काहीच उपयोग होत नव्हता.. ते जे काही सांगत होते ते सगळे करून सुद्धा काहीच फरक पडला नव्हता.
———-आता संध्याकाळचे पाच वाजले. पांचाळसाहेबाम्हणाले, “ घाबरू नका, मी लगेच निघतो आणि पहाटेपर्यंत ठाण्याला येऊन तिजोरी उघडून देतो. “ तरीही माझी पायाखालची जमीन सरकली. तेव्हा कोल्हापूर- ठाणे प्रवासाला १०-१२ तास लागायचे . ते लगेच निघाले तरी ठाण्याला पोचायला त्यांना सकाळ होणार होती. हतबलपणे फक्त वाट बघणे एवढेच हाती होते. मी पार कोसळलो होतो, रडत होतो. काही कारणास्तव जर सकाळी ते वेळेत पोचले नाहीत तर …. दुसरा काही उपायही दिसत नव्हता— फक्त वाट बघण्याव्यतिरिक्त. पण माझे मन दुकान सोडायला तयार नव्हते. मी ठरविलेच होते — तिजोरी उघडल्याशिवाय घरी जायचे नाही. वेळ जाता जात नव्हता. मनाची चलबिचल चालूच होती. रात्री एक वाजता पांचाळसाहेबांचा फोन आला– ” मी पुण्याला पोचलोय. सहा वाजेपर्यंत ठाण्यात येतोय “. जीवात जीव आला. आशेचे किरण दिसू लागले. आता सगळे व्यवस्थित होईल असा विश्वास वाटायला लागला .
———– पहाटेचे पाच वाजले. रस्त्यावर थोडी वर्दळ चालू झाली. लक्ष हातातल्या घड्याळावर होते. सव्वासहा वाजले आणि पांचाळ हजर झाले. त्यांना बघून त्यांच्या रूपात स्वामीच आल्यासारखे जाणवले. त्यांनी आल्याआल्या आतमध्ये जाऊन कामाला सुरवात केली. मला वाटले होते की ते जादूगारासारखे एका क्षणात तिजोरी उघडतील— पण नाही— अर्धा तास झाला त्यांचे काम चालूच होते. माझ्या मनात स्वामींचा जप चालू होता. एक तास झाला तरीही काही घडले नव्हते. मी येरझाऱ्या घालू लागलो. . मनात नको नको ते विचार येऊ लागले आणि तेवढ्यात खट्क असा मोठा आवाज झाला—तिजोरी उघडली होती . मी देवाचे आभार मानले आणि लगेच उठून आत गेलो. पांचाळना नमस्कार केला. व्यवसायाच्या सुरुवातीलाच एक महत्वाचा धडा मिळाला—– कुठचीही समस्या कायमस्वरूपी नसते. संयम ठेवून समस्येला सामोरे गेल्यानेच त्याचे उत्तर मिळते.’
—–६ तारखेला ठरल्याप्रमाणे १० वाजून १० मिनिटानी ‘यश ज्वेलर्स’ दुकानाचे उदघाटन झाले. मी तीन वर्ष जे स्वप्न बघत होतो ते जसेच्या तसे साकार झाले होते—-आणि यश ज्वेलर्सचा यशस्वी प्रवास चालू झाला——
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
मो. नं. ९८९२९५७००५.
ठाणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈